कार्यसंस्कृतीनेच यश मिळते
भारतीय कार्यसंस्कृती
एकेकाळी आपला भारत देश हा ‘सुजलाम् सुफलाम्’ म्हणून ओळखला जायचा. अक्षरशः सोन्याचा धूर निघायचा इतकी संपन्नता होती. परमेश्वराचे वरदानच जणू भारताला लाभलेले. सरस्वती व लक्ष्मी आपल्या देशात एकत्र नांदायच्या. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यासारखी रत्ने भारतात होऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, डॉ. विश्वेश्वरय्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर यांच्यासारख्या महान विभूती भारतात जन्मल्या. आजही जगातील सर्वोच्च टॅलेंट भारतात जन्म घेते. जगातील बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सी. ई. ओ. मूळचे भारतीयच आहेत. सत्या नडाला, सुंदर पिचाई, अजय बग्गा, शंतुन नारायण, वसंत नरसिहम, इंदिरा नूयी अशी कितीतरी नावे घेता येतील. जगातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर, इंजिनिअर हे भारतीय आहेत. आपल्या देशाला निसर्गानेही भरभरून दिले आहे. येथे बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आहे.
उन्हाळा, हिवाळ्य, पावसाळ्या असे तीन ऋतू आहेत. श्रीनगर, हिमाचल, उटी, कोडाई कैनाल, महावळेश्वर सारखी नैसर्गिक सौंदयनि ओतप्रोत पर्यटनस्थळे आपल्याकडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक किल्ले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत आहेत. पण आपण कधी खास किल्ले पाहण्यासाठी, इतिहास समजून घेण्यासाठी जातो का? गेलो तरी तिथल्या ऐतिहासिक बांधकामावर तरुण-तरुणी काय लिहितात… आय लन्छ, बदामाचा आकार, असले प्रकार करून आपण आपलाच ऐतिहासिक ठेवा विद्रूप करतोय, याचेही भान राहत नाही. अशा गोष्टी पाहून छत्रपती शिवरायांना काय वाटत असेल, याचा कधी विचार केला का?
आपली भारतीय संस्कृती नद्यांमुळे समृद्ध बनली आहे. आज त्याच गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, चंद्रभागा या नद्यांची अवस्था काय आहे? या नद्यांचे पाणी आपण प्रदूषित केले आहे. त्यांचे पावित्र्यही हरवून बसले आहे. आषावी-कार्तिकीला अशाच प्रदूषित नदीचे पाणी आपण श्रद्धेने तीर्थ म्हणून प्राशन करतो. आपल्या सर्वांच्या तसेच देशाच्या यशस्वितेसाठी आपल्याला कार्यसंस्कृती बदलावी लागेल. अलीकडच्या
काळात लोक खूपच स्वार्थी झाले आहेत. आजच्या तरुणाईत संयम राहिलेला नाही. त्यांना झटपट श्रीमंत व्हायचे असते. ग्रोथ हवी, मग ती कशीही असली तरी चालेल अशी मानसिकता तयार झाली आहे. ग्रोय म्हणजे प्रगती. त्यात तीन प्रकार असतात. Natural Growth (नैसर्गिक वाढ), Plan Growth (नियोजनबद्ध वाढ), Accidental Growth (अपघाती वाढ). अलीकडे लोकांना अपघाती वाढही चालते. खरेतर अशा अपघाताने झालेली प्रगती ही ‘बाव’ नसून सूज असते. ती सूज ओसरल्यानंतर मग माणूस विथरल्यासारखा होतो. त्याला अपयश सहन होत नाही. अशावेळी व्यसनाधीनता वाढते. याला कारण म्हणजे चंगळवाद आणि कार्यसंस्कृतीची कमतरता.
स्पर्धा असावी, पण ती निरोगी असावी, यासाठी संस्कार, नीतिमूल्ये, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी गरजेची असते. मालक व कामगार यांच्यातही सौहार्द असायला हवे. बहुतेक मालकांना कमी पगारात जास्त काम करणारे नोकर हवे असतात. तर कामगारांना कमीतकमी काम व जास्तीतजास्त पगार हवा असतो. काम करताना कामचुकारपणाच जास्त करण्यात येतो. मालक, मॅनेजर, सुपरवायझर नसेल; तर काम टाळण्यावर भर दिला जातो. अशातच सरकारी व खासगी क्षेत्रांतील काम करणाऱ्यांच्या वेतनात प्रचंड अशी तफावतही असते. यातून मानसिकता बिघडत जाते. या शिवाय आपल्याकडे राजकारणाचे प्रस्थ मोठे आहे. निवडणुकीवेळी ‘अमुक तमुक फुकट देऊ,’ अशी आश्वासने दिली जातात. असे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित केले जाते. सरकार गरिबांना मोफत धान्य देते. निवडणुकीवेळी जेवणावळी, रोख पैसे दिले जातात. अशा फुकटच्या गोष्टीमुळे काम करायची मानसिकता राहत नाही. आजकाल तर ग्रामीण भागात शेतात काम करण्यासाठीही मजूर मिळत नाहीत.
जे नोकरीला असतात, ते हे विसरतात की, आपल्याला या कामामुळे अन्नपाणी मिळत आहे. मालकामुळे आपली चूल पेटते. कामगारांना हक्क मिळाले पाहिजेत, यात काही गैर नाही. पण युनियन, संघटनांच्या माध्यमातूनही कंपन्यांमध्ये राजकारण आणले जाते. व्यवस्थापनाला ब्लॅकमेल केले जाते. त्यामुळेच आजकाल मालक मंडळीही थेट नोकरभरती करण्याऐवजी कामांचे आऊटसोर्सिंग करतात किंवा कंत्राटी पद्धतीने माणसे नेमतात, तेही खूप कमी पैशात. लोक ठेकेदाराकडे कमी पैशात काम करतील, कारण तिथे युनियन, संघटना वगैरे काही नसते.
मला असे वाटते की, आपल्याकडे महत्त्वाकांक्षेचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे नोकरांमधून उद्योजक होणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. खरे तर आपले अंतिम ध्येय नोकरी करीत राहणे नसावे. नोकरी ही अनुभवासाठी, त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळविण्यासाठी असली पाहिजे. एकदा ही शिदोरी मिळाल्यावर नोकरी देणारे होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बेस्ट ऑफ बेस्ट एफर्ट्स करीत एखाद्या कामात निष्णात व्हायला पाहिजे. जोपर्यंत अशी मानसिकता बनत नाही, तोपर्यंत आपल्याकडे जास्तीतजास्त उद्योजक तयार होणार नाहीत. कामचुकारपणा, लबाडी, बेइमानीची मानसिकता असलेले कधीही मोठे यश मिळवू शकत नाहीत.
मी तेरा वर्षे स्टेट बँकेत नोकरी केली. पण शेवटच्या दिवसापर्यंत सर्वोत्कृष्ट आऊटपुट दिले. कायम एक नंबरचे काम केले. त्यामुळेच मला कायम नंबर वनवर पोहचण्याची सवय लागली, माझ्या रक्तातच ही गोष्ट पूर्ण भिनलेली आहे. यात माझ्या कष्टाबरोबरच आईवडिलांचे आशीर्वाद व परमेश्वराची कृपादृष्टी आहेच. जुन्या काळी एखादा पायी पायी जात असेल, तर त्याला पाठीमागून सायकलवर येणारा माणूस सहज लिफ्ट देत असे. अलीकडे मात्र दुचाकीवर किंवा कारने जाताना कोणी पायी जाणाऱ्याने लिफ्ट मागितली, तरी गाडी थांबविली जात नाही. ‘न जाणो एखाद्याला लिफ्ट दिली व त्याने गाडीत बसल्यावर पाठीमागून चाकू दाखवून आपल्याला लुटले तर?’ अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते. माणसामाणसात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टीला कारणीभूत आहे.
आपण मोठ्या आनंदाने एखादे कीर्तन किंवा प्रवचन ऐकायला जातो. पण तिये गेल्यावर आपण चप्पल अशीच मोकळी सोडत नाही. आपण आपल्या चपलेवरच बैठक मारतो. कारण चप्पल लांब सोडली, तर चोरीला जाण्याची भीती असते. उन्हाळ्यात जागोजागी थंड पाण्याची व्यवस्था पाणपोईद्वारे केली जाते. तेथेही ग्लास साखळीला बांधून ठेवला जातो. याचाच अर्थ आपल्याकडे प्रामाणिकपणा कमी झालेला आहे. ‘विश्वासराव पानिपताच्या लढाईतच गेले’ असे कायम म्हटले जाते. अर्थात विश्वसनीयता, प्रामाणिकता, कार्यसंस्कृती लोप पावत चालली आहे. शहरांमध्ये तर याचे प्रमाण जास्त जाणवते. अशा परिस्थितीत आपण समाज सुधारला, असे म्हणायचे का?
म्हणूनच मला वाटते, Charity begins at home, कार्यसंस्कृतीची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, ‘Be the Change, that you want to see in the world’ जो बदल तुम्हाला जगाकडून अपेक्षित आहे, त्याची सुरुवात स्वतःपासून करा. असा बदल स्वतःमध्ये, स्वतःच्या मुलांमध्ये घडविला; तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुम्हाल मनापासून सदिच्छा।
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
