कार्यसंस्कृतीनेच यश मिळते

कार्यसंस्कृतीनेच यश मिळते

कायझेन थेअरी

जपानमध्ये कायझेन घेअरीचा यशस्वितेसाठी चपखल वापर केला गेला आहे. मसाकी इमाई यांनी हा फॉम्र्युला सांगितला व लोकांनी तो स्वीकारलाही. कायझेननुसार तुम्हाला मोठे यश हवे असेल, तर त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी छोटे छोटे टप्पे निश्चित करा. एका एका ध्येयावर, त्या भागावर तुटून पड़ा. ते पूर्ण केले की, पुढच्या टप्प्याकडे वळायचे. असे करत करत वाटचाल केल्यास तुमचे लक्ष्य कितीही मोठे असले, तरी ते नक्की गाठता येते. एक एक दमदार पाऊल तुम्हाला तुमच्या मोठ्या शर्यतीत जिंकून देईल. फक्त हे करताना भीतीची भीती (डर का डर) मनातून काढून टाकली पाहिजे. कितीही अवघड व कठीण वाटत असले, तरी ते ध्येय तुम्ही निश्चित पूर्ण करू शकता, हा विश्वास मनात कायम ठेवणे आवश्यक आहे. कायझेन थेअरीनुसार यशाच्या मार्गात आडव्या येणाऱ्या ज्या तीन गोष्टी नेहमी सांगितल्या जातात, त्या साफ खोट्या आहेत. या तीन गोष्टी कोणत्या? १. यश मिळणे किंवा माझ्यात बदल होणे अत्यंत कठीण आहे. २. मोठ्यात मोठ्या यशासाठी मोठमोठी पावले टाकावी लागतात, मोठमोठी कामे करावी लागतात. ३. नव्या कल्पना व नव्या विचारांनीच फक्त मला यश मिळू शकते व तशा कल्पना, विचार माझ्याकडे नाहीत.

जपानीच टोयोटा कंपनी काही कारणांमुळे डबघाईला आली होती. अक्षरशः कंपनी बंद करण्याची वेळ आली होती. कंपनीच्या मालकांनी सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग बोलाविली. सर्वांना विश्वासात घेत सांगितले की, ‘कंपनीची अवस्था वाईट आहे. कंपनी बंद पडली, तर सर्वांनाच नोकरीला मुकावे लागेल. यासाठी कंपनी वाचवायची, तर आपण कायझेन थेअरी अवलंबून पाहूया. यासाठी प्रत्येकाने आपल्या काही छोट्या छोट्या सूचना कराव्यात.’ कंपनी वाचली पाहिजे, या हेतूने अगदी झाडूवाल्यापासून मॅनेजरपर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने काही सूचना केल्या. या सूचनांची अंमलबजावणीही विभागनिहाय सुरू झाली. आता या सूचना कर्मचाऱ्यांकडूनच आल्या असल्याने त्याची अंमलबजावणीही प्रभावीपणे झाली. एक सूचना अशी होती की, ‘सर्व कर्मचाऱ्यानी जास्तीचा एकच तास पण मन लावून काम करायचे.’ सर्वांनी तसेच केले. त्यामुळे कंपनी हळूहळू फायद्यात येऊ लागली. काही काळाने बंद पडणारी ही कंपनी जगातील प्रथम क्रमांकाची कंपनी बनली. छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी कशा साध्य होतात, हे कायझेन थेअरीतून लक्षात येते.

बलाढ्य अमेरिकेलाही एके काळी खूप वाईट दिवस आले होते. परंतु कायझेन थेअरीचा आधार घेऊन एका व्यक्तीच्या एका वाक्याने अमेरिकेला जगातील प्रथम क्रमांकाची महासत्ता बनविले. ते वाक्य होते, “भीतीची भीती घालवा (डर का डर निकालो) व यशस्वी व्हा.” याला त्यांनी नाव दिले, ‘५ सेकंदांचा नियम’. आता हा ५ सेकंदांचा नियम काय आहे हेही सांगतो. दर एक तासाने स्वतःशी ५ सेकंद बोलायचे, ‘मी प्रगती करणार व यशाकडे जाणारच.’ हे वाक्य दर एक तासांने स्वतःशीच बोलायचे. पहा फरक पडतो की नाही? कायझेन थेअरी जपानने जगाला दिलेला यशाचा मंत्र आहे. तो अमलात आणायचा नक्की प्रयत्न करा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!