जाहिरातीतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ‘सत्य’…!
तुम्हाला आठवत असेल, आपण शाळेत जायचो तेव्हा फळ्यावरती एक सुविचार कायम वाचायचो. ‘नेहमी खरे बोलावे’, काळ बदलला, वेळ बदलली, तंत्रज्ञान बदलले पण हे तीन शब्द आजही प्रत्येक ठिकाणी शाबूत आहेत. ‘ग्राहक देवो भवः’ असं आपण नेहमी म्हणतो, ऐकतो, वाचतो. पण आपण आपल्या ग्राहकांशी कळत-नकळत, जाणते अजाणतेपणी कधी खोटं तर बोलत नाही नां? यांची प्रत्येक व्यावसायिक-उद्योजकानं काळजी घेतली पाहिजे. ग्राहकांशी खोटं बोलणं म्हणजे ‘देवाशी’ खोटं बोलणं झालं नां? मग देवाशी खोटं बोलून आपण खूप मोठा बॅण्ड होवू शकतो का? कधीच नाही. काळजाच्या सिंहासनावर आपल्या ग्राहकांना बसवून त्यांची पूर्ण काळजी घेणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या आसपास आहेत. व्यवसायवृध्दीसाठी जाहिरात करणं अनिवार्य आहे यात शंकाच नाही. पण जाहिरात करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी की, जाहिरातीमध्ये कुठलीही खोटी माहिती किंवा खोटे आश्वासन असू नये. मला अजून एक गोष्ट इथे सांगायची आहे की, खूप जास्त जाहिराती केल्या म्हणजे खूप भारी प्रॉडक्ट असं काही नसतं. आणि उत्कृष्ठ जाहिरात निकृष्ठ उत्पादनाला कधीच वाचवू शकत नाही. जाहिरात हे एक माध्यम आहे. आपल्या प्रॉडक्टची माहिती, सेवा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणारं. पण जर उत्पादनाची क्वालिटीच जर चांगली नसेल तर? खूप जाहिराती करून काय फायदा. उलट अशावेळी उत्पादन किती वाईट आहे हा मेसेजच खूप जास्त पोहोचतो. जाहिरात प्रॉडक्टस् बनवत नाही. जाहिरात फक्त ते प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे आपल्या उत्पादनांची गुणवत्ता अप्रतिम ठेवा. त्यांच्यामध्ये नाविन्य असू द्या. त्यांचा वेगळेपणा जपा. आणि जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत ती कल्पकतेनं आणि ‘खरीखरी’ जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवा, मग बघा काय चमत्कार होतो ते. ‘देव’ प्रसन्न नाही का होणार? (म्हणजे ग्राहक बरं कां). इतिहासाची पानं उलटून पाहिली की तुमच्याही लक्षात येईल, मोठमोठ्या कंपन्या आपल्या ग्राहकांना खूप म्हणजे खूपच जपतात. त्यांची सेवा करतात. त्यांच्या गरजा ओळखतात आणि त्या गरजा पूर्ण करतात. का नाही त्या’ ग्रॅण्ड’ होणार? अपेक्षेपेक्षा जास्त देण्याचे पोकळ आश्वासन देण्यापेक्षा आपल्या ग्राहकांच्या अपेक्षेइतके जरी दिले तरी त्यांना नक्कीच समाधान मिळते. आज ‘टाटा’ला विश्वासाचं प्रतिक मानलं जातं. कारण त्यांची कमिटमेंटच तशी आहे. ते ग्राहकांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. जगप्रसिध्द फोर्टीस हॉस्पिटल तर असं म्हणतं की, आम्ही आमच्या पेशंटस्ची सर्वोत्तम काळजी तर घेतोच घेतो. पण त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांना देखील जपतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की, ग्राहकांशी खरं बोलणाऱ्या, खरं वागणान्या कंपन्या, उत्पादने, सेवा-संस्था ग्रॅण्ड होतात आणि ग्राहकांना मूर्ख समजणाऱ्या कंपन्या नष्ट होतात. खरं बोलण्याचा अजुन एक फायदा असतो असं मला वाटतं. खरं बोललं की नातं फक्त व्यवहारापुरतं राहात नाही. तिथे आदर जन्म घेतो. आदरानं साधलेला संवाद विश्वासाची पातळी गाठतो. आणि जिथं विश्वास निर्माण होतो तिथं ‘ब्रॅण्ड’ निर्माण होतो.
लेखक – अज्ञात
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
