तुषार शेंदारकर यांनी २५ हजारांत सुरू केलेल्या ‘Shree Infra’ची उलाढाल आज कोटींमध्ये

तुषार शेंदारकर यांनी २५ हजारांत सुरू केलेल्या ‘Shree Infra’ची उलाढाल आज कोटींमध्ये

बालपणापासून कष्टाचे दिवस पाहिलेल्या तुषार शेंदारकर यांना सुरुवातीपासूनच उद्योजकतेची आवड होती. लौकीक शिक्षण कमी असलं तरीही आपली व्यावसायिक हुशारी आणि कुटुंबाची साथ यावर ते आज आपल्या व्यवसायात करोडोंची उलाढाल करत आहेत. वयाच्या सहा महिन्यांपासूनच त्यांचे वडील त्यांच्या सोबत नसल्याने सर्व जबाबदारी आईवर पडली. त्या माऊलीने तिच्या परीने शक्य तेवढे आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. तुषार कसाबसा दहावी झाला. त्याचं मन सुरुवातीपासूनच व्यवसायात असल्याने सुरुवातीला तो आईला आणि भावाला खानावळीच्या व्यवसायात मदत करी. आई स्वयंपाक करायची, भाऊ व्यवस्थापन सांभाळायचा आणि तुषार खरेदी आणि टिफिन डिलिव्हरी सांभाळायचा.

तुषार शेंदारकर यांनी २००७ मध्ये स्वत:चा पहिला व्यवसाय सुरू केला. २०१४ मध्ये एका मोठ्या कंपनीने पेमेंट न दिल्यामुळे नाईलाजाने स्वत:चा व्यवसाय बंद करून पत्नी रेखाच्या मदतीने रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू करावा लागला. २०१८ मध्ये फक्त २५-३० हजार रुपयांच्या भांडवलात तुषार यांनी ‘Shree Infra’ची सुरुवात केली आणि आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल पाच ते सात करोडची आहे.

तुषार यांची ‘ Shree Infra’ आणि त्यांचे भाऊ पुष्कर यांची ‘ओम इन्फ्रास्ट्रक्चर’ या दोन कंपन्यांमार्फत सर्वच क्षेत्रात बी-टू-बी मॉडेलमध्ये सेवा पुरवतात; ज्यात सिव्हिल कन्स्ट्रक्शन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग तसेच पाईपिंग या सेवांचा समावेश आहे. २०१८ ला व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा ते सुरुवातीला सबकॉन्ट्रॅक्ट घेत असत आणि २०२१ पासून सबकॉन्ट्रॅक्ट बंद करून डायरेकट कॉन्ट्रॅक्ट घेण्यास सुरुवात केली. तुषार अभिमानाने सांगतात की, आज आमच्याकडे इंडस्ट्रीतल्या मोठ्या कंपन्यांची कामे आहेत. सध्या १२ करोडच्या ऑडर्स बुक असून जवळपास १५-२० करोडची कामे निगोशिएशनमध्ये आहेत. २०१४ मध्ये त्यांना जे कंपनीकडून फसवलं गेलं त्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम झाला. कोव्हिड काळात त्यांनी व्यवसायासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न केला, पण सिबिल स्कोअर कमी असल्याने मिळू शकलं नाही. त्यामुळे येणारा पैसाच पुन्हा व्यवसायात गुंतवून व्यवसाय वाढवणं एवढंच शक्य होतं.

या काळात त्यांचं व त्यांच्या भावाचं घर त्यांच्या त्यांच्या पत्नीने पूर्णपणे सांभाळल्यामुळे त्यांना खूप मोठा आधार मिळाला आणि दोन्ही भावांनी एकमेकांच्या साथीने आज आपल्या व्यवसायाला इथपर्यंत पोहचवलं आहे. तुषार शेंदारकर सांगतात, “आम्ही अभिमानाने म्हणू शकतो की आज आमच्या कंपनीवर कोणत्याही बँकेचं एक रुपयाचेदेखील कर्ज नाही.” महाराष्ट्रात व्यवसाय करताना येणारी सर्वात मोठी अडचण तुषार सांगतात कुठेही काम करताना स्थानिकांना सांभाळणे, त्यांच्या मागण्या पूर्ण करणे आणि वेळोवेळी अतृप्त लोकांचा साईटवरचा त्रास सहन करणे. मात्र आता त्यांची टीम अतिशय सहज पद्धतीने या सर्वांतून मार्ग काढण्यात सक्षम झाली आहे. त्यामुळे या सर्व समस्या आता काही विशेष वाटत नाहीत, असेही ते म्हणतात.

आपल्या व्यवसायाच्या वेगळेपणाबद्दल तुषार सांगतात, “आमच्या व्यवसायाचे स्वरूप काही वेगळे नाही, परंतु आम्ही आमचा व्यवसाय थोड्या वेगळ्या पद्धतीने करतो. कोणतंही काम घेताना आमचा फोकस कामाची गुणवत्ता सांभाळून कमीतकमी खर्चात ग्राहकाचं काम करून देणं हा असतो आणि ते काम योग्य वेळेत करून देऊन आपला नफा कमावणं हेच आमचं ध्येय असतं.

आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्लानिंग, शेड्युलिंग आणि ठराविक कालांतराने प्रोग्रेस रिव्ह्यू या टप्प्यांचा अंतर्भाव असल्याने आमच्या ग्राहकांचा विश्वास आपोआपच वृद्धिंगत होत जातो. कमीतकमी खर्चात उत्तम सेवा वेळेमध्ये देणं यावर आमचा भर असतो. आपल्या भविष्यातील वाटचालीबद्दल तुषार सांगतात, “तसं तर आम्ही भविष्यातील वाटचालीबद्दल खूप मोठं प्लानिंग करून चालत नाही, आम्ही केवळ आमचं आजचं काम कालच्यापेक्षा उत्तम करण्याचा प्रयत्न करतो. भविष्य आपोआप उत्तम बनत जातं आणि सांगायचंच झालं तर २०२६ पासून आम्ही सरकारी कामं घेण्यास सुरुवात करणार असून येत्या तीन वर्षांत आमच्या कंपनीचा कारभार ५० करोडपर्यंत नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे.

आपल्या या वाटचालीत आईचा आशीर्वाद, पत्नी रेखाने पडत्या काळात दिलेला धीर सर्वात मोलाची साथ, व्यवसायात येणार्‍या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आणि प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्यासाठी भावाचं मिळणारं मार्गदर्शन आणि त्याला त्याच्या पत्नीची मिळणारी साथ यांच्या जोरावरच कितीही संकटं आली तरी आपला हा उद्योजकीय प्रवास व्यवस्थित सुरू आहे, असं तुषार शेंदारकर आवर्जून सांगतात.

लेखक- अज्ञात

संपर्क : 9987039351

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!