भविष्यात भरपूर संधी असलेला इको-फ्रेंडली पॅकेजिंग व्यवसाय
इको-फ्रेंडली पॅकेजिंग व्यवसायाला भारतात सध्या खूप मोठी संधी आहे. आजच्या ग्राहकाला पर्यावरणविषयक जाणीव आहे. त्यामुळे ग्राहक स्वत:च इको-फ्रेंडली पॅकेजिंगला पसंती देतो. त्याचसोबत प्लास्टिक वापरावरील सरकारी नियमही कठोर झालेत. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि उत्तम आर्थिक परतावा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. भारतात किंबहुना जगभरात अन्न, पेय, औषध याशिवाय असंख्य ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसायांची मागणी वाढतेय. त्यामुळे या सार्यांसाठी आवश्यक पॅकेजिंग व्यवसायाला खूप मोठी बाजारपेठ आहे. इको-फ्रेंडली पॅकेजिंग व्यवसाय सुरू कसा करावा असा प्रश्न पडतो. यासाठी आपण काही पायर्या समजून घेऊ.
१. मार्केट रिसर्च : सर्व प्रथम मार्केट रिसर्च करून मागणी, ग्राहक, आपले प्रतिस्पर्धी, गुंतवणूक, आवश्यक त्या सर्व गोष्टींचे सखोल संशोधन करून मग पुढे जावे.
२. बिझनेस प्लॅन : आपल्या व्यवसायाचा प्लॅन तयार करा. आपले उत्पादन, टार्गेट कस्टमर, मार्केटिंग स्ट्रेटेजी, गुंतवणूक, अशा छोट्यात छोट्या गोष्टींची नोंद करून एक रूपरेखा आखावी. यातून एक सर्वसमावेशक बिझनेस प्लॅन तयार करा.
३. कायदेशीरबाबी आणि नोंदी : प्रथम व्यवसाय नोंदणी करून घ्या. आवश्यक परवाने मिळवा. याशिवाय सर्व कायदेविषयक बाबी समजून घेऊन पर्यावरणासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करा.
४. गुंतवणूक : भक्कम गुंतवणूक या व्यवसायासाठी अत्यंत गरजेची आहे. त्यासाठी आपल्याला योग्य ठिकाणी ती मिळवता आली पाहिजे. याशिवाय इकोफ्रेंडली व्यवसायांसाठी सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या अभ्यासून त्याचाही विचार करता येऊ शकतो.
५. जागा आणि पायाभूत सुविधा : जागेची निवड करताना सजगपणे करा. कारण उत्पादन क्षेत्रातील उद्योग असल्याने कच्चा माल ने-आण करताना वाहतूक आली. त्यामुळे जागेची निवड ही वाहतुकीच्या दृष्टीने सोयीची असावी. याशिवाय गोदाम म्हणजेच स्टोरेज लागणार. मशिनरी लागणार. या सगळ्या पायाभूत सुविधा नीट उभ्या कराव्या लागतील.
६. कच्चा माल : इको-फ्रेंडली पॅकेजिंग हा व्यवसाय आपण करणार म्हणजे तो पर्यावरणपूरक असणार. यासाठी कच्चा माल त्या प्रकारचा लागणार. म्हणजे रिसायकल केलेला कागद, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, ताग किंवा कापूस असा नैसर्गिक पर्यावरणपूरक कच्चा माल लागेल.
७. मार्केटिंग आणि विक्री : पर्यावरणपूरक हेच आपले वेगळेपण असेल तरी त्याला हायलाइट करून आपली मार्केटिंग स्ट्रेटेजी तयार करा. यातून आपला ब्रँड तयार करा. ऑनलाइन, ऑफलाइन विक्रीची धोरणे तयार करा.
या सर्व मुद्यांवर काम करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही व्यवसाय हा त्याच्या मार्केटिंग आणि सेल्स यामुळे ग्राहकाभिमुख होतो. यासाठी आपली मार्केटिंग आणि विक्री नियोजनबद्ध झाली पाहिजे. यासाठी काय काय करता येईल?
- * ऑनलाइन प्रेझेन्स : आजच्या काळात ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्या व्यवसायाची वेबसाइट तयार करा. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करा.
* भागीदारी : किरकोळ विक्रेते, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म याशिवाय आपल्या व्यवसायसंधी असणार्या व्यवसायांसोबत जोडले जा.
ग्राहकांचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यांचा विश्वास आणि आपली विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी इकोफ्रेंडली आवश्यक ती प्रमाणपत्र प्राधान्याने मिळवा.
* ग्राहक जागृती अभियान : आपल्या व्यवसायातून ग्राहकाला मिळणार्या फायद्यांसाठी त्यांना जागृत करा. यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आयोजित करा.
विविध ठिकाणी भरणार्या ट्रेड शो, एक्झिबिशनना भेटी द्या. स्वत: त्यात सहभागी व्हा. इको-फ्रेंडली पॅकेजिंग हे एक मोठे क्षेत्र आहे. यातही वेगवेगळ्या पॅकेजिंग व्यवसायसंधी आहेत. आपण आपल्या आवडीनुसार निवड करू शकतो.
१. रिसायकल पेपर पॅकेजिंग : यामध्ये आपण पिशव्या, बॉक्स, रॅपिंग पेपर अशी उत्पादने तयार करू शकतो. यासाठी गुंतवणूक कमी लागते. ई-कॉमर्स, रिटेल, गिफ्ट शॉप्स हे आपले संभाव्य ग्राहक असू शकतात.
२. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक पॅकेजिंग : यामध्ये आपण पिशव्या, फूड कंटेनर, कटलरी तयार करू शकतो. यासाठी गुंतवणूक जास्त लागते. याला घाऊक बाजार, फूड इंडस्ट्री, फार्मास्युटिकल क्षेत्रात मागणी असते.
३. ज्यूट आणि कापडी पिशव्या : शॉपिंग बॅग्स, टोटो बॅग्स, पाउच अशा उत्पादनांसाठी ज्यूट आणि कापड उपयोगात येते. फॅशन इंडस्ट्री, किरकोळ बाजार, त्याशिवाय विविध कार्यक्रमांचा प्रचार तसेच पब्लिसिटी अशा विविध कारणांनी या उत्पादनाला मागणी आणि बाजरपेठ उपलब्ध आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा या पुन्हा वापरता येतात.
४. मोल्डेड पल्प पॅकेजिंग : अंडी ट्रे, फ्रूट ट्रे, इलेक्ट्रॉनिक्स पॅकेजिंग यासाठी मोल्डेड पल्प पॅकेजिंग व्यवसाय ही संधी आहे. याला कृषी, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक अशा क्षेत्रात मागणी आहे.
५. फूड पॅकेजिंग : चित्रपट गृह, विविध फूड स्टॉल्स इथे रॅपर म्हणून याची आज वाढती मागणी आहे. गुंतवणूक जास्त लागते. याचे मुख्य क्षेत्र फूड आणि ड्रिंक आहे. ही बाजारपेठ खूप मोठी असल्याने इथे पॅकेजिंगच्या संधीही जास्त आहेत. वर म्हटल्याप्रमाणे विविध प्रकारची आर्थिक गुंतवणूक म्हणजे कमी, मध्यम, उच्च अशा प्रमाणात असू शकते. म्हणजे काय तर इको-फ्रेंडली पॅकेजिंग या व्यवसायात गुंतवणूक ही आपण तयार केलेल्या पॅकेजिंग उत्पादनावर आणि त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. आर्थिक गुंतवणूक ही कमीत कमी पाच लाखापासून १ कोटीपर्यंत असू शकते. उत्पादन क्षेत्र असल्यामुळे मशीनरी, जागा, मार्केटिंग, याशिवाय लेखात उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. याशिवाय आपण कोणते पॅकेजिंग तयार करतोय यावरही ते अवलंबून असते.
१. छोटा व्यवसाय : कागदाच्या पिशव्या किंवा कंपोस्टेबल कंटेनरसारख्या पॅकेजिंग उत्पादनांसाठी आपण छोट्या युनिटपासून सुरुवात करू शकतो. त्यामुळे इथे गुंतवणूकही कमी लागते.
२. मध्यम व्यवसाय : बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, जूट पिशव्या, रिसायकल कागद यापासून तयार होणार्या उत्पादनाच्या युनिटला मध्यम गुंतवणूक आवश्यक असते.
३. मोठा व्यवसाय : मोठ्या प्रमाणत व्यवसाय युनिट उभारताना इको-फ्रेंडली पॅकेजिंग उत्पादनांसाठी प्रगत यंत्रसामग्रीशिवाय मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्या युनिट उभारणीसाठी गुंतवणूकही मोठी लागते.
कोणताही व्यवसाय असो त्यात आव्हाने आणि समस्या पदोपदी असतात. याचा अभ्यास हवा. आपल्या क्षेत्राविषयी नीट अभ्यास असावा. पारंपरिक प्लास्टिकपेक्षा पर्यावरणपूरक साहित्य अधिक महाग असू शकतं. अशावेळी सरकारी अनुदान, नियोजनपूर्वक उत्पादन प्रक्रियांचा वापर करून उत्पादनाची किंमत आपण ग्राहकाला परवडेल अशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या ग्राहकाला आपल्या उत्पादनाविषयी अधिक जागृत करण्यासाठी सतत काम करायला हवे. कच्चा माल वेळोवेळी मिळवणे हे एक आव्हान असू शकते. यासाठी आपली भक्कम चैन उभी करायला हवी. याशिवाय विविध प्रकारच्या पर्यायी व्यवस्थाही आपल्याला लावता आल्या पाहिजेत. इको-फ्रेंडली पॅकेजिंग हा एक शाश्वत व्यवसाय आहे. या व्यवसायात गुंतवणूक करू इच्छिणार्या उद्योजकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. योग्य स्ट्रेटेजी, पूरक गुंतवणूक आणि जबाबदारीची बांधिलकी यातून एक चांगला उद्योग उभारता येऊ शकतो. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपण्याचे समाधानही हा व्यवसाय देतो.
लेखक- अज्ञात (उद्योजक वक्ता)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
