महाराजांचे लष्कर व्यवस्थापन

महाराजांचे लष्कर व्यवस्थापन

पायदळात व घोडेस्वारात मावळ्यांची संख्या अधिक होती. गडावर पाचशेपेक्षा अधिक सैन्य, घोडेस्वार ठेवले जात नसत. राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड, पुरंदर, प्रतापगड व रायगड या महत्वाच्या गडकोटाच्या पंचक्रोशीत, डोंगराच्या पायथ्याला, माथ्यावर घोडदळाचे तळ असत.

राजगडाच्या चोहोबाजूच्या पाली, मळे, मेरावणे व खडकी-मोहरी येथे तसेच तोरणागडाच्या पायथ्याला धानेप, केळद, तसेच भोर्डी, निगडी मोसे, कादवे, दिवळे, दापसरे आदि ठिकाणी घोडदळाचे तळ होते. मावळ खोऱ्यात घोडमाळ, घोडमाच या नावाने घोडदळाच्या तळांना ओळखले जात.

शिवरायांच्या या दूरदृष्टी धोरणाबाबत दत्ता भगत लिहितात, “सरनौबत, मुजुमदार, कारकून यांना जहागिऱ्या देण्याऐवजी शिवाजी महाराजांनी वेगळे वेतन द्यायला सुरूवात केली. आणि त्यांच्या मालकीची परंपरागत जमीन असलीच तर सामान्य रयतेप्रमाणे मानली जाऊन दरवर्षी सालझाडा घेतला जाईल असा आदेश काढला. कुणालाही एखादे गाव इनाम अथवा मोकास देऊ नये, त्याऐवजी रोख ऐवज द्यावा, असा निर्णय घेतला. लष्कराला जे हवे ते त्यांनी कारकुनामार्फत मिळवावे. जनतेकडून परस्पर मिळविता कामा नये अशी आज्ञा केली. यामुळे स्थानिक पातळीवर सैन्याच्या बळावर पुंडाई निर्माण होणे याला पूर्ण पायबंद बसला. जनतेचा संबंध फक्त मुलकी अधिकाऱ्यांशी येऊ लागला. लष्कराचा जनतेशी सांधा तुटला. लष्कराची नाळ प्रत्यक्ष छत्रपतींशी जोडली गेली. आजच्या आपल्या लोकशाही व्यवस्थेत हेच धोरण आढळून येते. शत्रूच्या बायकामुलांना हात लावू नये, देवालयांची नासधूस करू नये, सक्तीचे धर्मांतर अथवा इतर गोष्टी करू नयेत, शेतकऱ्यांचे बैल लुटू नयेत, अगदी नाईलाज झालाच तर फक्त ओझे वाहून नेण्यासाठी बैल घ्यावेत, गाईंना पळवू नये, खंडणी वसूल करताना ओळख म्हणून साक्ष देण्यसाठी ब्राम्हणांना जबाबदार धरू नये इ.” शिवाजी महाराजांनी केलेले नियम पाहिले म्हणजे शिवाजी महाराज शत्रूप्रदेशातल्या रयतेलासुद्धा संरक्षणाची हमी देत होते हे लक्षात येऊ शकते.
फ्रेंचांनी शिवाजी महाराजांच्या छावणीचे चांगले वर्णन केले आहे. महाराजांचे बळ कशात होते हे त्यांनी अचूकपणे सुचित केले आहे. फ्रेंचाच्या दृष्टीस काय आढळले? ते म्हणतात, “शिवाजी महाराजांच्या छावणीत डामडौल नव्हता. छावणीत बायका-माणसे नव्हती. अतिरिक्त सरंजाम नव्हता. फक्त जाड्याभरड्या कपड्यांचे थोडेसे तंबू होते. तेही किती म्हणाल? एक तंबू स्वतः शिवाजी महाराजांसाठी व दुसरा त्यांच्या मुख्य प्रधानासाठी.”

आणखी एके ठिकाणी मार्टिनने म्हटले आहे, “शिवाजी महाराजांच्या घोडेस्वारांना सामान्यपणे प्रत्येकी दर महिन्यास दोन पॅगोडा असा पगार मिळतो हे येथे सांगणे अस्थानी होणार नाही. सैन्यातील सर्व घोडे हे शिवाजीचे, (सरकारचे) त्या घोड्यांची निगा राखण्यासाठी मोतद्दार असत. घोडेस्वारांची या बाबतीत काही ढवळाढवळ नसे. दर दोन माणसांमागे ३ घोडे असत. यामुळे शिवाजी महाराजांचे सैन्य इतके चपळ का? याची कल्पना येईल.

त्यांच्या शत्रूना वाटे की, तो लांब अंतरावर आहे. अशा वेळी तो त्यांच्यावर अचानक तुटून पडे. यामुळे शत्रू गोंधळून जाई. या प्रदेशात असलेल्या शिवाजीच्या घोडेस्वारीची कुटुंबे हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर राहत त्यामुळे हे घोडेस्वार शिवाजीला चिटकून राहत. शिवाजी आपल्या हेरांना उदारपणे मुबलक पगार देत असे. त्यामुळे ते त्याला अचूक माहिती पुरवित, ह्या कारणांनी त्याला आपले विजय प्राप्त करणे बरेच सोईचे गेले.

इतिहासतज्ञ डॉ. रविंद्र रामदास यांनी आपल्या इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी डचांच्या बरोबर केलेल्या व्यापारी करारातील एका कलमाकडे लक्ष वेधले आहे.

ते कलम असे, “बादशहाच्या कारकिर्दीत तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची परवानगी होती. पण आता माझ्या राज्यात स्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे.”

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!