“मी उद्यापासून येत नाही…” – प्रत्येक व्यवसायिकाची दुखरी नस
“मी उद्यापासून येत नाही…”
आजकाल हे वाक्य इतकं सहज, इतकं हलक्याफुलक्याने बोललं जातं, की त्यामागचा परिणाम काय असतो, याचा विचार करणंही आपण कुठेतरी थांबवलंय. एक कॉल, एक मेसेज, एक कारण — आणि एका क्षणात एखादा माणूस बाजूला होतो. पण तो माणूस फक्त एक कर्मचारी नसतो. तो एका टीमचा भाग असतो, एका प्रक्रियेचा महत्त्वाचा दुवा असतो, आणि अनेकदा एखाद्या व्यवसायिकाच्या वेळेने, पैशाने, संयमाने आणि विश्वासाने घडवलेला माणूस असतो.
एक व्यवसायिक एखाद्याला केवळ पगार देण्यासाठी ठेवत नाही. तो त्याच्यावर गुंतवणूक करतो — वेळेची, उर्जेची, अनुभवाची. प्रत्येक training, प्रत्येक meeting, प्रत्येक correction, प्रत्येक दुसरी संधी यामागे एकच उद्देश असतो — माणूस घडवणं, सिस्टम तयार करणं. पण ही सिस्टम उभी करताना किती वेळा त्या व्यक्तीसाठी Plan‑B वापरला गेला, किती वेळा स्वतःचा त्रास बाजूला ठेवून समजावलं गेलं, हे सगळं अचानक विसरलं जातं. आणि मग एका दिवसानं ऐकायला मिळतं — “मी उद्यापासून येऊ शकत नाही.”
इथे फक्त कामाचं नुकसान होत नाही, इथे विश्वास तुटतो. कारण त्या व्यक्तीकडे आपण माणूस म्हणून पाहिलेलं असतं. त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली असते. क्लायंट्स, timelines, delivery — सगळं त्याच्याशी जोडलेलं असतं. आणि अचानक एक निर्णय सगळं मोडून टाकतो. त्या एका वाक्यात फक्त एक resignation नसतं, तर एका व्यवसायिकाची अनेक रात्रींची जागरणं, अनेक दिवसांचा ताण आणि अनेक महिन्यांची planning कोसळते.
यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो.
“त्याला पगार मिळाला नाही.”
“त्याच्यावर अन्याय झाला.”
“त्याला अडवलं जात होतं.”
हे सगळं सांगताना फारसं कुणी विचारत नाही — काम पूर्ण झालं होतं का? जबाबदाऱ्या निभावल्या होत्या का? ज्या विश्वासावर पगार ठरतो, तो विश्वास टिकवला गेला होता का? पगार हा कामाचं मोजमाप असतो, पण कामाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या निभावल्या का, हे कोण विचारतो?
एवढंच नाही, तर लगेच काही self‑appointed mediators पुढे येतात. “थोडा विचार करा”, “तो गरीब आहे”, “त्याची अडचण आहे”, “त्याने मेहनत केली आहे.” हे सगळं खरं असू शकतं. पण मग एक साधा प्रश्न उरतो — ज्याच्याकडे जबाबदारी होती, ती अर्ध्यावर टाकून निघून जाणं योग्य ठरतं का? एखाद्याला पगार द्यावा, पण त्याचं काम अर्धवट राहिलं तरी चालेल, अशी अपेक्षा कुठून येते?
ही अडचण एखाद्या एका कंपनीपुरती नाही. ही आज जवळपास प्रत्येक व्यवसायिकाची रोजची वास्तवता आहे. कारण व्यवसायिक हा केवळ नफा बघत नाही. तो माणसं टिकवतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आणि अनेकदा स्वतःचा पगार थांबवून टीमचे पगार वेळेवर करतो. किती वेळा स्वतःची बिलं पुढे ढकलली जातात, फक्त टीमवर परिणाम होऊ नये म्हणून. पण या सगळ्याचा उल्लेख कुठेच होत नाही.
समाजात एक विचित्र समज तयार झाली आहे — जो व्यवसाय करतो, जो पैसा कमावतो, तो स्वार्थी असतो. पण कधी विचार केलाय का, की हाच व्यवसायिक किती घरं चालवतोय? किती लोकांच्या रोजच्या जेवणाशी, शिक्षणाशी, भविष्यासोबत जोडलेला आहे? आणि जेव्हा एखादा माणूस इतक्या सहजतेने निघून जातो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण ecosystem वर होतो.
आज कडक राहणं, शिस्त लावणं, grooming expect करणं — हे सगळं जणू गुन्हा झाल्यासारखं दाखवलं जातं. पण शिस्त नसती, तर व्यवसाय टिकला असता का? नियम नसते, तर सिस्टम उभी राहिली असती का? एखादा व्यवसायिक peak season आणि low season दोन्ही सहन करतो, स्वतःचे fluctuations adjust करतो, पण समाज मात्र त्याच्याकडून कायम समजूतदारपणाची अपेक्षा ठेवतो.
हा लेख कुणाविरुद्ध नाही. हा लेख कुणाची तक्रारही नाही.
हा लेख फक्त एक गोष्ट सांगण्यासाठी आहे — व्यवसायिकाची बाजूही ऐकली जावी.
आज समाजाला सहानुभूती हवी असेल, तर ती फक्त निघून जाणाऱ्यांसाठी नको. ती टिकणाऱ्यांसाठीही हवी. कारण जो टिकतो, तोच संधी देतो. जो सहन करतो, तोच रोजगार उभा करतो. आणि जो शांत राहतो, तोच सगळ्यात जड ओझं वाहतो.
व्यवसायिक हा शत्रू नाही.
तोच आधार आहे.
आणि आता…
त्याची बाजू ऐकण्याची वेळ आली आहे.
लेखक- अज्ञात
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
