यशस्वितेचे वाटेकरी, स्वप्नपूर्तीचे समाधान!
सोशल मीडिया: संवादाचे प्रभावी माध्यम
मराठी माणसाने व्यवसाय करावा, स्वयंरोजगारातून उत्कर्ष साधावा, यासाठी मागील जवळपास चार दशकांपासून मी विशेष प्रयत्न करीत आहे. मला अनुभवाने असे वाटते की, केवळ कूपमंडूक प्रवृत्ती आणि नवीन काही करायचे तर धाडसाचा अभाव यामुळे मराठी माणूस व्यवसायात मागे आहे. तो चाकरी करण्यातच धन्यता मानतो. त्यामुळे मी सतत व्याख्याने देतो, जिये बोलावणे येईल तिथे जाऊन युवा पिढीशी संवाद साधतो. त्यांच्या मनात व्यावसायिकतेचे बीज रोवण्याचा प्रयत्न करतो.
नगरच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योजकता विकास कार्यक्रम राबविला जातो. यात नव उद्योजकांना व्यवसाय निवड, प्रोजेक्ट रिपोर्ट, कर्जयोजना, शासनाच्या अनुदानाच्या योजना आदींबाबत माहिती दिली जाते, प्रशिक्षण दिले जाते. उद्योजक घडावेत, यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम शासनामार्फत राबविला जातो. मी स्वतः विमाव्यवसाय सुरू करण्याआधी १९९५ मध्ये या उपक्रमाचा लाभ घेतला होता. पुढे १९९७ पासून मी या उपक्रमात निमंत्रित व्याख्याता म्हणून सहभागी होऊ लागलो. मी तांत्रिक मुद्द्यांऐवजी युवकयुवतींना व्यक्तिमत्त्वविकासाचे धडे द्यायचो. त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधायचो. याचा अतिशय चांगला परिणाम व्हायचा. ऐकणाऱ्यांना चांगले मोटिव्हेशन (प्रेरणा) मिळायचे. माझ्या व्यावसायिक वाटचालीतील उदाहरणे त्यांच्यासमोर मांडल्यावर त्यांनाही खूप प्रेरणा मिळायची. अनेक वर्षे मी या उपक्रमाशी जोडला गेलो होतो. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन व समारोपाला माझे व्याख्यान ठरलेलेच असायचे. या कामासाठी मला ठरावीक मानधनही मिळायचे. पण ज्ञान विकायचे नाही, तर दान करायचे हे माझे तत्त्व असल्याने मी ते पैसे घ्यायचो नाही. त्या पैशातून प्रशिक्षणार्थीच्या चहानाष्ट्याची व्यवस्था करायचो. त्यामुळे त्यांच्यात आणखी उत्साह निर्माण व्हायचा. मित्रत्वाच्या नात्याने मी त्यांच्याशी संवाद साधायचो. त्यांच्यात उद्योजकतेची ज्योत प्रज्वलित करायचा प्रयत्न करायचो. या काळात मी अनेक शाळा, महाविद्यालये, इन्शुरन्स कंपनी, बँका, पतसंस्थेत व्याख्यानासाठी जायचो. प्रत्येक ठिकाणी समोरचा श्रोता वर्ग कोण आहे, हे व्यवस्थित पाहून मी माझे मनोगत व्यक्त करायचो व आजही हा उपक्रम चालूच आहे.
मागील वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यावर अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला. यात आमच्या विमा सेवा देणाऱ्या कंपनीतील प्रतिनिधी होते. “धुमाळसाहेब तुमची ती भाषणं, मोटिव्हेशनल व्याख्यानं आम्हाला परत परत ऐकावी वाटतात.” मीसुद्धा या गोष्टीने उत्साहित झालो. आष्टीचे आमचे एक स्नेही प्रा. भागचंद झांजे म्हणून… त्यांनी मला ‘ऑनलाईन व्याख्यान’ द्या, असे सांगितले. आता हे ऑनलाईन वगैरे माझ्या कची गावीही नव्हते. मला आपली हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलण्याची सवय. पण मी विचार केला, आता हे नवीन तंत्रज्ञान आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. प्रा. झांजे यांच्याच मदतीने मी पहिल्यांदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वविकासावर भाषण दिले. त्यानंतर पाथर्डीतील कै. दादा पाटील राजळे महाविद्यालयातील व्याख्यानमालेतील उद्घाटनाचे व्याख्यान ऑनलाईन देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. मला अनेकांचे फोन आले, ‘तुम्ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू करा’ असा आग्रह अनेकांनी धरला. मी ते मान्य केले. आमच्या हॉटेलचे मॅनेजर राजू वसाल व अनंत तापकिरे यांनी तांत्रिक बाजू पाहण्याचे मान्य केले. माझ्या अनेक फेसबुक लाईव्हसाठी त्यांनी तांत्रिक मदत केली. पुढे त्यांच्याच संकल्पनेतून ‘N.B.Dhumal यांच्या विचारांची यशोगाथा’ या फेसबुक पेजवर ‘यशस्विता’ या विषयावर पंचवीस लाईव्ह व्याख्याने दिली. नंतर यू ट्यूब चॅनलवरही व्याख्याने दिली. दोन्ही माध्यमांना प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.
याची दखल घेत दिल्लीतील ‘जोश टॉक’ या संस्थेने माझ्या कार्यावर एक व्हिडिओ तयार केला व त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर अपलोड केला. अवघ्या पाच महिन्यांत या व्हिडिओला दीड लाख लाइक्स मिळाले. एका नव्या माध्यमातून एकाच वेळी हजारो लोकांशी संवाद साधताना खूप मजा येते. मला स्वतःला पहिल्यापासून नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यामुळे सध्या या माध्यमाचाही पुरेपूर आनंद घेत माझ्या विचारांची शिदोरी लोकांना सढळ हाताने वाटत आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
