यशाचे गुपित
सरावाने मनुष्य यशस्वी होतो… Practice makes the man perfect
सराव, सराव आणि सराव… कोणत्याही दिग्गज कलाकाराला किंवा खेळाडूला त्याचे रहस्य विचारले तर तो हेच सांगेल. ‘हॉकीचे जादूगार’ अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांचे मूळ नाव ध्यानसिंग असे होते. ते रेल्वेत नोकरीला होते. त्यांच्यात हॉकी इतकी भिनली होती की, ते रात्री रेल्वेरुळावर सराव करत. रुळावर बॉल ठेवून तो हॉकी स्टीकने लांब अंतरावर खाली पडू न देता नेत असत. चंद्र प्रकाशात ते असा कसून सराव करीत असत. त्यामुळे लोक त्यांना ध्यानसिंग ऐवजी ‘ध्यानचंद’ म्हणू लागले. पुढे हेच नाव सर्वरूढ झाले. १९३२, १९३६, १९४८ मध्ये त्यांनी भारताला ऑलिंपिकमध्ये हॉकीचे सुवर्णपदक मिळवून दिले. १९३६ चे ऑलम्पिक जर्मनीत झाले. हिटलर तेव्हा जर्मनीचा सर्वेसर्वा होता. अंतिम सामना पाहण्यासाठी तो मैदानावर उपस्थित होता. आपल्या भारतीय खेळाडूंचे वूट फाटलेले होते. त्यावर जर्मनांनी शक्कल लढवीत संपूर्ण मैदानात पाणी मारले व चिखल केला. त्यामुळे फाटलेल्या बुटात पाणी जाऊन भारतीयांना खेळताना अडचण यावी, असाच त्यांचा इरादा होता. ध्यानचंद भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यांनी जर्मन मंडळींचा हा कावा ओळखला. त्यांनी सर्व टीमला सांगितले बूट काढून अनवाणी खेळायचे. असेच बिनबुटाचे खेळून भारतीयांनी अंतिम सामना सात विरुद्ध शून्य अशा फरकाने जिंकत सुवर्णपदक पटकाविले. ध्यानचंद यांच्या खेळाने हिटलर इतका प्रभावित झाला की, त्याने चक्क त्याला आपल्या देशाचे नागरिकत्व व मोठ्या पगाराची नोकरी देण्याची ऑफर दिली. पण देशाभिमानी ध्यानचंद यांनी ही ऑफर नाकारली. सराव, सराव आणि सराव या जोरावरच ध्यानचंद हॉकीचे जादूगार बनले सचिन तेंडुलकर एकदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना ऑस्ट्रेलियाचा ब्रॉड हॉग या नवोदित गोलंदाजाने
पहिल्याच बॉलवर सचिनला क्लिन बोल्ड केले. सचिनसारख्या जगातील सर्वोत्तम फलंदाजाची विकेट मिळाल्याने हॉगये विमान चांगलेच हवेत उडाले. मॅच संपल्यानंतर हंॉग सचिनकडे गेला व त्या ऐतिहासिक वॉलवर त्याने सचिनची स्वाक्षरी मिळविली. सचिनने स्वाक्षरी केली, पण त्या बॉलवर लिहिले की, ‘यापुढे परत तुला कधीच माझी विकेट मिळणार नाही. सचिनचा कोच शेजारीच होता. त्याने सांगितले, “तुला हे शब्द खरे करायचे असतील, तर हा बॉल व ही बॅट.” सचिन काय ते समजला. त्याने इतका सराव केला, इतका सराव केला की, त्याने रिटायर होईपर्यंत पुन्हा ब्रॉड हॉगला स्वतःची विकेट मिळवू दिली नाही. तब्बल सत्तावीस सामन्यांमध्ये त्याने हॉगच्या गोलंदाजीचा सामना केला. अनेकदा त्याची यथेच्छ पिटाई केली. अंतर्मनातून पेटून उठल्यामुळेच सचिनने आपला शब्द खरा करून दाखविला.
पाब्लो पिकासो हा अमेरिकेतील महान चित्रकार होता. त्याच्या कलाकृतीनी जगाला वेड लावलेले होते. एकदा तो अमेरिकेत एका हॉटेलमध्ये उत्तरला असताना एक चाहती त्याच्याकडे आली. तिने त्याला खूप आर्जव करीत एका कागदावर काही तरी रेखाटून देण्याची व स्वाक्षरी देण्याची विनंती केली. पिकासोने त्या चाहतीची अजीजी पाहून तिथल्या तिथे तीस सेकंदांत कागदावर चित्र रेखाटून त्या खाली आपली स्वाक्षरी केली. तो कागद घेऊन ती चाहती खूप आनंदित झाली. तिने अनेकांना तो कागद दाखविला. एक जण तिला म्हणाला, “तुझ्या हातातील कागदाची किमत तीस लाख डॉलर्स मिळतील इतकी आहे.” तिने आणखी चौकशी केल्यावर तिचा या गोष्टीवर विश्वास बसला. ती चाहती खूपच आश्चर्यचकित झाली. काही सेकंदांत चित्र काढून इतके पैसे मिळत असतील, तर आपणही ते शिकायला पाहिजे, असे तिला वाटले. पुढे एकदा अचानक तिची व पिकासोची पुन्हा भेट झाली. तिने त्याला आधीच्या भेटीची आठवण करून दिली व ‘मलाही चित्रकला शिकवा’ अशी विनंती केली. “तुम्ही तीस सेकंदांत चित्र काढता व त्याला कोट्यवधींची किंमत येते! मलाही ते शिकवा.’ असे म्हणू लागली. त्यावर पिकासो तिला म्हणाला, ‘तीस सेकंदांत चित्र काढता येण्यासाठी मी माझ्या आयुष्याची तीस वर्षे घासली आहेत. तेव्हा कुठे आता तीस सेकंदांच्या चित्राला तीस लाख डॉलर मिळतात.” पिकासोचे हे उदाहरण सरावाचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसे आहे. म्हणूनच म्हणतो, यश मिळवायचे, तर सातत्य हवे, सराव हवा. एका कागदावर तुमचे ध्येय लिहून ठेवा, पेटून उठा, सराव करा, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत सराव करीतच रहा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
