व्यवसायाचे बीजारोपण

व्यवसायाचे बीजारोपण

मी देशपांडेला म्हणालो, “अरे, मुंबईहून लंडनचं भार्ड किती असेल रे विमानाचं?” तर बाजूला उभा एक माणूस म्हणाला, “शेळी कधी उंटाचा मुका घेते का? माणसाने नेहमी आपल्या औकातीत राहावं,” माझी नोकरी अतिशय व्यवस्थित चालू होती. प्रमोशन मिळत होते. पगारही चांगल्यापैकी असल्याने गावाकडेही आवश्यक ती मदत करीत होतो. या दरम्यान मिळणारा रिकामा वेळ मी पुस्तके वाचून सत्कारणी लावायचो. त्यातही मोठमोठ्या उद्योजकांची चरित्रे मी वाचायचो. शून्यातून विश्व कसे निर्माण होते, हे त्या पुस्तकांतून कळत होते. मला स्वतःलाही मोठे स्वप्न पाहायची आवड होती. या आधीच सांगितल्याप्रमाणे जेव्हा आमच्याकडे सायकलसुद्धा नव्हती, तेव्हा मला आजोबांनी जीप घेण्याचे स्वप्न दाखविले होते. त्यामुळे आजोबांचा प्रभाव माझ्यावर होताच. काही तरी भव्यदिव्य करावे, अशी मनात इच्छा असायची. पण म्हणतात ना, सोने जरी मौल्यवान असले, तरी त्याला झळाळी येण्यासाठी त्याला पेटत्त्या अग्निकुंडातून प्रवास करावाच लागतो. कुठून तरी एक जोर का झटका बसावा लागतो. त्याने पेटून उठले पाहिजे. माझ्याबाबतीत असाच एक प्रसंग घडला. तो माझ्या व्यवसायाचे बीजारोपण करणारा ठरला.

“औकात आहे का तुमची ?”

झाले असे की, बँकेच्या कामानिमित्त पहिल्यांदाच मी व माझे सहकारी देशपांडे असे दोघे मुंबईला गेलो. सकाळी एसटीने मुंबई सेंट्रलला उतरलो. तेव्हा रस्त्यावरच मुंबईचा वाटाड्या हे चार आण्याचे पुस्तक विकत घेतले. मुंबई महानगरीची आपल्याला जवळून ओळख व्हावी एवढीच इच्छा होती. त्या पुस्तकात बसचे मार्ग, बस क्रमांक सगळे दिलेले होते. आमचे बँकेचे काम तासाभरात संपले. औरंगाबादला जायला संध्याकाळी बस असल्याने दिवसभरात आम्ही मुंबईदर्शन करण्याचे ठरविले. मला विमान पाहण्याची खूप इच्छा होती. तोपर्यंत विमानाचे दर्शन आकाशातच कधी तरी व्हायचे. प्रत्यक्ष विमान पाहण्याचा योग काही आला नव्हता. बसायचा विषय तर लांबच राहिला. मित्राला मी सांगितल्यावर आम्ही दोघे सांताक्रूझला विमानतळावर गेलो. तिथल्या काचेतून मी पहिल्यांदा इतक्या जवळून विमान पाहिले. मी देशपांडेला म्हणालो, “अरे, काय बंबाडच्या बंबाड आहे (किती मोठं) विमान.” मी त्याला विचारले, “मुंबईहून लंडनचं भाडं किती असेल रे विमानाचं?” देशपांडेने मला न्याहाळले आणि म्हणाला, “अरे धुमाळ पाटील, ज्या गावाला जायचं नाही, त्या गावचा रस्ता विचारायचा नसतो.” आमचे बोलणे ऐकत बाजूला उभ्या असलेल्या एका माणसाने तर कहरच केला. तो म्हणाला, “तुमचं नाव काय?” मी म्हणालो, “धुमाळ पाटील.” तो परत म्हणाला, “तुम्ही कुठले?” मी सांगितले, “मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा हे माझं गाव.” त्यावर तो म्हणाला, “तुमच्या गावाकडे शेळी कधी उंटाचा मुका घेते का?” मला काही समजेना. तो पुढे म्हणाला, “माणसाने नेहमी आपल्या औकातीत राहावं.” मी परत विचारले, “म्हणजे काय?” तो उत्तरला, “तुमची औकात शेतात उभे राहून वरून जाणारं विमान पहाण्याची आहे. तेवड्यावरच समाधान मानायचं. तुम्ही कशाला विमानाचं लंडनपर्यंतचं भार्ड विचारता आहात ? औकात आहे का तुमची इतकी?” माता त्या माणसाच्या बोलण्याचा खूप राग आला. त्याला पायातील चप्पल काढून तुडवावे असे वाटले. पण मी स्वतःला सावरले. आधीच मुंबईत आपण नवीन आहोत, इथे ओळखीचे कोणी नाही. असा विचार केला. मी आपले काचेतून विमान न्याहाळत होतो.लोक ऐटीत सिडीवरून विमानात चवत होते. मी त्यांचे निरीक्षण केले. नंतर मी या गोष्टीचा खूप विचार केल्प, विमानात बसणाऱ्या त्या लोकांमध्ये आणि माझ्यात काय फरक आहे? त्यांना देवाने माझ्यासारखेच दोन हात, दोन पाय, दोन डोळे असे सगळं काही दिलेय. मग ते विमानात बसू शकतात, मी का नाही? मी स्वतःलाच असा प्रश्न विचारला. त्यांच्याकडे पैसे आहेत, तर माझ्याकडे नाहीत हा फरक मला जाणवला.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!