सुवर्णमंत्र

सुवर्णमंत्र

शके बाराशते बारोत्तरे। तै टीका केली ज्ञानेश्वरे। सच्चिदानंद बाबा आदरे। लेखकू जाहला शज्ञानदेवांनी शके १२१२ (इसवी सन १२९०) मध्ये नेवासा नगरीत पैसाच्या खांबाला टेकून समोरच्या श्रोतृवृंदाला गीतेवर प्राकृत भाषेत निरूपण केले, ते श्री सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतले. असा ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या लेखनाचा इतिहास आहे.

नाथमहाराज ज्ञानेश्वरीबद्दल म्हणतात, ‘भाव धरोनी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी।’ भाव म्हणजे श्रद्धा, भक्ती, निष्ठा, विश्वास… या गोष्टी मनात धरून ज्ञानेश्वरी वाचल्यावर भगवंताची कृपा नक्की होते.अशाच भक्तिभावाने मी माझ्या आयुष्याच्या वाटचालीचे, यशस्वितेचे सिंहावलोकन केले. या वाटचालीत मला आलेले चांगलेवाईट अनुभव, मला वेळोवेळी मिळालेली प्रेरणा, माझे प्रेरणास्रोत, त्यांचे विचार व त्यानुसार मी केलेली कृती मला मार्गदर्शक ठरली. हेच विचारांचे सोने, ज्याने माझे जीवन सोनेरी केले, ते माझ्या या आत्मचरित्राच्या पुढच्या भागात मी सर्वांसमोर ठेवत आहे. मी दिलेला हा विचार व त्याला तुमच्या कर्तृत्वाची, श्रद्धेची व कष्टाची जोड मिळाल्यास तुमच्यापैकी प्रत्येक जण नक्की यशस्वी होऊ शकतो, हे मी विश्वासाने व स्वानुभवाने सांगू शकतो.

या पुस्तकाच्या पहिल्या भागात मी माझ्या वयाच्या चौसष्ठाव्या वर्षापर्यंतचा प्रवास मांडला आहे. १९७९ ते २०१४ हा कालखंड माझ्यासाठी प्रचंड मेहनतीचा होता. ‘यश, यश आणि यश’ या गोष्टीने मी पछाडलो होतो. अर्जुनाला जसा पोपटाचा फक्त डावा डोळाच दिसत होता, तसे मला फक्त आणि फक्त यशाचे शिखर व तिथे मी रोवलेला झेंडाच दिसत होता. या काळात नातेवाइकांची लग्ने, बारसे, दहावे तेरावे, इतर कार्यक्रम माझ्यासाठी जणू अस्तित्वातच नव्हते. ‘वन मॅन आर्मी’ प्रमाणे मी व्यवस्थापन, सेल्स, मार्केटिंग या वेगळ्याच जगात रममाण होतो. देहभान विसरून काम करणे म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझे या काळातील काम. व्यवसायानिमित्त मी ऐंशी टक्के महाराष्ट्र पिंजून काढला, भारताच्या सर्व राज्यांच्या राजधानींना भेटी दिल्या, अर्धे जग पालथे घातले. या काळात मी दहा लाख किलोमीटरचा प्रवास केला व तोही कारने.

‘बडी सोच, कडी मेहनत और पक्का इरादा’ या जोरावर ‘यशस्विता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ याच विचारांनी मी कृती करीत राहिलो. चांगले वाचणे, चांगले विचार ऐकणे, चांगले बोलणे म्हणजेच प्रभावी भाषण या गोष्टींवर मी भर दिला. कॉलेजमध्ये असल्यापासून मला वाचनाची गोडी लागली. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, मृत्युंजय, श्रीमान योगी, छावा, पानिपत, माझे सत्याचे प्रयोग, स्वामी विवेकानंद अशी अनेक पुस्तके मी वाचली. व्यवसायात उतरल्यानंतर भारतातील व जगभरातील अनेक यशस्वी व्यक्तींची चरित्रे वाचली. त्यांची यशस्विता समजून घेतली व त्यांचे विचार आचरणात आणण्याची कायम धडपड केली. यात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, कर्मवीर भाऊराव पाटील, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, रतनजी टाटा, अजिज प्रेमजी, धीरूभाई अंबानी, नारायण मूर्ती, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन, इंदिरा नूयी यांची चरित्रे मला भावली.

लॉ ऑफ सक्सेस, चिंक अँड यो रिच, अॅटिट्यूड इज एव्हरीचिंग, रिच हॅड पुअर बँड, शिवाजी द निजमेंट गुरू अशी अनेक पुस्तके माझी प्रेरणास्रोत बनली. माझ्या यशोमार्गाची ‘वाटाडी’ बनली. व्यवसायानिमित्त देत असलेल्या भाषणात मी ऐंशी टक्के भाषण ‘यश म्हणजे नेमके काय व ते कसे

मिळवावे?’ यावर करीत असे. त्यामुळे श्रोत्यांमध्ये वीस-पंचवीस टक्के लोक अशी असत की, त्यांचा माझ्या व्यवसायाशी काहीही संबंध नसे. फक्त माझे विचार ऐकायला ते आलेले असत. यातून माझी व कंपनीचीही प्रतिमा निश्चितच वर्धिष्णू झाली. मी कायम ‘मागण्याअगोदर देणारे व्हा’ हा ‘लॉ ऑफ सक्सेस’मधील थदा आचरणात आणला. यातून जाहिरातीविनाही यश मिळू शकते, हे मी ‘पतंजली’च्या रामदेव बाबा यांच्याकडून शिकलो. रामदेवबाबांनी फक्त मोफत योग शिबिरे घेतली. यातून योगाचा प्रसार झालाच पण त्यापेक्षाही पतंजलीच्या उत्पादनांचा प्रचंड प्रसार झाला. पतंजली हा स्वदेशी बँड बनला व तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला, २०२०० २१ मध्ये पतंजलीची उलाढाल २५ हजार कोटींवर पोहचली आहे.

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।

उदास विचारें वेच करी।

जगद्‌गुरू तुकोबारायांचे हे शब्द कायम दृष्टीसमोर ठेवून मी आतापर्यंतचे आयुष्य जगलो. धन जोडण्याचा व्यवहार उत्तम ठेवला. बँकेतील नोकरी म्हणजे ठेवीदारांचे धन सुरक्षित ठेवून बँकेचा खजिना कसा वाढेल यासाठी केला आणारा आटापिटा. स्टेट बँकेत नोकरी करीत असताना मी ‘मन’ लावून काम करीत पगाराच्या माध्यमातून ‘धन’ जोडत होतो. मन मात्र ‘आणखी धन जमव’ यासाठी उद्युक्त करीत होते. त्यासाठी अन्य काही तरी करून धनसंचय आणखी वाढवावा, यासाठी मी विमाक्षेत्रात उतरलो. आपल्याला ‘धनको’ अर्थात सावकार नाही व्हायचे, परंतु धनवान मात्र जरूर व्हायचे आहे, ही खूणगाठ मनात पक्की बांधली आणि त्या प्रमाणे मी वाटचाल सुरू केली.

बँकेत वर्षअखेरीस ‘ताळेबंद’ अर्थात ‘बॅलन्सशीट’ला जसे महत्त्व दिले जाते, तसेच महत्त्व जीवनात वावरताना आपल्या ‘बॅलन्सशीट’ला द्यावे लागते. त्यासाठी ‘प्रॉफिट अँड लॉस अकाउंट’कडे कायम लक्ष देणे जरूरीचे असते, प्रॉफिट बाजू ही केव्हाही लॉसच्या बाजूपेक्षा वरचढ असली, तरच बँकेचा गाडा व्यवस्थित चालतो. जीवनाच्या बँकेचेही तसेच आहे. त्यासाठीच ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे’ हा विचार बाळगून वागावे लागते. जाणारे ‘चेक’ कमी आणि येणारे ‘चेक’ जास्त असले, तरच आपले ‘पासबुक’ धनाने जड होईल. त्यासाठीच मी व्यवसायाची कास धरली. विमा सेवा कंपनी काढून लोकांना नुकसानभरपाईचे ‘चेक’ देतादेताच माझ्या ‘अकाउंट’मध्येही चेक जमा होण्याचे प्रमाण वाढले. पैसा मोठ्या प्रमाणावर खेळू लागला. त्यातूनच अन्य व्यवसायांतही उडी घेत तिथेही मी यशस्वी होत गेलो.

आजोबांनी ‘खूप मोठा हो आणि आपल्या घरासमोर जिपडं उभं कर’ असे म्हणून जे स्वप्न दाखविले, ते स्वप्न मी जागवत केवळ ‘सपनों का सौदागर’ न होता प्रत्यक्षपणे धनाचा ‘सौदागर’ झालो, ‘धनवान’ झालो. ‘नसीब’ काढण्यासाठी खूप कष्ट घेतले. एक ग्रामीण माणूस सर्व काही ‘मुकद्दर’ वर न टाकता व कसलीही ‘हेराफेरी’ न करता ‘खून पसीना’ एक करून ‘मुकद्दर का सिकंदर’ होऊ शकतो, हे मी दाखवून दिले. या वाटचालीत ‘जिगरी दोस्त’ हे ‘जानी दुश्मन’ झाल्याचेही अनुभवले आणि त्यातूनच ‘जागते रहो’ हा धडा घेतला. ‘नमक हलाल’ हा पिंडच असल्याने ‘बेइमान’ वागणे कधी जमले नाही. ‘अराउंड द वर्ल्ड’ फिरलो. ‘पूरब और पश्चिम’ मधला फरक न्याहाळला. तरीही ज्ञानोबा व तुकोबा यांचे गायन करणारा ‘मेरा गांव मेरा देश’ हेच आपले कार्यक्षेत्र ठरविले. ‘गरिबों की सुनो, वह तुम्हारी सुनेगा। तुम एक पैसा दोगे, वह दस लाख देगा’ हे हिंदी चित्रपटातील गाणे किती अर्थपूर्ण आहे, हे गरीब शेतकऱ्यांना विम्याचे धनादेश देताना वाटून जायचे. त्या शेतकऱ्यांना मी माझ्या खिशातले पैसे दिले नाहीत; परंतु ते त्यांना मिळवून देण्याचे कार्य माझ्या हातून घडले, यातच मला धन्यता वाटते. मराठी तरुणांना माझे हेच सांगणे आहे, की ‘जिद्दी’ने ‘जिंदगी’ची ‘सफर’ घडवा. यशस्वितेचा
‘शोले’ मनात भडकला की ‘जीने के राह’ आपोआपच बनत जाते. ‘अभिमान’ अर्थात जरूर असावा, पण ताठा अर्थात अयोग्य गर्व कधीच असू नये. परमार्थ, अध्यात्म, मांगल्य यांचा अंगीकार करावा. वाचन, मनन, चितन जरूर करावे. वाईट व्यसनांपासून नेहमी अलिप्त असावे. ‘एकच प्याला’ दूर ठेवला की, ‘पुण्यप्रभाव’ वाढतो आणि ‘भावबंधन’ अधिक घट्ट होत जाते. या साऱ्या गोष्टी केल्या, काही पथ्ये पाळली की, मग ‘यशस्विता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच!’ असे उच्चरवाने म्हणायला काहीच संकोच वाटणार नाही. जीवन केवळ संपत्तीनेच नव्हे तर सर्वांगाने यशस्वी होते आणि यशासारखे दुसरे काहीही नसते. माझ्या या पुस्तकातून कोणी जर प्रेरणा घेऊन यशस्वी झाले, तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन ! माझे संवादकौशल्य, विमाक्षेत्रातील अनुभव, त्यात मला मिळालेले यश यामुळे अनेक विमाकंपन्यांनी भारतासह लंडन, सिगापूर येथे मला निमंत्रित केले. तिथे मी संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनातील तसेच विक्रीअधिकाऱ्यांसमोर माझे विचार मांडले. याशिवाय अनेक शाळा, महाविद्यालये, जिल्हा उद्योग केंद्र, सामाजिक कार्यक्रमांत माझ्याकडील विचारधन दिले. असे म्हणतात की, एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला जेवण दिले, तर त्याची एकवेळची पोटाची भूक भागेल. पण त्याला कमाईचा मार्ग दाखविला, तर त्याची आयुष्यभराची भ्रांत मिटेल. हाच मार्ग प्रत्येकाला पुस्तकाच्या या दुसऱ्या भागात गवसला पाहिजे, हीच माझी प्रामाणिक इच्छा व तळमळ आहे…..!

॥ॐ नमः शिवाय।।

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!