‘स्टार्टअप’

‘स्टार्टअप’

पुनश्च हरि: ॐ

भागीदारांकडून फसवणूक झाली, तेव्हा मी निराश झालो होतो. पण मी स्वतःला सावरले, तेव्हा माझी दोन्ही मुले लहान होती. शाळेत शिकत होती. या काळात मला पत्नी सुनंदाने खूप साथ दिली. तिने मला विश्वास दिला की, “तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करा. तुम्हाला नक्की यश मिळेल,” माझ्या भागीदारांची माझी जवळपास सोळा-सतरा वर्षांची मैत्री होती. पण त्यांनी दोस्तीत कुस्ती केली होती. ‘ये दोस्ती हम न तोडेंगे’ च्या ऐवजी ‘दोस्त दोस्त न रहा’ या गाण्याचा प्रत्यय आला. पैशासाठी माझी फसवणूक केली गेली होती. तीन वर्षे भी प्रचंड मेहनत करून व्यवसाय उभा केला होता. वैभव उभे केले होते. आता हे सगळे सोडून मी स्वतंत्र कंपनी स्थापन करायचा विचारही करणार नाही, असेच त्यांना वाटत होते. त्यामुळे मी स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन ते सांगतील, तसे निमूटपणे ऐकेन, असाच त्यांचा अंदाज होता. पण ‘शेर भूखा भी होगा, तो घास नहीं खाएगा’ ही म्हण त्यांना कदाचित माहिती नव्हती. मी तर डिवचला, दुखावला गेलेला वाघ होतो. मोठी झेप साधण्याआधी व शिकार करण्यासाठी वाघालाही चार पावले मागे यावे लागते. मीही असाच काही पावले मागे आलो व नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झालो. नव्या सहस्रकात बरोबर २६ फेब्रुवारी २००१ ला मी माझी दुसरी स्वतःची एकट्याची कंपनी सुरू केली, ‘लाईफ लाईन लाईफ केअर सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीची मुहूर्तमेढ रोवल्यावर मी पुन्हा त्याच जोमाने कामाला सुरुवात केली. पूर्वीच्या कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, माहितीपत्रके, स्कीम मीच तयार केलेली होती. नव्या कंपनीत मी त्याचा वापर सुरू केला. काही प्लॅनमध्ये सुधारणा करून कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी फिल्ड केअर प्लॅन सुरू केला. माझा असा स्वतंत्र व्यवसाय सुरू झाल्यावर पहिल्या कंपनीतील तिघांचा जळफळाट झाला. ते मला त्रास देऊ लागले. त्यांनी माझ्याविरुद्ध कॉपीराईटचीही केस केली. या सर्व कायदेशीर लढाईत मला अॅड. देशपांडे यांची खूप मदत झाली. भागीदारांनी जरी विश्वासघात केला असला, तरी पूर्वीच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचा माझ्यावर विश्वास होता. आपल्याला धुमाळसाहेबांच्या कंपनीतच भविष्य आहे, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्या कंपनीतील जवळपास ७० टक्के कर्मचारी व फिल्ड स्टाफ माझ्या नव्या कंपनीत जॉईन झाला. याला मी ‘माणसे कमावणे’ असं म्हणतो. अशी माणसेच तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यात मदत करतात. माणसे सांभाळण्याचं माझे कसव माझ्या असे कामी आले. माझ्या पत्नीचे सोने तारण ठेवून कर्ज काढले व नगर आणि औरंगाबादला आमच्या कंपनीचे शाखा कार्यालय सुरू केले. मी खूप जोमाने काम सुरू केले. सोबत ३६५ क्रमांकाची अॅसेंट हुंडाईची कार होती. फक्त आता त्या कारला मी ड्रायव्हर दिला होता. आठवड्यातून पाच दिवस मी दौऱ्यावर जायचो. दोन दिवसच नगरला मुख्य कार्यालयात थांबायचो. आधी झालेली फसवणूक मला स्वस्थ बसू देत नव्हती. मला ही कंपनी नावारूपाला आणायची होती. रात्रंदिवस मेहनत घेत मी व्यवसाय करीत होतो. पहिल्याच वर्षी माझ्या कंपनीने पूर्वीच्या कंपनीने तीन वर्षात केलेला व्यवसाय एका वर्षात केला. माझी गीतांजली एक्स्प्रेस सुसाट निघाली होती. माझा ‘शोले’ मला गवसला होता. मी ध्येय ठेवले होते भारतातील एक नंबरची कंपनी बनवायची. विमा हा सर्वात मोठा सेवा उद्योग बनवून त्यात टॉपवर राहायचे, असा निर्धारच मी केला होता. शंभूमहादेवाची कृपा, आईवडिलांचे आशीर्वाद, पत्नीची खंबीर साथ यामुळे माझे ते स्वप्नही पूर्ण झाले.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!