स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल
पालकांनो, तुमच्या मुलाला जंगलातील सिंह बनवा
सिंह हा जंगलाचा राजा असतो. एका गर्जनेने तो अख्खे जंगल हादरवून सोडतो. परंतु काही शिकारी शिताफीने सिहाला जेरबंद करतात. एकदा सर्कशीत गेल्यावर सिहाची भिगी बिल्ली होते. त्याला पिंजऱ्यात राहावे लागते. आयते खायला मिळाल्याने तो शिकार करण्याचा आपला मूळ स्वभावही विसरून जातो. रिंगमास्टरच्या तालावर नाचायचे, एवढेच त्याला कळते. पुढे अचानक सर्कस बंद पडल्यावर मालकालाही त्याला पोसणे अवघड होऊन जाते. अशा वेळी त्याला पुन्हा जंगलात मुक्त केले जाते. परंतु जंगलात परत आलेल्या सिंहात आता बदल झालेले असतात. त्याला आयते खायची सवय लागलेली असते. तो अक्षरशः उपाशी पडून राहतो. अशा वेळी मग जंगलात भटकणारे एखादे जंगली कुत्रेही त्याला घाबरवून सोडते. कुत्र्याशीही लढण्याची मानसिकता सिंहामध्ये नसते. कुत्र्यांनी एकदा हे ओळखल्यावर ते झुंडीने त्याच्यावर हल्ला करतात व तो घाबरून पळतो. यातच त्याचा फडशा पडतो. NEE
हे का घडले ? कारण सिंहाला आयते सगळे काही मिळण्याची सवय लागली म्हणून. यासाठीच तुम्ही तुमच्या मुलांना सर्कशीतील सिंह करू नका. त्याला शिकार करायची सवय लावा.
हनुमान उडी
रावणाने सीतामातेला पळवून लंकेला नेल्यावर प्रभू श्रीरामचंद्र वानरसेनेला घेऊन सीतेचा शोध घेऊ लागले. समुद्रकिनारी पोहोचलेल्या वानरांच्या एका पथकाला लंका दिसते. पण समुद्र ओलांडून लंकेत जाणार कोण? असा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी त्या पथकातील ज्येष्ठ सदस्य असलेला जांबुवंत हनुमानाला पाचारण करतो. हनुमान त्याला विचारतो, “लंकेत जायचं, तर हा समुद्र कसा पार करायचा, मी कसा काय तिथे जाऊ शकतो?” त्यावर जांबुवंत हनुमानाला त्याच्यातील ताकदीची जाणीव करून देतो, “जन्मतःच तू सूर्याचा घास घेण्यासाठी झेप घेतली होतीस. आज एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तू सहजतेने उडी मारू शकतोस, तशीच या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत तू सहज उडी घेऊ शकतोस! तू आपले आराध्य दैवत प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन प्रयत्न केल्यास हे सहज शक्य आहे.” जांबुवंताच्या या प्रोत्साहनाचा सकारात्मक परिणाम होऊन हनुमान उडी घेतो व लंकेत दाखल होतो. यालाच ‘हनुमान उडी’ म्हणतात. मित्रांनो, आपल्या प्रत्येकात अशी हनुमान उडी घेण्याची क्षमता असते. फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे. आईवडील, गुरुजनांवर विश्वास ठेवून मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यात नक्की यशस्वी होऊ शकता येते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
