स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल
मुलांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्या
भारतीय मुलांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता, बुद्धिमत्ता प्रचंड आहे. परंतु त्याला योग्य खतपाणी घातले जात नाही. त्यांच्यातील प्रचंड ऊर्जा चुकीच्या दिशेने नेली जाते. मुलाच्या मनावर लहानपणापासून शाळा-कॉलेजात शिकणे, डिग्री मिळविणे आणि नोकरीला लागणे एवढेच बिंबविले जाते. अक्षरशः डोळ्यांना झापडे बांधली जातात. त्याचा नैसर्गिक कल कोणत्या गोष्टीकडे आहे, त्याला काय आवडते, याचा विचारच केला जात नाही. त्याने कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे त्याचे आईवडीलच ठरवितात. आई म्हणते, ‘डॉक्टर हो,’ वडील म्हणतात, ‘इंजिनिअर’ तर शिक्षक म्हणतात, ‘तू चित्रकलेत करिअर कर.’ परंतु प्रत्यक्षात मुलाची आवड आणखी वेगळीच असते. अशा त्रांगड्यामुळे मुलांच्या भविष्याची वाट लागते. कारण बिनआवडीच्या क्षेत्रात तो तितका चमकत नाही. त्याचे मन त्यात रमत नसते. खरे तर आईवडील, शिक्षक हे मुलांचे पहिले गुरू असतात. त्यांनी त्याचा कल लवकर ओळखला पाहिजे. त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे तसे होत नाही. मुलांना जर प्रोत्साहन दिले, तर ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात अटकेपार झेंडे रोवल्याशिवाय राहणार नाहीत,
जपानसारख्या प्रगत राष्ट्रात वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच शास्त्रीय पद्धतीने मुलांची कलचाचणी घेऊन त्याप्रमाणे त्यांना घडविले जाते. त्यामुळेच हा भारताच्या तुलनेत अतिशय छोटा असलेला देश ऑलिंपिकमध्ये शंभराहून अधिक पदके मिळवितो. त्याचवेळी १३७ कोटींचा भारत एखादे दुसरे पदक मिळाले, तरी जग जिकल्यासारखा जल्लोष करतो. युरोप अमेरिकेतील शास्त्रज्ञ अनेक शोध लावून पेटंट मिळवितात. यालाही नैसर्गिक कल ओळखणे हेच एक कारण आहे.
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, तो कोणत्या शाळेत जाऊन नाही लावला. तो तर जंगलात सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. सफरचंद झाडावरून खाली पडल्यावर त्याची बुद्धिमत्ता उफाळून आली. सफरचंद वर न जाता खालीच का पडले, असा वेगळा विचार त्याने केला व त्यातून एक मोठा शोध त्याने लावला. तो जर शाळेत बसून राहिला असता, तर ना सफरचंद त्याच्या डोक्यावर पडले असते, ना गुरुत्वाकर्षणाचा शोध त्याने लावला असता. न्यूटनने शोध लावण्याअगोदरही गुरुत्वाकर्षण शक्ती होतीच; परंतु न्यूटनमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृती झाली, ती इतरांत नाही.
ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्याकडे कोणत्याही शाळेची डिग्री नव्हती. पण तरीही ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी जगाला दिशा देणारी ज्ञानेश्वरी लिहिली. संत तुकाराम महाराजांनी प्रबोधन करणारे दहा हजार अभंग लिहिले. अक्षरओळख होणे म्हणजे निरक्षरचे साक्षर होणे. साक्षरतेतून मग शिक्षित अन् पुढे सुशिक्षित होता येते. सुशिक्षित झाल्यानंतर वाचन, अभ्यास आणि व्यासंग या तीन पायऱ्या पार केल्यास जीवनातील ज्ञानाची कवाडे किलकिली होतात. केवळ पदव्या मिळवून ज्ञानी होता येत नाही. मिळविलेल्या ज्ञानाचा जीवनात सुयोग्य पद्धतीने वापर करणे आणि यश मिळविणे यात खरा पुरुषार्थ आहे. ज्ञानाची पुढची पायरी व्यवहारज्ञान म्हणता येईल. व्यवहारज्ञानाचा वापर केवळ भौतिक जीवन उंचावण्यासाठीच करावा असे नाही. मी कसा होतो, कसा झालो आणि पुढे काय करायचे, कसे वागायचे, वर्तन कसे ठेवावे असा सर्वांगाने विचार करून पैशाबरोबरच आपले चारित्र्य कसे चांगले निर्माण होईल, हे पाहावयास हवे. मी या सर्व गोष्टींचा विचार करून एकेक पाऊल पुढे टाकत गेलो. आपले हित साधत असताना कोणाचे अहित होईल, असे आपल्या हातून घडू नये, असे पथ्य पाळावे. पैसा कमावताना नाव खराब होऊ नये, याची दक्षता घेणे म्हणजे खरे ज्ञान. लांड्यालबाड्या करून पैसा कमावण्यासाठीही ज्ञान लागते; परंतु ते सन्मार्गी नव्हे याची जाणीव ठेवून मी पुढे जात राहिलो. संतांची शिकवण यापेक्षा वेगळी नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी या गोष्टीही आवश्यकच आहेत.
शिक्षणाचा अर्थ फक्त पदवी, डिग्रीचा कागद मिळविणे नाही, तर ज्ञान मिळविणे आहे. त्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करून यश मिळविणे हा आहे. दुर्दैवाने आपल्याकडे शिक्षण व नोकरी अशी सांगड घातली गेल्याने बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. ग्रामीण भागात तर बी. ए. म्हणजे बेकार आणि एम. ए. म्हणजे मोकार असेच
चित्र आहे. अशा बेकारांची संख्या कमी करायची, तर मुलांना आवडीच्या क्षेत्रात पाठवून त्यात टॉपर बनण्यास बळ दिले पाहिजे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
