स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल
भारतरत्न
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर जर फक्त शाब्यच शिकत बसला असता आणि दुसरे काहीच केले नसते, तर त्याला ‘भारतरत्न’ कशासाठी मिळाले असते? त्याला क्रिकेट सोडून बळजबरीने इतर क्षेत्रात पाठविले असते, तर आपण एक दिग्गज क्रिकेटपटू तसेच भारतरत्नाला नक्कीच मुकलो असतो. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गायनाऐवजी चित्रकला क्षेत्रात बळजबरीने पाठविले असते, तर त्या इतक्या यशस्वी झाल्या असत्या का? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स वयाच्या सातव्या आठव्या वर्षांपासून संगणकावर खेळत होता. तासन् तास तो संगणकाच्या दुनियेत रमत असल्याने अवघ्या चौदाव्या वर्षी त्याने ट्रैफिक सिग्नलचा प्रोग्राम लिहिला व चौदाव्या वर्षी चौदा लाख रुपये कमावले, हेच जर तो शाळेत बसला असता, तर पुढे मायक्रोसॉफ्ट कंपनीसारखा इतिहास घडला असता का? छत्रपती शिवाजीमहाराज यांना राजमाता जिजाऊंनी लहान वयातच रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगून प्रेरणा दिली. त्यांच्यात वीरश्री निर्माण केली. पाच-सात वर्षाचे असताना त्यांना घोडेस्वारी, दांडपट्टा, युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले. जर हे शिक्षण त्यांना मिळाले नसते, तर शिवाजीमहाराज हे शिवछत्रपती झाले असते का?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही प्रचंड बुद्धिमान होते. डॉक्टरेटसह अनेक पदव्या त्यांनी मिळविल्या. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून त्यांना ओळखले जाते. हेच जर त्यांना दुसऱ्या क्षेत्रात काम करायला भाग पाडले असते, तर ते राज्यघटना लिहू शकले असते का? डॉ. आंबेडकर यांनी आठ वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या सव्वादोन वर्षांत पूर्ण केला. कारण त्यांना अभ्यासाची, नवनवीन ज्ञान मिळविण्याची आवड होती.
आता माझे स्वतःचे उदाहरण घेऊ. माझा जन्म मराठवाड्यातील एका सर्वसामान्य जिरायती शेतकरी कुटुंबात झाला. जर मला शेतीतच कामाला जुंपले असते, तर मी बँकेत नोकरीला लागलो असतो का? बँकेत नोकरी करतानाही मी वेगळा निर्णय घेऊन व्यवसायाकडे वळलो नसतो आणि बँकेतच राहिलो असतो, तर फार तर मॅनेजर किवा रिजनल मॅनेजर म्हणून निवृत्त झालो असतो. पण मी योग्य वेळी आवडीच्या क्षेत्रात म्हणजे व्यवसायात उतरण्याचे धाडस केले, म्हणून मला मोठे यश मिळाले. मानसन्मान, प्रतिष्ठा, पैसा मिळाला. आज मी दिमाखात समाजाची सेवाही करू शकतो.
अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासूनच अभिनयक्षेत्रात आहे. तो जर अभिनय न करता शिकत बसला असता, तर इतका मोठा कलावंत झाला असता का? त्याची उंची फक्त सव्वापाच फूट इंच आहे. पण त्याच्या कामाची उंची कितीतरी पट मोठी आहे.
कर्तृत्व सिद्ध करताना वयाचा अडसरही अजिबात नसतो. बोमन इराणीसारख्याने वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षापर्यंत सटरफटर व्यवसाय, उद्योग केले. हॉटेलमध्ये वेटरचेही काम केले. खूप हलाखीचे जीवन तो जगला. पण त्याच्यात उपजत कलागुण होते. त्यामुळे तो पंचेचिाळिसाव्या वर्षी फिल्मी दुनियेत आला. ‘मुन्नाभाई एम. बी. बी. एस.’ चित्रपटाने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मुन्नाभाईप्रमाणे ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात बोमनची भूमिका भाव खाऊन गेली. जर तो लहान वयातच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आला असता, तर तो आज कुठल्या कुठे पोहचला असता.
डॉ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल हे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाले. परंतु त्यांच्यातील उपजत आवड त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी सुरुवातीला काही काळ प्रॅक्टिस केल्यानंतर चित्रपट आणि रंगभूमीच्या क्षेत्राकडे मोर्चा वळविला. या क्षेत्रात त्यांनी मोठी भरारी घेतली.
सुपरस्टार रजनीकांत मूळचा कोल्हापूरचा. कर्नाटकात गेला. कन्नड भाषा शिकला. तिथे बस कंडक्टर झाला. प्रवाशांशी तिकिटे देताना तो बोलायचा, तेव्हा त्याच्यातील अभिनय व संवाद कौशल्य पाहून एका दाक्षिणात्य चित्रपट निर्माता दिग्दर्शकाने त्याला दाक्षिणात्य चित्रपटात ओढले. पुढे तो तमिळ भाषाही शिकला. आज तो काय आहे, हे सर्वांना माहीतच आहे. आवडीच्या क्षेत्रात काम करणारे लोक काम करताना थकत नाहीत, कारण ते कामाचा आनंद लुटत असतात. या कामावेळी ते तहानभूक विसरतात. असा कामातून आनंद मिळवायचा असेल, तर योग्य वयातच नैसर्गिक गुण हेरणे आवश्यक असते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
