हे पुस्तक असे वापरा
जीवनातील उत्साह आणि ऊर्जा कायम राहावी म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायक असे काहीतरी हवे असते. अर्थात आपल्याला प्रोत्साहित आणि उत्साहित करणाऱ्या विचारांपेक्षा अधिक परिणामकारक दुसरे काहीच नसते. ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा,’ या अर्थाची एक जुनी म्हण आहे. त्याचप्रमाणे, ‘एक दिवस आपल्या सावलीपासून दूर राहा आणि आनंद आशेचा स्वच्छ प्रकाशाचा अनुभव घ्या,’ असे म्हणायला हवे. गेल्या अनेक वर्षांपासून रोज एक प्रोत्साहित करणारा विचार जमा करणे, त्याचे दृश्यरूप पाहणे आणि ते मनात साठवून ठेवणे, अशी मी एक नियमित सवयच लावून घेतली आहे. असे विचार आपल्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून आणतात, असा माझा अनुभव आहे. काही वेळा मी त्यांना ‘आत्मोन्नती’ करणारे म्हणतो. कारण त्यांचा तसा उपयोग होतो. आत्मोन्नतीची तर आपल्याला सर्वांनाच गरज असते.
काही वेळा, मी या निवडक विचारांना आणि कल्पनांना वैचारिक वातावरण नियंत्रक’ म्हणतो. एखाद्या घरात एअर कंडिशनर सुरू केल्यावर तेथील तापमान झपाट्याने खाली येते. अगदी तशाच प्रकारे या वैचारिक वातावरण नियंत्रकामुळे मानसिक वातावरण बदलते. कोणत्याही व्यक्तीच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्वरूपात बदल घडविण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये असते. आपला प्रत्येक दिवस अर्थपूर्ण व्हावा यासाठी विचार फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी आपल्याला फक्त रोज एका चांगल्या विचारावर लक्ष केंद्रित करायचे असते.
म्हणून या पुस्तकात अतिशय प्रेरणादायक आणि सकारात्मक असे ३६५ विचार दिलेले आहेत. वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक विचार आहे. हे पुस्तक तुमच्या दैनंदिन वापरासाठी नेहमीकरिता तुमच्या टेबलावर, झोपायच्या पलंगाशेजारी किंवा स्वयंपाकघरात ठेवाल, अशी मला आशा आहे. मनाला किंचितही उदासीनता आली असे ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी हे पुस्तक उघडा आणि त्या दिवसासाठी असलेला विचार वाचा. फक्त एकच विचार पुरेसा वाटला नाही तर आणखी थोडे वाचा.
तुम्हाला प्रभावी आणि महत्त्वाच्या वाटणाऱ्या विचारांवर खुणा करायला संकोच करू नका. ते पान उघडा आणि पुनः पुन्हा तो विचार वाचून काढा. पुनः पुन्हा वाचल्याने माझे हे विचार तुमच्या मनात खोलवर रुजायला मदत मिळते. एखादा विचार तुमच्या मनात जितका जास्त खोलवर रुजतो तितका त्याचा तुमच्यावर दीर्घ परिणाम होतो. आणखी सांगायचे म्हणजे, या पुस्तकातील एखादा विचार तुम्हाला भिंतीवर लावण्यासाठी, तुमच्या खिशात, बॅगेत ठेवण्यासाठी किंवा सोबत नेण्यासाठी हवा असेल, तर तेवढा भाग पुस्तकातून वेगळा करणे योग्य नसते, असा विचार करू नका. प्रत्येकाने आपले स्वतःचे भले करून घ्यावे, असे सांगणारे हे पुस्तक आहे. या एकाच पुस्तकाचे आपण मयदिपेक्षा अधिक तुकडे करीत आहोत, असे तुम्हाला वाटत असेल, तर या पुस्तकाची दुसरी एक प्रत घेऊन या. हे पुस्तक आश्वासक आणि सशक्त विचार करायला लावणारे औषध आहे. त्यामुळे हे औषध घ्या आणि अधिक सामर्थ्यवान अधिक आनंदी व्यक्ती बना.
‘शर्टाचा खिसा तंत्र’ काय आहे हे जरा मला स्पष्ट करून सांगू द्या. माझ्या शर्टाचा खिसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यात मी कााँवर लिहिलेले अनेक विचार आणि वचने ठेवीत असतो. काही कार्डावर मी माझे ध्येय लिहीत असतो. हे सर्व कार्ड खिशात ठेवतो. म्हणजे ते सर्व विचार मी माझ्या हृदयावर कोरतो. त्याचा मला भावनिक आधार मिळतो. मी या सर्व कार्यांचे पुनः पुन्हा वाचन करीत असतो. या कार्डावरील विचार माझ्या जाणत्या मनातून सुप्त मनात साठविले जात नाहीत. तोपर्यंत ही प्रक्रिया मी सुरूच ठेवतो. त्यामुळे हे विचार खूप प्रभावी होतात.
अर्थात, या पुस्तकातून तुम्ही दैनंदिन विचार वाचणार आहात. तुमचा प्रत्येक दिवस वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी हे विचार तुम्हाला उपयुक्त ठरतील, अशी मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो.
लेखक- नॉर्मन व्हिन्सेन्ट पील
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
