१५.आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.
४) प्रतिकूल परिस्थितीतही यशस्वी करणारे मुद्दे ठरवा. Critical Success factors
आयुष्यात मोठं परिवर्तन होण्यासाठी किंवा करून घेण्यासाठी किमान पाच असे मुद्दे ठरवा आणि ते कृतीत आणा की जे आपणाला नक्की यश मिळवून देऊ शकतील. तर शिवबाराजे ते किमान पाच मुद्दे खालीलप्रमाणे असले पाहिजेत.
१. धैर्य। धैर्य हा असा गुण आहे जो माणसाला मागे जाण्यापासून किंवा माघार घेण्यावाचून रोखतो. बऱ्याचदा थोडीशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की माणसाला लगेच पराभवाची नुकसानीची भीती वाटते आणि तो माघार घेण्याच्या विचारात जातो. असे न करता शेवटपर्यंत आपले जागेवर, मतावर ठाम राहणे यालाच धैर्य असे म्हणतात. भिती या उलट असलेला हा गुण निर्भयता किंवा खंबीरता म्हणजेच धैर्य. आणि यशाची अपेक्षा बाळगणाराने असं धैर्य हा गुण धारण केलाच पाहिजे.
२. चिकाटी – चिकाटी म्हणजे प्रयत्नातील सातत्य. एखादा व्यक्ती यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो ते काम सतत continuously करत राहतो. मध्येच जर काम अर्धवट सोडून दिले तर मग यश कशातून मिळणार. तेव्हा ज्याला यश हवे त्याने चिकाटी सोडता कामा नये. आपले लक्ष ध्येयावर ठेवून सतत कार्यमग्न आणि कार्यतत्पर राहणं म्हणजेच चिकाटी. तन-मन-धनाने सतत हाती घेतलेले काम करणे म्हणजेच चिकाटी. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत काम करत राहणं म्हणजेच चिकाटी.
३. आत्मविश्वास – यशस्वी आणि जग बदलू पाहणाऱ्या माणसांमध्ये प्रचंड मोठा असा आत्मविश्वास असावा लागतो. आपण बरोबर आहोत आणि आपण हे करू शकतो याची त्याला पक्की खात्री असते. त्याचा स्वतःवर विश्वास असतो, जग त्याचेवरच विश्वास ठेवतं त्यामुळे आपणाला स्वतःबाबत
आत्मविश्वास हा असलाच पाहिजे. आत्मविश्वास वाढत रहावा यासाठी आपली क्षमता सतत वाढवत राहणे हा एकमेव उपाय आहे, क्षमता वाढविली की आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढला की क्षमता वाढविता येते असं हे गणित आहे. तेव्हा काही झाले तरी आपण स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होणार नाही याची दक्षता घ्या. मनाने खंबीर रहा आणि नेटाने लढत रहा.
४. नियोजन – जग जिंकणारी जग बदलणारी माणसं ही नेहमी नियोजनबद्ध काम करतात. ते काम करण्याअगोदर विचार करतात काम केल्यावर नाही. हुशार माणसं नेहमी कामाचा विचार करतात ते पूर्ण करण्याचे planning नियोजन करतात आणि मगच ते काम हाती घेतात. कामाच्या गरजेनुसार लागणारी साधनसामुग्री, क्षमता, वेळ, ऊर्जा, पैसे या सर्वांचे गणित मांडून मग ते काम करणारी माणसं शोधून त्यांना ती जबाबदारी देणं म्हणजेच नियोजन करणं. नियोजन करणारा कधी अपयशी होत नाही आणि जो अपयशी होतो त्याने नियोजनच केलेले नसते असा त्याचा स्पष्ट अर्थ असतो. तेव्हा यशस्वी माणसांमध्ये हाच गुण असतो की ते नेहमी नियोजन करूनच काम करतात.
५. कृतीशीलता – जग बदलवणारी आणि जिंकणारी माणसं केवळ नियोजन करून थांबत नाहीत तर ती ते नियोजन अंमलात आणतात. कृती करतात. तुमचे ध्येय खूप मोठे आहे. नियोजन खूप उत्तम आहे, परंतु जर ते कृतीत आणले नाही तर त्याचा काय उपयोग? तेव्हा यशस्वी माणसांचा हा गुणधर्म असतो की ते जे निर्णय घेतात ते अंमलात आणतात. एकदा निर्णय घेतला की ते तो तडीस नेतात पार पाडतातच.
तर शिवबाराजे हे पाच गुण अंगी असणाऱ्या माणसाला सगळे जग विरोधात गेले तरी जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. माणूस पराभूत होण्यास किंवा जिंकण्यास ८०% गोष्टी ज्या जबाबदार असतात त्या गोष्टी त्या माणसामध्येच असतात. जगाच्या हाती केवळ २०% भाग असतो. आणि त्यावर केव्हाही मात करता येते. म्हणून यशस्वी होणाऱ्या, जग जिंकणाऱ्या माणसाने सर्वात प्रथम लक्ष द्यावे ते स्वतःच्या स्वावलंबनावर आणि परिपूर्ण
होण्यावर. माणसाने जितेंद्रिय व्हावे. म्हणजेच काय तर माणसाने जर जग जिंकायचे असेल तर प्रथम स्वतःला जिंकावे. तुम्ही स्वतःला जिंका जग आपोआप जिंकता येते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
