१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा
शिवबाराजे ज्याच्या आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय असते अशा व्यक्तीने प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करत गेले पाहिजे. कारण एकतर अशा व्यक्तीचे ध्येय मोठे असते. वेळ कमी असतो, कामे खूप असतात आणि त्याप्रमाणे खूप वेगाने सुद्धा काम करावे लागते. शिवाय दिशा पण योग्य असावी लागते. तेव्हा जर या सर्व गोष्टी नीट सांभाळायच्या असतील, यातील एकही गोष्ट जर मागे सोडायची नसेल आणि वेगाने प्रगती करायची असेल तर मग आपली दिशा आणि दररोजची प्रगती याची आपण दररोज खात्री करून घेतली पाहिजे.
जर आपल्या कामात काही अडचण आली असेल, आपली दिशा चुकत असेल किंवा वेग कमी पडत असेल तर आपण दररोज याची तपासणी केली तर आपली चूक आपणाला वेळेतच कळून येईल आणि आपणाला दुरूस्ती देखील लगेच करता येईल. आपणाकडे ध्येय मोठे असेल तर वेळ खूपच कमी पडतो तेव्हा आपला कामाचा एकही दिवस वाया जाऊ नये याची काळजी घेण्यासाठीच आपण प्रत्येक दिवशी प्रगती करत आहोत की नाही याची खात्री केली पाहिजे.
तर आता तुमच्यासमोर प्रश्न असा असेल की मग आपण प्रत्येक दिवशी प्रगती करत आहोत की नाही याची तपासणी कशी करायची आणि खात्री कशी करायची तर यासाठी तुम्हाला स्वतःला सात शिस्ती लावाव्या लागतील. आता शिस्त म्हणजे नक्की काय असे म्हणाल तर शिस्त म्हणजे ती गोष्ट केलीच पाहिजे जी तुम्हाला करावीच लागेल. ती गोष्ट करणे तुम्हाला आवडते की नाही हे अजिबात महत्त्वाचे नाही. प्रगती करण्यासाठी जे करायचे ते करायचेच मग ते आपणाला आवडो की नावडो यशासाठी आवश्यक आहे
ना मग ते कोणत्याही परिस्थितीत केलेच पाहिजे अशी कामे.
शिस्त म्हणजे ध्येयाकडे घेऊन जाणारी, प्रगतीला कारणीभूत ठरणारी अशी जी जी गोष्ट असेल ती ती गोष्ट करायचीच. कोणी सांगणारे असो नसो. ते काम अवघड असो वा सोपे आवडीचे असो वा नसो ही कामे करायची म्हणजे करायचीच. यालाच शिस्त म्हणायचे. तर अशा कोणत्या शिस्ती आहेत ज्या तुम्हाला तुम्ही दररोज प्रगती करता की नाही याची खात्री करून देऊ शकतात तर त्या सात शिस्ती खालीलप्रमाणे
१) दररोजची ध्येय निश्चित करणे.
२) दररोजचे नियोजन करणे.
३) रोजचा प्राधान्यक्रम ठरविणे.
४) सर्वात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे.
५) रोजच्या रोज व्यायाम आणि योग्य आहार घेणे.
६) रोज नवीन शिकण्याची प्रगती करण्याची सवय लावणे.
७) तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या लोकांसाठी रोज थोडासा वेळ काढणे.
तर शिवबाराजे या सात शिस्तीचे पालन करणे म्हणजेच आपण दररोज प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करणे. या सात शिस्ती स्वतःला लावणे म्हणजेच आपण प्रगती करत आहोत याची खात्री करणे. तेव्हा आता आपण एक एक शिस्त नीट समजून घेऊया.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
