७. कीर्ती पुढे चालते आणि यश मागे मागे

७. कीर्ती पुढे चालते आणि यश मागे मागे

शिवबा राजे हे कायम लक्षात असू द्या की माणसाची कीर्ती पुढे चालते आणि यश मागे मागे. तेव्हा तुम्ही तुमची कीर्ती अर्थात प्रतिमा (Image) सांभाळा. यश मिळविण्याचा पाया म्हणजे कीर्ती, कीर्ती म्हणजे आपण लोकांशी जो व्यवहार करतो, लोकांशी आपण ज्याप्रमाणे वागतो ती वागण्याची पद्धत होय. आणि ही पद्धतच आपणाला यशाकडे नेते किंवा अपयशाकडे ढकलते. तेव्हा कीतीं निर्माण करा, कीर्ती सांभाळा आणि कीर्ती वाढवा,

या संदर्भातील चार नियम मी तुम्हाला सांगते ते कायम पाळा,

१) रयतेला प्रेम

२) सैनिकांना शिस्त

३) मित्रांना विश्वास

३) शत्रूना धक्का

यातील पहिला नियम म्हणजे रयतेवर प्रेम करा, आपण आपल्या रयतेवर आपल्या लेकरांप्रमाणे प्रेम करा. किती प्रेम करावं असं म्हणाल तर जेवढं माझं तुमच्यावर प्रेम आहे तेवढेच प्रेम तुम्ही तुमच्या रयतेच्या ओट्यात टाकलं पाहिजे. रयत सुखी तर राज्य सुखी. रयतेची प्रगती झाली तर राज्याची प्रगती आपोआप होईल. आणि जो कोणी रयतेच्या हिताच्या आड येईल, दांडगाई करेल, अन्याय करेल अशी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याची गय करू नका. रयतेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणाराला शासन केल्याशिवाय राहू नका. राजमाता जिजाऊंच्या या शिकवणीमुळेच महाराजांनी आयुष्यातील पहिला न्याय दिला तो रांक्षे गावी झालेल्या एका प्रकरणाचा. बलात्कार करणाऱ्या मुजोर पाटलाचा चौरंग करून एका गरीब दलित मुलीच्या कुटुंबाला न्याय दिला.
सैनिकांना शिस्त : आता कीर्ती मिळविण्यासाठी जो दुसरा नियम आहे तो आहे सैनिकांना शिस्त. ज्या सैन्याच्या आधारे आपण राज्य उभं करणार रक्षण करणार, वाढवणार ते सैन्य शिस्तबद्ध असलं पाहिजे. या सैनिकांना चांगली शिस्त असली पाहिजे. शिस्त म्हणजे काय तर राजे समोर असताना जी कर्तव्यनिष्ठता सैनिक पाळणार तीच कर्तव्यनिष्ठता सैनिकांनी राजांच्या गैरहजेरीत देखील पाळली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी रयतेच्या वाळल्या पाचोळ्यावर देखील पाय ठेवता कामा नये. रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास देता कामा नये. अडवणूक, पिळवणूक करता कामा नये. सैनिक हे राजाचे प्रतिबिंबच असते म्हणून सैनिकांची प्रतिमा तीच राजाची प्रतिमा. म्हणून शिस्तीचे पालन सैनिकांनी करणे म्हणजेच राजा देखील शिस्तबद्ध असल्याची पोचपावती ठरते. कोणतेही राज्य सैनिकांच्या शिस्तीवर मोठे होते म्हणून सैनिकांना शिस्त ही असलीच पाहिजे. कर्मचाऱ्याने कधीही बेकैद म्हणजे स्वैर आचार करू नये, गैरवर्तन करू नये.

या शिकवणूकीची अंमलबजावणी करण्यासाठीच महराजांनी सैनिकांना अध्यादेश काढला.

“रयतेच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावता कामा नये. याबाबत गैरवर्तन झाल्याचा कोणाचाही मुलाहीजा बाळगला जाणार नाही. कठोर शिक्षेस पात्र राहाल.” ही शिस्त किती कडक असावी याची दोन उदाहरणे शिवाजी महाराजांच्या चरित्रात अगदी सुरूवातीलाच आलेली आहेत.

एक उदाहरण आहे सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे तर दुसरे आहे शामराजपंत रांझेकर यांचे.

राजमाता जिजाऊसाहेब यांनी दिलेला आदेश पाळला नाही म्हणून सरसेनापती मानकोजी दहातोंडे यांना देहदंडाची शिक्षा महाराजांनी दिली. एका शेतकऱ्याचे काम करण्यासाठी लाच मागणारा मंत्री शामराजपंत रांझेकर याला ताबडतोब काढून टाकले. माझ्या राज्यात रयतेचं शोषण आणि भ्रष्टाचार चालणार नाही. याच्याच शिस्तीचा हा पुरावा होय. शिस्त पालन होण्याच्या बाबतीत शिक्षा देताना महाराजांनी कधी तो सेनापती आहे की मंत्री याची चिंता केली नाही.
शिस्त सर्वांना सारखीच मग तो कोणीही असो. स्वतः राजाने देखील शिस्त पाळली पाहिजे या नीतीनेच महाराज स्वतः काम करत होते. म्हणूनच स्वराज्यात बरपासून ते खालपर्यंत सर्वत्र शिस्त पालन होताना पहायला मिळते.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!