८९.शेतकऱ्यांनो दिशा बदला, दशा बदलेल !
पन्नास-साठ वर्षांपूर्वी १००/२०० एकर वाला शेतकरी आज तिसऱ्या 1 चौथ्या पिढीत २/३ एकरवर आला आहे. शेतीचे तुकडे तुकडे होत असताना, आता शेती परवडत नाही. नोकरी मिळत नाही आणि धंदा करता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुन्या काळी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी होती. आता मात्र उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झालेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून फक्त चौदा पंधरा टक्के नोकऱ्या देऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी यशाची त्रिसूत्री समजून घ्यावी. स्वतःला ओळखा, आवडीचे क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत बना.
असे म्हणतात रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. अशातच हाताला काम नसेल, खिशात पैसा नसेल, तर त्यामुळे गावात आणि समाजात पण इज्जत नसते. त्यामुळेच तरुणांचे लग्न होत नाहीत. मग असे तरुण व्यसनाकडे आणि गुन्हेगारीकडे वळायला वेळ लागत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी सातव्या आठव्या इयत्तेपासून पुढे शाळेव्यतिरिक्त काहीतरी पार्ट टाइम काम केलेच पाहिजे. कमवा आणि शिका याप्रमाणे शिक्षणाचा काही खर्च त्यांनी कमावलाच पाहिजे. ज्यामुळे मुलांना पैशाची किंमत कळेल. पुढे जाऊन त्यांना कामाची लाज वाटणार नाही. खरे तर शारीरिक कष्ट केल्याने नुकसान काहीच होत नाही. उलट शरीर अधिक बळकट आणि पिळदार बनते. शरीराने मजबूत असलेले तरुण मनानेही मजबूत बनतात व जीवनात यशस्वी होतात. मी हायस्कूलला गेल्यापासून सात-आठ किलोमीटर शाळेत पायी जाऊन येऊन शेतात काम करून रात्री रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करून शिकलो. म्हणून मला कधीही कामाची, कष्टाची लाज वाटली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांनी छोटे-मोठे व्यवसाय केले नाहीत तर, शेतीतून मिळवलेले पैसे घर प्रपंचाला पुरत नाहीत. अशातच मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न यासाठी शेतकऱ्यावर कर्ज काढण्याची वेळ येते. ते कर्ज अनुत्पादित कामासाठी वापरल्याने कर्जाची परतफेड होत नाही. त्यामुळे आहे ते शेत विकण्याची पाळी शेतकऱ्यावर येते. हाच मानसिक ताण सहन न झाल्याने शेतकरी कधी कधी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. अशावेळी ग्रामीण भागातील मुले नाउमेद होतात. अशावेळी राजकीय पक्षांचे नेते अशा तरुणांना चहा, नाश्ता, धाब्यावरील जेवणावारी पक्षाचे कार्यकर्ते बनवितात. निवडणुकीच्या वेळी फुकटची दारू पाजून याच तरुणांना व्यसनाधीनतेकडे घेऊन जातात. अशा वाईट सवयीमुळे असे तरुण गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता पण असते. पुढाऱ्यांच्या मागे मारवाडी, गुजराती, सिंधी यांची मुलं कोणाच्या प्रचारात दिसतात का? त्यांना जे कळतं ते इतरांना का कळू नये? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी शेतकऱ्यांची आणि त्यांच्या मुलांची परिस्थिती बदलणार नाही. मागील ७५ वर्षांत बदल झाला नाही आणि यापुढेही बदल होईल असे वाटत नाही. यावर उपाय नाही
का? शेतकरी मित्रानो यावर निश्चित उपाय आहे. शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या मुलांनी आपल्या विचाराची आणि कार्याची दिशा बदलावी लागेल. त्यानंतरच शेतकऱ्याची दशा बदलेल.
ज्ञशेतकरी मित्रांनो आता यापुढे संपूर्णपणे शेतीवर अवलंबून राहणे चुकीचे ठरणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या तरुण मुलांनी शेतीला पूरक उद्योग, जोडधंदे किंवा छोटे-मोठे व्यवसाय करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण शेतकरी आहोत. शेतकरी कधी कष्टाला लाजत नसतो. म्हणून तरुणांनो लाज सोडा. आपल्या शिक्षणाचा खर्च आईवडिलांच्या डोक्यावरून कमी करा. आपल्या गरजा कमी करा. महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे आणि चैनीच्या वस्तूचा काही काळापुरता तरी त्याग करा. देखावा कमी करा. जग काय म्हणेल याची चिंता तुम्ही करू नका. चंगळवादामुळेच शहरा जवळचे मोठे शेतकरी गुंठामंत्री होऊन भिकेला लागलेले आहेत. मुळशी पॅटर्न चित्रपटात तेच दाखवले आहे. म्हणून आता तरी उघडा डोळे बघा नीट. शेतकरी मित्रांनो आता आपल्याला व्यापारी वृत्तीने वागावे लागेल, वीस रुपये किलो बटाटे विकण्याऐवजी दोनशे रुपये किलो वेफर्स करून विका. पाच रुपये किलो टोमॅटो विकण्यात ऐवजी पाचशे रुपये किलो टोमॅटा सॉस, केचअप विका. नसता शहरातील व्यापारी वृत्तीची माणसे शेतकऱ्याकडून भाजीपाला, धान्य विकत घेऊन रस्त्यावर बसून विकणारी माणसे समृद्ध होत आहेत. ते चार चाकीत फिरत आहेत. हेच जर शेतकऱ्यांनी समजून घेऊन स्वतः पिकविलेला माल स्वतःच विकायला शिका. जे विकते ते पिकवायला शिका. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये दलाल खूपच श्रीमंत होताना दिसतात. आपणच जर पिकविण्याबरोबर विकण्याचे काम केले तर, दलालांना मिळणारा मोठा नफा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या तरुण मुलांना मिळेल. जोपर्यंत तुम्ही व्यापार हातात घेणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्याचे दिवस बदलणार नाहीत. मग त्यासाठी कितीही कायदे केले, तरीही शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होणार नाही. हे सत्य तुम्ही समजून घ्या.
शहरातील जे ग्राहक आहेत. त्यापैकी बरेच जण शेतकऱ्याला मदत करायला तयार आहेत. कारण त्यांनाही मधले दलाल लुटत आहेत. माझ्यासकट शहरातील बहुतांशी लोक हे शेतकऱ्यांचीच मुले आहेत. ते नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात आले आहेत. त्यांनाही शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या मुलांनी अशा ग्राहकाच्या दारात जाणे गरजेचे आहे. जीवनात स्वावलंबनासारखी दुसरी श्रीमंती नाही. त्यालाच आत्मनिर्भरता म्हणतात. आपल्या पंतप्रधानांनी हाच नारा दिला आहे. म्हणून तुम्ही आत्मनिर्भर बना. आपण बळीराजा आहोत. त्याचे भान ठेवा. हेच राजेपण टिकविणे आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपल्या विचाराची दिशा बदला, नसता आपण बळीराजे न राहता, व्यापाऱ्यांना बळी जाणारे बनाल. म्हणून उघडा डोळे बघा नीट. थोडी व्यापारी वृत्ती बाळगून आत्मविश्वासाने जीवन जगा आणि यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
