८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.
६. इच्छा आणि कृती यात अंतर ठेवू नका. Bridge the gap of desire to demo
राजे बशासाठी लागणारा ध्येयाकडे नेणारा हा सहावा मंत्र आहे. सुवर्ण नियम आहे. आपली इच्छा आणि कृती यात अंतर पडू देऊ नका. आपले ध्येय हीच आपली इच्छा आणि आपले प्रयत्न हीच आपली कृती. तेव्हा ध्येयाकडे नेणाऱ्या कृती करताना वेळ लावू नका किंवा उशीर करू नका. बऱ्याचदा लोकांची इच्छा आणि कृती यात अंतर असतं आणि तेच पराभवाला अपयशाला कारणीभूत असतं. पहा ना लोकांना निरोगी शरीर हवं असतं पण त्यासाठी व्यायाम करावा लागतो तोच आवडत नाही. लोकांना श्रीमंत होणं आवडतं पण पैसे कमविण्यासाठी काम करावे लागते हे पटत नाही. तसंच यशस्वी होणं ही इच्छा आहे, चांगली इच्छा आहे पण त्यासाठी काम करावं लागतं, कृती करावी लागते हेच लोक विसरतात.
तुमची इच्छा आणि कृती यात जेवढं अंतर वाढत जाते तेवढी अपयशाची जास्त शक्यता निर्माण होते आणि जेवढी तुम्ही लवकर कृती करता, योग्य कृती करता तेवढीच यशाची शक्यता जास्त वाढते. तेव्हा इच्छा हे ध्येय आहे तर कृती ही त्या ध्येयाकडे जाणारा मार्ग आहे, वाट आहे. तुम्ही वेळ न दवडता पूर्ण नियोजन करून कटिबद्ध होऊन सातत्य ठेवत राजे अशी कृती करत राहिले पाहिजे की दिवसेंदिवस तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जात राहिला पाहिजे. विहीर पाण्याने भरावी ही इच्छा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा त्या विहीरीत झऱ्यातून सतत पाणी येण्याची कृती होत राहते. झरा संपला, बंद झाला म्हणजे कृती थांबली. सहजच विहीरीला पाणी येणार नाही आणि ती विहीर कधीही पूर्ण भरणार नाही.
तुम्ही आयुष्यात कितीही मोठं ध्येय ठरवा ते प्राप्त करता येते. अगदी हे ध्येय हजारपटीचे असले तरी ते पूर्ण करता येतं. महत्त्वाचे काय तर कृती आहे. आपण जर रोज थोडी थोडी आपल्या ध्येयाच्या दिशेने जाणारी कृती करत गेलो तर आपल्या क्षमतेच्या हजारपटीत असणारे ध्येय सुद्धा प्राप्त करता येते. यासाठी गरज आहे ती दिवसाला फक्त ०.१% प्रगती करण्याची म्हणजे
आठवड्याला ०.५% दोन दिवस सुट्टी पकडली आणि आठवड्यातील पाच दिवस जरी आपण अशी प्रगती करत गेलो तरी महिन्याला आपली २% प्रगती होते. वर्षाला २६% आणि हिच गती कायम ठेवत प्रगती केली तर दहाच वर्षात आपली १००४ पटीने प्रगती होते. तेव्हा छोट्या प्रयत्नांना सातत्यपूर्ण प्रयत्नांना कधी कमी लेखू नये. एकदम एक मोठा हत्ती कधीच खाता येणार नाही, परंतु जर नीट नियोजन केले आणि मग कृती करून त्याचे हजारो छोटे-छोटे तुकडे केले तर तो अवाढव्य हत्ती सहज खाता येतो. तशीच ही कृती आहे. तेव्हा भली मोठी इच्छा आणि छोट्यात छोटी कृती यामधील हा संबंध नीट लक्षात ठेवा. एक छोटी पण सातत्यपूर्ण कृती ही कितीही मोठं अशक्य कोटीतील ध्येय प्राप्त करून देते हे कायम लक्षात ठेवा.
शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंची ही शिकवणी अंमलात आणताना सन १६४५ ते १६७४ असा २९ वर्षांचा सातत्यपूर्ण प्रवास केला आणि शून्यातून हिंदवी स्वराज्य उभे राहीले. वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि या देशाला ४०० वर्षांनंतर स्वतंत्र असा स्वदेशी राजा मिळाला. खरं तर त्यावेळच्या परिस्थितीकडे पाहता शिवाजी महाराज किंवा इतर कोणी असं हिंदवी लोकांचे स्वतंत्र राज्य निर्माण करणं ही केवळ अशक्य कोटीतील घटना होती. परंतु महाराजांनी इतिहासाचा अभ्यास करून भारतीय लोकांच्या चुका कोणत्या ? परकीय लोकांनी कोणकोणत्या युक्ती वापरून हा देश बळकावला याचा चांगला अभ्यास केला आणि मगच ध्येयाकडे सातत्यपूर्ण वाटचाल करीत १३ देशातील परकीय राजांचा त्यांच्या सैन्याचा सामना करून हिंदवी स्वराज्य उभे केले. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ते वयाच्या ४४ व्या वर्षापर्यंत म्हणजे सलग २९ वर्षे ध्येयाचा पाठपुरावा करत राजे एकतरी छोटीशी कृती करत करत महाराजांनी एक सार्वभौम स्वतंत्र राज्य निर्माण करून छत्रपती ही पदवी ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक करून धारण केली. एवढ्या प्रतिकूल आणि जीवघेण्या परिस्थितीत जर शिवाजी महाराजांना आपले ध्येय गाठता आले तर मग आम्हाला का गाठता येणार नाही? आपणही तशीच सातत्यपूर्ण कृती करू. आपणालाही आपले ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा इच्छा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि त्याच्याकडे जाणारी कृती यात कधी अंतर पडू देऊ नका. तुम्हाला यश हमखास मिळण्याची हीच खरी पद्धत आहे. हाच खरा मंत्र आहे.
****************************************************************************************************************************************************************************
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
