९. ध्येय निश्चिती करा.
जिवबाराजे मनुष्य आयुष्यात काय होणार किती मोठा होणार हे एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने ठरविलेले ध्येय. त्याला आयुष्यात जे व्हायचे त्याने ते ध्येय लवकरात लवकर ठरविले पाहिजे आणि त्या दिशेने त्वरीत कृती केली पाहिजे. जगात सगळ्यात महत्त्वाचे काय आहे तर ती आहे कृती. स्वप्न तर कोणीही पाहू शकते पण ते ध्येयात उतरवायचे तर मग कृती ही करावीच लागते. केवळ स्वप्नरंजन करणाराला ध्येय प्राप्मी कशी होईल. तेव्हा स्वप्न पहा आणि तेच आयुष्याचे ध्येय ठरवा. जेवढं मोठं ध्येय असेल तेवढी मोठी कृती अपेक्षित असते. राजे आम्हाला वाटतं तुमच्या आयुष्याच ध्येय हे हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हेच असलं पाहिजे. हिंदवी म्हणजे या देशातील मूळनिवासी किंवा भूमीपुत्रांचे राज्य निर्माण करणं होय. आणि हे ध्येय प्राप्त करताना तुमच्या हातून जी कृती घडेल ती मात्र विश्ववंदिता अशीच असली पाहिजे. हे हिंदवी स्वराज्य निर्माण करताना तुमच्या हातून जी कामे होतील ती कामे विश्वाने वंदन करावीत अशीच असली पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला रयतेच राज्य निर्माण करावे लागेल. रयत हाच या स्वराज्याचा केंद्रबिंदू आणि आत्मा असला पाहिजे. आम्ही तुम्हाला तुमचं ध्येय स्पष्ट असं लिहून देत आहोत. लक्षात ठेवा जे ध्येय लिहीलं जात नाही ते कधी पूर्णत्वाला येत नाही. तेव्हा ज्याला ज्याला आपलं स्वप्न, आपलं ध्येय प्राप्त करायचे त्याने सर्वात अगोदर ते कोठेतरी कशावर तरी लिहून ठेवले पाहिजे. पण लिहीताना ही काळजी घेतली पाहिजे की ते लिहिलेले ध्येय आपल्या नजरेसमोर राहील पाहिजे आणि सतत आपणाला दिसलं पाहिजे. जेणेकरून आपलं सुप्त मन मेंद सारखा त्याचे चिंतन करेल आणि आपणाकडून त्या ध्येयाकडे जाणारी कृती सतत होत राहील.
म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमचं ध्येय प्रत्यक्ष राजमुद्रेवर लिहून देत आहोत, राजाने धारण करायची मुद्रा म्हणजे राजमुद्रा आणि ही मुद्रा धारण केल्यावर तुम्ही शिवबा राजे ते छत्रपती शिवाजी महाराज होणार तीच ही राजमुद्रा आम्ही या राजमुद्रेवर स्पष्ट लिहून दिलं आहे ते वाक्य असं आहे-“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता साहसुनो शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते” अर्थात हे शहाजीराजांच्या मुला तुला प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे शून्यातून हे स्वराज्य उभे करून विश्ववंदिता म्हणजे विश्वाला वंदनीय होईल एवढे मोठे करायचे आहे. आणि तेथपर्यंत जाणारा मार्ग म्हणजे मुद्रा भद्राय राजते. मुद्रा भद्राय राजते याचा अर्थ आहे लोककल्याणकारी राज्य निर्मिती. सध्या देशात मोगलांचा काळ आहे त्यांनी या देशाचा कारभार करताना आपली भाषा फारशी ही इथल्या लोकांवर राजभाषा म्हणून लादली आहे. याला उत्तर म्हणून आम्ही तुम्हाला दिलेली राजमुद्रा ही संस्कृतमधील दिलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट असा आहे की आपला देश आपली भाषा आणि त्यातून आपले राज्य स्वराज्य लक्षात ठेवा. ज्याला आपली मातृभाषा येते तोच जग जिंकतो. तेव्हा आपले राज्य निर्माण झाले रे झाले की आपण या परकीय भाषा हाकलून देऊन आपली मातृभाषा मराठी हिलाच राजभाषेचा दर्जा द्यायचा. सर्व प्रशासकीय कामकाज मराठीतून करायचे. शिवाय मोगली कालगणना बाद करून आपले स्वतःचे कॅलेंडर शिवशक या नावाने लागू करायचे. या मातीला या मुलुखाला येथील माणसांना, येथील भाषेला सर्वांना आपणाला पुन्हा जीवंत करायचे आहे आणि नवचैतन्य निर्माण करायचे आहे. हा हिमाड तर विश्ववंदिता हे ध्येय जर सामान्य लोकांना सहज कळणार नसेल तर ते नीट समजावून द्या आणि लोकांनाही नीट समजावून सांगा. राजे बारा मावळ पुण्यात येते पुणे महारष्ट्रात येते. महाराष्ट्र भारतात येतो, भारत आशिया खंड म्हणजे जंबूद्विपात येतो, असे सात खंड मिळून एक पृथ्वी बनते आणि अशा अनेक पृथ्वी मिळून एक जग बनते. अशी अनेक जगे मिळून एक आकाशगंगा बनते आणि अशा अनेक आकाशगंगा मिळून एक विश्व बनते. आणि आपलं राज्य हे असं एवढं मोठं विश्वाला वंदनीय व्हावे हेच आपलं ध्येय आहे. तेव्हा ध्येय खूप मोठं आहे. प्रवास खूप लांबचा आहे तेव्हा कृती बेगवान व्हावी लागेल. आणि ती लवकरात लवकर सुरू करावी लागेल. तुम्ही बारा वर्षांचे असल्यापासूनच याची सुरुवात केली तर पन्नाशीपर्यंत हे ध्येय शहज पूर्ण होऊ शकते. म्हणूनच आपण ते आत्ता लगेच कृतीत आणायला सुरुवात करणार आहोत. तुमचं ध्येय तुमच्यापासून क्षणभर लांब आणि नजरेपासून दूर राहू नये म्हणूनच आपण प्रत्येक कागदावर सहीबरोबर हा शिका मारायचा आणि आपले ध्येय सतत लक्षात ठेवायचे.
तुम्ही ज्या सदरेवर बसून कारभार करणार त्या सदरेवर याची ताम्रपटावर कोरलेली प्रतिमा कायम समोर ठेवा. आपले ध्येय सतत आपल्यासमोर असेल याची दक्षता घ्या. ध्येय वाक्य हे लिहून कुठेतरी ठेवायचे नसते तर ते कायम नजरेसमोर धरायचे असते. हे ध्येय प्राप्त करताना रयतेचं कल्याण करायचे आहे हा विषय पण लक्षात ठेवायचा आहे. किंबहुना रयतेचं कल्याण करत गेलात तरच हे राज्य निर्माण पण होईल आणि त्याचवेळी ते विश्ववंदीता देखील होईल. आयुष्यात ध्येय ठरविणं सर्वांनाच जमतं असं नाही. आणि ध्येय प्राप्ती सर्वांनाच करता येते असंही नाही. तुम्हाला या दोन्ही वर्गाच्या पलीकडे जायचे आहे. आणि तुम्हाला ध्येय निश्चिती ते ध्येयप्राप्ती हा प्रवास करायचा आहे. राज्य निर्माण करून राज्याभिषेक करून एक सार्वभौम राज्य स्थापन करायचे आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणं हेच आमच्याही आयुष्याच ध्येय आहे. तुमचे वडील मी आणि तुम्ही या तिघांचेही ध्येय एकच आहे स्वराज्य आणि स्वराज्य. त्यामुळे कितीही बिकट प्रसंग आले तरी माघार घेणे नाही, थांबणे नाही की ध्येय बदलणे नाही. हो गरज पडलीच तर मार्ग बदलू पण ध्येयात मात्र बदल होणार नाही. जीवात जीव असेपर्यंत ध्येय बदलणार नाही आणि ध्येय प्राप्त केल्याशिवाय मरण नाही असा निर्धार करून वाटचाल केली तरच ध्येय प्राप्त होते. तेव्हा आता तशी निर्धारपूर्वक वाटचाल सुरू करा.
****************************************************************************************************************************************************************************
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
