
व्यवस्थापनाची वैशिट्ये
आता आपण मॅनेजमेंटची वैशिष्ट्ये पाहू या.
१. Management is a process
मॅनेजमेंट ही एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्मिती करण्याचे धाडस किंवा स्वराज्य ही सुद्धा एक प्रक्रियाच आहे. ज्यात महाराजांनी साधन संपत्तीचे नियोजन, जुळवाजुळव करुन त्यांना (मावळ्यांना) दिशा देऊन त्या सर्व साधन सामग्रीचे व्यवस्थीत नियंत्रण केले.
२. Management is a group Activity
मॅनेजमेंट हे एक सामुहीक काम आहे. येथे एकट्याचा शहाणपणा चालत नाही नाहीतर त्याचा कारतलब खान होतो आणि उंबर खिंडीसारखी भयाण अवस्था होते आणि तो अडचणींच्या ट्रॅपमध्ये सापडतो.
थोडक्यात मॅनेजमेंट हे एक टिम वर्क आहे. म्हणजे काय तर मॅनेजमेंटमध्ये संस्थेला संघटनेला कंपनीला राज्याला जे यश मिळते ते सगळ्यांच्या कष्टाचे फलीत असते. एकटा राजा किंवा मालक एकटा मॅनेजर किंवा सेनापती कितीही हुशार असला तरी तो इतरांच्या सहाय्याशिवाय आपले उद्दिष्ट कसे पूर्ण करु शकेल का? म्हणून यश हे सगळ्यांच्या परिश्रमाचे फळ होय. महाराजांना मंत्र्यांचे सहकार्य, महाराजांना सेनापतीचे सहकार्य, महाराजांना सैन्याचे सहकार्य मिळाले म्हणून तर त्यांना मोठे-मोठे जय म्हणजे यश मिळाले. यासाठी महाराजांनी सैन्य, प्रशासन, रसद या सर्वांचे व्यवस्थापन केलेले दिसते. घोडदळांच्या मदतीला पायदळ पोहोचले नाही असे कधी घडले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराजांनी घोडदळ, पायदळ, आरमार याचे टिम वर्क मस्त पैकी जुळविले होते.
Management involves getting things done through people. मॅनेजमेंट म्हणजे लोकांकडून काम करुन घेणे. लोकांकडून काम करुन घेण्यासाठी राजाला किंवा मॅनेजरला खालील गोष्टी करणे गरजेचे आहे.
१. Lead the Sub-ordinate सहकाऱ्यांचे नेतृत्व करणे, हाताखालील लोकांना दिशा देणे.
२. Communicate effectively प्रभावी संभाषण करुन लोकांना जोडून ठेवणे.
3. Motivate the Sub-ordinates. धारण शक्ती वाढती ठेवणे. सहकाऱ्यांना प्रवृत्त करणे त्यांची इच्छाशक्ती
४. मॅनेजमेंटचे आणखी एक वैशिष्ट्ये आणि जे अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणजे मॅनेजमेंट ही Result oriented असते मॅनेजमेंटध्ये Result म्हणजे प्राप्तीवर सगळ्यात जास्त भर दिला जातो. तेथे थातूर-मातूर कारण सांगून अपयश का आलं हे सांगण्यापेक्षा यश मिळालेच पाहिजे या दिशेने काम करण्याची, करुन दाखवायची पद्धती असते. दिलेले ध्येय उद्दिष्ट्ये कोणत्याही परिस्थितीत प्राप्त करणे हेच मॅनेजमेंटचे हेतू असतात. मॅनेजमेंट म्हणजे आपण भाषण किती करतो यापेक्षा प्रत्यक्ष काम काय करतो यावर भर देणारी प्रक्रिया होय. What matters is not just activities but better results. थोडक्यात काय तर हा सूर्य आणि हा जयद्रथ इथे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला असं असतं बरे.
आता मॅनेजमेंटची दिलेली उद्दिष्ट्ये प्राप्त करुन घेण्याची प्रक्रिया काय असते ते पाहू. म्हणजे तुम्ही Results देण्यासाठी काय केले पाहिजे तर
१. Optimum use of Resources साधन सामग्रीचा पुरेपूर उपयोग आणि
२. Higher efficiency उच्च सक्षमीकरण आणि तुमच्या बुद्धीमत्तेचा चांगल्यात चांगला उपयोग करुन उत्तमात उत्तम निकाल देणं.
५. Management is an Art as well as a science. मॅनेजमेंट ही एक कला पण आहे आणि शास्त्र पण आहे. शिवाजी महाराजांनी मॅनेजमेंट एक कला म्हणून आणि एक शास्त्र म्हणून कसे उपयोगात आणले ते आपण विस्तारीत स्वरुपात पुढे पाहूयाच.
६. Management Needs to follow well established principles.
मॅनेजमेंट करताना निर्धारीत केलेले किंवा अस्तित्वात असलेले संस्थेचे, संघटनेचे, राज्याचे नियम कानून कायदे पाळावे लागतात. महाराजांनी याला नाव दिले होते कानूनजाबता. म्हणजे Rules or principles to be followed by ministers, officers and people also, principle for everyone and everyone by the principle. प्रत्येकासाठी कायदा आणि प्रत्येकाने कायदा पाळणे हे तत्व.
आता मॅनेजमेंटचे कायदे किंवा नियम काय असतात तर ते म्हणजे-
१. Division of Work : कामाची विभागणी किंवा विभाजन. महाराजांनी यासाठी अष्टप्रधान मंडळच बनविले म्हणजे स्वराज्याचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून प्रशासनाचे आठ भागात कामच वाटप केलं दुसरं काय ?
२. Authority- Responsibility balance : अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल ठेवणे. अधिकाऱ्याला जेवढा मोठा अधिकार द्यावा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जबाबदार धरावं. छोटा अधिकार छोटी जबाबदारी, मोठा अधिकार तर मोठी जबाबदारी. कारण एखाद्याला मोठा निर्णय घेण्याचा अधिकार देणे म्हणजे तेवढी मोठी जोखीम सुद्धा आलीच की ? बिन अधिकारी आणि फूल जबाबदारी असे करुन तरी कसे चालेल ? म्हणून अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल महाराजांनी साधला म्हणून त्यांचा कोणताच अधिकारी कोठे फेल झालेला दिसून येत नाही. याच्या पुढे जाऊन सांगू, फेल होणाराला महाराजांनी अधिकार दिलेच नाही आणि अधिकार देताना तो फेल होणारच नाही याची काळजी घेऊन त्याला तसा तयार करुन पदावर बसविण्याचा महाराजांचा शिरस्ता होय. म्हणूनच आठ वर्षाच्या शंभू राजांना आग्र्याला नेलं. १६ वर्षाच्या धनाजी जाधवाना संताजी घोरपडेला दक्षिण दिग्वीजयी मोहिमेत बरोबर घेतलं आणि ट्रेनिगं आणि मग जबाबदारी.
३. शिस्तपालन Discipline: मॅनेजमेंटचे मुख्य तत्व म्हणजे शिस्त पाळली जाणे. प्रत्येकाला शिस्त आणि शिस्तीने प्रत्येक जण Discipline for everybody, everybody with discipline.
महाराजांनी कधीही कोणालाही नातेवाईक किंवा गाववाला म्हणून पद दिले नाही. कारण ते स्वतः शिस्त पाळणारे होते. वशिलाबाजी महाराजांच्या मॅनेजमेंट कोषात नाही.
४. Unity of Command: आदेशाची एकवाक्यता
मॅनेजमेंट यशस्वी करायची असेल तर आदेशाची एकवाक्यता असणे अत्यंत महत्वाचे. एका निर्णयावर ठाम राहणे किंवा ठाम राहून निर्णय देणे सारखे सारखे आदेश बदलले तर आदेश पाळणारांची भंबेरी उडून मोठा अनर्थ घडतो किंवा एका माणसाला, गटाला एका अधिकाऱ्याने आदेश देणे योग्य. प्रत्येक मॅनेजरने एकाच गटाला वेगवेगळा आदेश दिला तर बट्ट्याबोळ व्हायला किती वेळ लागणार. म्हणतात ना आदेश अस्ताव्यस्त तर पालनात वाताहत. To many cooks spoil the soups म्हणून स्वराज्याचे सर्व आदेश छत्रपतीकडूनच एकमुखाने जात असत. मंत्र्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता तो यासाठी.
५. Management need not be ownership: मॅनेजमेंट करणे म्हणजे मालकच असलं पाहिजे असे काही नाही. मोठमोठ्या कंपन्यामध्ये मालक वेगळे आणि मॅनेजर वेगळे हे चित्र काही नवीन नाही. शेअरहोल्डर्स मालक तर कंपनी मॅनेजमेंट करणे हे प्रोफेशनल लोकांकडे वर्ग केलेले काम काय योगायोग आहे पहा. मॅनेजमेंटची ही भाषा तिनशे वर्षापूर्वी महाराजांनी अंमलात आणली. माझी रयत ही स्वराज्याची मालक आणि मी या स्वराज्याचा मॅनेजर विश्वस्त हीच भूमिका महाराजांनी आयुष्यभर जोपासली. महाराजांनी स्वतःला स्वराज्याचे मालक कधीच म्हणले नाही. एकही किल्ला स्वतःच्या नावावर सात-बारा करुन घेतला नाही. पण सर्व किल्ल्यांचे व्यवस्थापन मात्र स्वतंत्र पद्धतीनेच केले.
६. Management is dynamic in nature
मॅनेजमेंट ही एक क्रियाशील अशी गोष्ट आहे जी अत्यंत स्वाभाविक आहे. म्हणजेच काय तर मॅनेजमेंटला सतत क्रियाशील आणि नाविन्यपूर्ण असलं पाहिजे. संस्थेच्या कंपनीचे अस्तित्व विकास हे प्रामुख्याने नाविन्यपूर्ण गोष्टीचा उपयोग करण्यावर अवलंबून असतं.
आता ही क्रियाशीलता आणि नाविण्यपूर्णता म्हणजे काय तर ते खालील प्रमाणे सांगता येईल.
A – New and creative ideas नवीन आणि क्रियाशील कल्पनांना जन्म देणे – पन्हाळ्यातून सुटका, आग्ग्रातून सुटका, लाल महालावर छापा, सुरत छापा ही जगजाहीर उदाहरणे
B – New and better products या नवीन कल्पना अस्तित्वात आणताना नवीन वस्तू बनविणे. महाराजांनी वाघनखं, मराठा तलवार बनविल्या ही त्यांची ज्वलंत उदाहरणं.
C – Cost effective process नवीन कल्पना मांडणे, ती अस्तीत्वात उतरवणे. परंतु त्यासाठी लागणारी खर्चाची बाब कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त स्वस्त वस्तू तयार करणे ती ही अगदी क्वालीटीची बरं. अफजलखान भेट प्रसंगासाठी महाराजांनी वाघ नखे बनविली. किती खर्च आला असेल विचार करा. तलवार पट्टा या हत्यारांपेक्षा एक दशांश सुद्धा नाही आणि विशेष म्हणजे हे वाघनखं एवढं मजबूत की जर अफजलखानाने चिलखत घातलं असेल तरी ते एका झटक्यानिशी तुटावं असं आणि effectiveness तर बघा साडे सहा फूट उंचीचा अफजलखान मारायला सहा फूट तलवार नाही तर ४ इंची वाघनखं. याला म्हणतात मॅनेजमेंटचा गुरु cost effectiveness चा बाप.
९. Management Adopts professional approach
मॅनेजमेंट करताना व्यवसायिक दृष्टीकोन ठेवावा लागतो. आता व्यवसायिक दृष्टीकोन ठेवणे म्हणजे काय तर आपल्या सहकाऱ्यांकडून किंवा हाताखालील लोकांकडून व्यवहारवादी दृष्टीकोनातून काम करुन घेणे. यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्या
अशा.
A- Delegate Authority अधिकार द्या. ज्याच्याकडून काम करुन घ्यायचे त्याला ते काम करण्याचा अधिकार द्या.
B- Encourage initiative: सहकाऱ्यांना पुढाकार घ्यायला प्रवृत्त करणे, प्रयत्न न करता नसते अधिकार देऊन काय मातीत जाता काय करायचे अपेक्षित आहे ते पहिले मतीत घाला म्हणजे मातीत जाण्याची वेळ येणार नाही.
C- Invite suggestion: नवीन सुचनांचे स्वागत करा. आपल्या सहकाऱ्यांनी जर काही नवीन सूचना, कल्पना मांडली तर योग्य त्या सूचना कल्पनांचे उदार मताने स्वागत करा. यामुळे सहकाऱ्यांची आपुलकी आत्मविश्वास तर वाढतोच पण कंपनी, संस्थेचंही भलं होतं. सुरत मारल्यावर खूप धनसंपत्ती मिळेल ही बहिर्जीची सूचना महाराजांनी अंमलात
आणली.
D- Provide Training: सहकाऱ्यांना प्रशिक्षण द्या.
सहकाऱ्यांकडून चांगल्या निकालाची अपेक्षा करता ना मग त्यांना ते काम चांगल्या पद्धतीने करता यावं यासाठी चांगलं प्रशिक्षण द्या. प्रशिक्षण न देता एखाद्याला काम देणे म्हणजे काम बिघडवणं होतं. नसता उद्योग होऊन मनस्ताप आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. यासाठी सहकाऱ्यांना प्रशिक्षित करुन मग त्यांना काम सांगणं याला म्हणतात
व्यवसायिक दृष्टीकोन.
वशिला फॅक्टर म्हणजे व वय; शि शिक्षण; ला लायकी काही नसताना
एखाद्या कामाला ठेवणं म्हणजे फक्त नाती सांभाळणं झालं. पण यामुळे सगळं मुसळ केरात जाणं होतं. या उलट योग्य माणसाला योग्य अधिकार देणं त्याला नवीन गोष्टी करण्याची परवानगी स्वातंत्र्य देणं, शिवाय या गोष्टी करण्यासाठी, हाताळण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणं म्हणजेच Professional Approach होय. सेनापतीला युद्धाचा निर्णय घ्यायला देणं, त्याला युद्धासाठी पुढाकार देणे, त्यांच्या सूचनांचा आदर करणे आणि त्यांना गनिमी कावा म्हणजे लढाईचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे. हा प्रोफेशनल अॅप्रोच महाराजांनी ठेवल्यामुळे मराठा फौजा कायम विजयी होत राहिल्या. अगदी तंजावर ते पेशावर पर्यंत शत्रूच्या मानाने अगदी मूठभर असूनसुद्धा.
१०. Management is Aided but cannot be replaced by computers. मॅनेजमेंट करताना संगणक आपल्याला मदत करु शकतो. परंतु मॅनेजमेंटला
पर्याय देऊ शकत नाही. कारण निर्णय घेणं कल्पकतेने निर्णय घेणं, माणसं हाताळणे हे काम मॅनेजर करतो संगणक नाही. म्हणजेच काय तर तंत्रज्ञान मॅनेजमेंटची गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत करु शकतो. परंतु मॅनेजमेंटला मात्र पर्याय होऊ शकत नाही एक मात्र आहे की संगणक मॅनेजर लोकांची संख्या कमी करु शकतो. थोडक्यात काय तर तुम्हाला तलवारी ऐवजी भाला वापरता येईल. पण हात मात्र वापरावाच लागेल. त्याला काय पर्याय. महाराजांनी तंत्रज्ञानाची मदत घेऊन आरमार बांधले. घोडदळ, पायदळ, सज्ज केले. परंतु सैनिकांना पर्याय नाही. तंत्रज्ञानाचा अद्यावत उपयोग केला. त्यामुळे कमी सैन्य लागले पण सैन्याला पर्याय नाहीच ना. प्रगत तंत्रज्ञानामुळेच मराठ्यांच्या हातात महाराजांनी पट्टा आणि विटा हे हत्यार दिले. म्हणूनच ३०० मावळे ५००० शत्रूना ८ तास घोडखिंडीत रोखून धरु शकले ना!
११. Management is all pervasive मॅनेजमेंट सर्वस्पर्शी आहे. मॅनेजमेंट आपल्याला जीवनात सगळ्या क्षेत्रात कामाला येणारी गोष्ट आहे. मग ते खाजगी जीवन, व्यवसायीक जीवन किंवा corporate जीवन असो. याचबरोबर मॅनेजमेंट सगळ्या संस्थासाठीही आवश्यक आहे. मग त्या शालेय संस्था असोत किंवा सामाजिक असोत किंवा औद्योगिक सरकारी असोत. एवढेच काय तर विद्यार्थी, गृहीणी यांनाही मॅनेजमेंट या विषयाचा फायदा होतो.
१२. Management is intangible
मॅनेजमेंट ही डोळ्यांना दाखवता न येणारी प्रक्रिया आहे. मॅनेजमेंट ही एक बौद्धीक संकल्पना असल्यामुळे ती दाखवता येत नाही. परंतु त्यामुळे घेतलेले निर्णय आणि त्यामुळे लागलेले निकाल मात्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. विद्यार्थी अभ्यास कसा करतो हे नाही कळले तरी निकाल आल्यावर दिसतेच की त्याने काय केले ते.
तसंच एखाद्या संस्थेची कंपनीची उत्पादकता वाढणं, कार्यप्रवणता वाढणं, शिस्तबद्ध काम करणारा वर्ग परस्पर चांगले संबंध यातून बरेच काही स्पष्ट होते जे प्रक्रिया करण्याअगोदर आपणाला दाखवता येणे अवघड असते. थोडक्यात काय तर मॅनेजमेंट ही एक अदृश्य गोष्ट पण तिचे निकाल मात्र दृश्य असतात. मॅनेजमेंट पाहतायेत नाही तर त्याचे निकाल जरुर पाहता येतात. कच्च्या दुधातील साय पाहता येत नाही. न जळणाऱ्या लाकडातील आग दिसत नाही. तसेच हे आहे दुसरे काय ? दूधातून साय काढणे, लाकडातून आग काढणे ही एक प्रक्रिया म्हणजे मॅनेजमेंटच आहे की ज्याचा निकाल लागल्यावर ऊस, साखर, साय आणि अग्नी दिसतो, कळलं ना आता ?
१३. Management is required at all levels.
व्यवस्थापन हे सर्व स्थरांवर आवश्यक असते. म्हणजे काय तर व्यवस्थापन हे फक्त मोठ्या संस्थांना किंवा फक्त टॉपच्या वर्गाला आवश्यक असते असे नसून व्यवस्थापन हे उच्च, मध्य आणि निम्न अशा तिन्ही स्तरांवर आवश्यक असते. Top, middle and lower level management आणि या सर्व स्तरावरील व्यक्तींना नियोजन करणे, साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे, सहकाऱ्यांना दिशा देणे, नियंत्रण करणे हे काम करावे लागतेच ना!
१४. Management is continuous process
व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. संस्थेच्या, कंपनीच्या नव्हे तर जगाच्या शेवटच्या अस्तीत्वापर्यंत व्यवस्थापन प्रक्रिया (नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे आणि नियंत्रण करणे) चालूच राहणार अशी आहे. भारतीय भाषेत सांगायचे तर हरी अनंता हरी कथा अनंता. तसे व्यवस्थापन ही अनंत काळपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

