देवाचा मित्र
– डॉ. दत्ता कोहिनकर
Tags: parimal, spiritual,
एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत.
मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, “”काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, “”अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, “”काका – तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.
स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? “”जीवभावे – शिवसेना‘‘ हा मंत्र स्वामीजींनी तरुणांना दिला होता.
गाडगेबाबा तर कीर्तनात सांगायचे, जगाचा नियंता असलेला देव देवळात कोंडू नका. त्याला कुठल्याही कर्मकांडाची गरज नसते. एकदा नाशिकला काही शिष्यांनी गाडगेबाबांना विचारले, “”बाबा, तुम्ही आम्हाला देव दाखवू शकाल का?‘‘ बाबा म्हणाले ठीक आहे, उद्या दाखवतो. असे ते म्हणाले व सकाळी सूर्याचा लालसर गोळा वर येताच सर्वांना म्हणाले, हे पाहा – हा आपला देव – नमस्कार करा याला. हा बारा मास आपल्यासंगे राहतो. या सूर्यनारायणासारखे अनेक नारायण तुमच्या समोर उभे ठाकतील. कदाचित रंजल गांजलेले असतील, त्यांना मदत करा, त्यांची सेवा करा आणि पुढे ते म्हणाले,
“शेंदूर माणोनिया धोंडा। पाया पडती पोरे रांडा।
सोडोनिया खऱ्या देवा। करी धोंड्याची सेवा।।‘‘
म्हणजेच माणसातच त्यांनी देव पाहिला होता. मुक्या प्राण्यांच्या हत्येला त्यांचा तीव्र विरोध होता. देवासाठी मुक्या प्राण्यांचा बळी ही परमेश्वराची थट्टा आहे, असे ते म्हणत… “”असा कसा तुमचा देव। घेतो दुसऱ्याचा जीव।।‘‘
**आचार्य गोएंकाजींना विचारले – देव म्हणजे काय? ते म्हणाले, “”सत्य ही ईश्वर है – परमसत्य ही परमेश्वर है।‘‘ **त्यामुळे सत्याच्या मार्गावर चालणे व चालत्या बोलत्या माणसात देवत्व पाहणे ही काळाची गरज आहे.
दीडशे वर्षांपूर्वी Das Capital म्हणून कार्ल मार्क्सने मोठा ग्रंथ लिहिला. घोषणा केली. लक्षात ठेवण्यासारखी घोषणा आहे. ही धर्माची घोषणा आहे, अध्यात्माची घोषणा आहे. We shall create a classless society- आपण असा मानवी समाज बनवू की, तिथे कोणत्याही तऱ्हेची विभागणी नसेल. जाती, पंथ, धर्म, रंग – कुठल्याही त-हेची विभागणी नाहीच. मग तिथे काय असेल? To everyone according to his needs & from everyone according to his talents. प्रत्येक माणसाला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या देऊ आणि समाजातल्या प्रत्येक माणसाकडून त्याच्याकडे ज्या क्षमता आहेत – कुणाचे शरीर बलिष्ठ आहे. तर त्याच्याकडून शारीरिक काम करून घेऊ, कुणाचा मेंदू बलिष्ठ आहे, त्याच्याकडून बौद्धिक काम करून घेऊ, कुणी संगीतकार आहे तर त्याला गाणी म्हणायला लावू, कुणी चित्रकार आहे तर त्याला चित्र काढायला सांगू असा समाज आपण निर्माण करू की, प्रत्येक माणसाच्या आतील ज्या ऊर्मी आहेत त्यांना आपण मोकळीक करून देऊ. हे अध्यात्माचं क्षेत्र आहे. तीर्थक्षेत्राला अवश्य जा तेथे सकारात्मक तरंगाची अनुभूती अवश्य घ्या. परंतु सगुण भक्ती करता करता प्रगतीपथावर जाऊन निर्गुण निराकाराची साधना करावयास सुरुवात करा. प्रत्येक प्राणीमात्रात त्या ब्रह्माचा अंश पहा….

