१०. Order : प्रत्येकाची योग्य जागा
म्हणजे काय तर संस्थेत किंवा कंपनीत प्रत्येकाची आपापली जागा असली पाहिजे. म्हणजे काय तर योग्य गोष्ट, योग्य व्यक्ती, योग्य वस्तू त्याच्या त्याच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य ठिकाणी असली पाहिजे आणि दुसरे महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्टीला व्यक्तीला, वस्तूला योग्य जागा असली पाहिजे.
There should be a place for everything and everything must be in it’s place again there must be a place for everyone and everything must be in his, it’s place.
या तत्वाचा मुख्य फायदा असा होतो की प्रत्येक व्यक्ती, मशीन आणि इतर गोष्टींना आपआपली जागा दाखवता येते, जागेवर ठेवता येते आणि योग्य ठिकाणी योग्य माणूस किंवा मशीन नसले म्हणजे मोठ्या संकटाला नुकसानीला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे होय.
महाराजांच्या जीवनात व्यवस्थापन करताना order या तत्वाला किती महत्व दिले गेले ते अगदी उदाहरणासकट पाहू म्हणजे नक्की कळेल महाराज मॅनेजमेंचे गुरुच नाही तर बाप देखील आहेत.
शिवाजी महाराज प्रतापगडप्रसंगी अफजलखानाला भेटायला गेले तेव्हा त्यांनी आपला अंगरक्षक म्हणून जीवा महाले यालाच सोबत का घेतले आणि जीवा महालेच्या ऐवजी दुसरा कोणाला सोबत घेतला असता आणि त्याने सय्यद बंडावर वार करताना महाराजांचा जीव धोक्यात असताना जर थोडासा उशीर केला असता हलगर्जीपणा, निष्काळजीपणा किंवा चपळपणात जर काही कमतरता दाखविली असती. तर महाराज आपणाला जीवंत पहायला मिळाले असते का? म्हणजेच काय तर शिवाजी महाराजांनी जीवा महाला हा योग्य माणूस योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी ठेवला आणि त्यानेही योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य कसब दाखवली आणि इतिहास घडला. महाराजाची ही व्यवस्थापनातील order आणि जीवा महालेची कर्तव्यातील order इतिहास निर्माण करु शकली. म्हणूनच व्यवस्थापनाचं हे तत्व जगात अमर झालं ते या नावानं. होता जीवाजी म्हणून वाचला शिवाजी. Everything should be in its place and every one should be in his place.
महाराजांच्या जीवनातील order हे व्यवस्थापनातील तत्व आणखी स्पष्ट करणारा आणखी एक प्रसंग आपणाला सांगतो. त्यामुळे चुकून एकदाच महाराजांकडे order हे व्यवस्थापनाच तत्व पाळलं गेलं असा काही अतिशहाण्या माणसांचा गैरसमजहोत असेल तर तो दूर होऊ शकेल. सांगायचे एवढेच की एकदा, दोनदा नव्हे तर सातत्याने order है व्यवस्थापनातील तत्व महाराजांनी दैनंदिन जीवनात वापरात आणलेले आपणाला पहायला मिळेल.
तर तो प्रसंग असाः
६ जानेवारी १६६४ रोजी महाराज सुरतेवर मोहिमेसाठी गेले आणि ८ जानेवारीला सुरतेचा सुभेदार इनायतखान याने महाराजांना भेटण्यासाठी एक वकील पाठवला. अर्थात वकील म्हटलं की त्याचं काम काय तर निरोप देणे आणि निरोप आणणे. त्याचप्रमाणे हा वकील निरोप घेऊन आला. जे काही इनायत खानाने सांगितले त्याची महाराजांना कल्पना दिली आणि म्हणाला मला आपणाला आणखी काहीतरी खाजगीत सांगावयास सांगितले आहे. असे म्हणून तो त्याची जागा सोडून वेगाने पुढे आला आणि डोळ्याची पापणी लवते न लवते एवढ्यात त्याने एक कपड्यात लपविलेला जांबिया (knife) काढला आणि थेट महाराजाच्या छातीत खुपसण्यासाठी थेट महाराजांच्या अंगावर जाऊन आदळणार अशी झेप घेतली आणि खरोखरच तो हातातील सुरा घेऊन एका क्षणात महाराजांच्या अंगावर येऊन आदळला आणि महाराज खुर्चीतून खाली पडून बेशुद्ध झाले. सगळ्यांना वाटलं महाराजांच्या छातीत सुरा खुपसला आणि महाराज ठार झाले.
परंतु मित्रांनो आश्चर्य वाटून घेऊ नका. तो काही योगायोग नव्हता. महाराजांच्या बाजूला त्यांचा चपळ असा खास अंगरक्षक उभा होता. त्याचं नाव सोमाजी नाईक, त्याने हा वकील सुरा काढून महाराजांच्या दिशेने येत आहे असे पाहताच डोळ्याची वर गेलेली पापणी खाली येण्याचाही वेळ न घेता लगेच पवित्रा घेऊन तलवारीचा एकच वार असा सफाईतदारपणे केला की त्या वकीलाचा हात मनगटापासून एका क्षणात एका फटक्यात वेगळा केला. वकीलाचा हात सुऱ्यासकट खाली पडला खरा. परंतु तरीही तो एवढ्या वेगाने महाराजांच्या अंगावर आला होता की तुटलेल्या हाताचाही धक्का महाराजांना एवढ्या जोरात दिला की महाराज खुर्चीतून खाली पडून बेशुद्ध झाले. अर्थात दुसऱ्याच क्षणाला शुद्धीवर आले आणि सगळ्या मावळ्यांच्या जीवात जीव आला. महाराजांचा संपूर्ण सदरा वकीलाच्या रक्ताने माखलेला होता आणि महाराज मात्र सुरक्षित कसे हे पाहून तेथे असलेल्या इंग्रज पोर्तुगीज फ्रेंचांना आश्चर्य वाटले. आणि ते आश्चर्य होते महाराजांच्या व्यवस्थापन शास्त्रातील order या तत्वाचं. प्रत्येक माणूस योग्य ठिकाणी आणि त्याची योग्य वेळी योग्य कामगिरी.
महाराजांनी ताबडतोब त्या मावळ्याला सोन्याचं कडे देऊन गौरव केला. आणिम्हणाले नाईक आपला पराक्रम बहुमोलाचा. आजपासून आपण जगाच्या पाठीवर सरनाईक म्हणून ओळखला जाल. याला म्हणतात मावळ्याचं कर्मचाऱ्याच त्याच्या कतृत्वाचं योग्य कौतुक. आज महाराष्ट्रातून जे सरनाईक आडनावाचे लोक आहेत ते याच सोमाजी नाईकाचे वारसदार. सोमाजी नाईकाच्या प्रतापाची परंपरा चालवणारा त्यांचा एक वंशज ठाण्यातून आमदार झाले आहेत. नावही तसेच आहे, प्रतापराव सरनाईक.
महाराजांच्या जीवनातील order हे तत्व विश्लेषण करताना आणखी दोन उदाहरणे देता येतील. परंतु ती थोडक्यात सांगतो. पन्हाळ्यातून बाहेर पडताना शिवा काशीदला महाराजांनी शिवाजी बनवून पालखीत बसवला. योग्य माणूस योग्य ठिकाणी योग्य प्रसंगी निवडला. दुसरा प्रसंग महाराज आग्र्यातून सुटताना त्यांनी आपल्या जागी हिरोजी फर्जद याला झोपण्यास सांगितले. हिरोजी फर्जदने महाराजांच्या आजारपणाचे सोंग कसे वठवले आणि औषध आणण्यासाठी जो आग्र्यातून बाहेर पडला तो मोगलांना अजून औषधालाही सापडेना. यालाच म्हणतात योग्य माणूस योग्य ठिकाणी वेळी निवडून त्याला योग्य कामगिरी देणं. आता महाराजांनी नेमलेली ही माणसे जीवा महाले, सोमाजी नाईक, शिवा काशीद, हिरोजी फर्जद जर एवढी कुशल Skill असतील तर त्यांची अचूकपणे निवड करणारे महाराज किती कुशल असतील. मला तर या सर्व प्रसंगावरुन महाराज व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्ती असल्याचं जाणवतं.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

