व्यवस्थापनाची चौदा रत्ने – ११. Equity: समता

११. Equity: समता

Equity हे व्यवस्थापन जगतातील एक महत्वाचे सूत्र किंवा तत्व मानले जाते. समता म्हणजे काय तर सर्वांना समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे. संस्थेत संघटनेत कोणालाही विशिष्ट आणि कोणालाही दुय्यम दर्जाची वागणुक विनाकारण दिली जाऊ नये. संस्थेत जी काही पदोन्नती किंवा बदली केली जाईल ती पूर्णपणे कर्मचाऱ्याच्या कामामुळे असली पाहिजे. चांगले काम असेल तर पदोन्नती देताना हयगय होता कामा नये. आणि जर कोणी चांगले काम करत नसेल तर त्याची बदली करतानाही कोणाची ढवळाढवळ होता कामा नये. काम करणाराला प्रमोशनच्या रुपाने बक्षिस आणि कामचुकाराला बडतर्फी किंवा बदलीच्या रुपाने शिक्षा दिली गेली पाहिजे यालाच म्हणतात समतेचं तत्व. आप-पर, अजा-दुजा असा भाग नाही. यात जात-पात धर्म, भाषा, प्रांत यांचा तर संबंधच लागता कामा नये.

छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन पाहता समानता हे तत्व महाराज किती कटाक्षाने पाळीत होते ते लक्षात येते. उदा. महाराजांनी कधीच आपल्या नातेवाईकांना वशीला लावून स्वराज्यात एकाही पदावर घेतले नाही आणि ज्याची योग्यता आहे त्याला डावलेलंही नाही. अष्टप्रधान मंडळात एकही भोसले नाही आणि स्वराज्याचा राज्यकारभार करताना किल्लेदार, हवालदार पासून सुभेदारापर्यंतच्या सगळ्या नेमणुका जात, धर्म, पंथ, भाषा प्रांत हे मुद्दे न लक्षात घेता नियुक्त्या केलेल्या आहेत आणि सर्वाचे प्रमोशन बदली हे मेरीटप्रमाणे केलेले दिसते.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा रथ चालवताना ब्राह्मण कायस्थ मराठे, आदिवासी, दलित, वनवासी अशा सर्व जातीच्या लोकांना समान न्याय दिला. म्हणूनच त्याकाळी जेव्हा प्रस्थापित मंडळी दलित समाजाला गावाबाहेर ठेवत होती तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना घरात घेतलं. मदारी मेहतर भंगी होता तरी तो सावलीप्रमाणे महाराजासोबत होता. १५० किल्ले दलित समाजाच्या ताब्यात होते. अनेक गावांची पाटीलकी मुसलमान, दलित आदिवासींकडे होती. बहिर्जी सारखा रामोशी समाजातला बुद्धीमान पोरगा स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता. नाभिक समाजातील जीवा महाले अंगरक्षक होता. मुस्लीम समाजातील मुल्ला काझी हैदर न्यायाधिश होता आणि गंगाराम सारखा गुजराती माणूस दहा-हजारी मनसबदार होता. तर येसुबाई सारखी १७ वर्षाची तरुण मुलगी स्वराज्याची कुलमुख्यतेयार होती. ज्या काळात महिलांना राजकारणात येणे दुरापास्त होते त्या काळात महाराजांनी महिलांना राजकारणातप्रशासनात आणलं. हे स्त्री पुरुष समानतेच्या नुसत्या बाजारगप्पा मारणाऱ्यांनी नीट लक्षात घ्यावं म्हणजे बरोबर कळेल की महाराज त्यांच्या व्यवस्थापनात समानतेच तत्व अंमलात आणायला राज्यकारभार करताना कसलाच भेदभाव स्त्री-पुरुष, उच्च निच जात, पात, धर्म, भाषा यावरुन करत नव्हते आणि कामचुकाराला मात्र कधीच सोडत नव्हते. महाराजांचे एक पत्र अत्यंत प्रसिद्ध असे आहे. ज्यात महाराजांनी जीवाजी विनायक या ब्राह्मण अधिकाऱ्याला ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पाहतो या शब्दात खरमरीत मेमो पाठविला होता.

आपण ब्राह्मण असल्यामुळे महाराज आपणाला शिक्षा करणार नाहीत हा त्याचा गैरसमज खोडून टाकणारे महाराज समतेचं तत्व पाळताना दिसतात. तसेच शिक्षा करताना कोणी नातेवाईक मित्र आहे म्हणून मोकळेही सोडले नाही. सोमाजी गायकवाड नावाच्या सोयऱ्याचे डोळे काढण्याचा आदेश देणे किंवा खंडोजी खोपड्यांबद्दल कान्हेजी जेधेंनी रदबदली केलेली असतानाही हातपाय कलम करणे, गावातील एका गरीब मुलीचा विनयभंग केला म्हणून प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या पाटलाचेही हात कलम करणे ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील समता या तत्वाची ज्वलंत उदाहरणे होत. निरपेक्ष वशीला रहीत प्रशासन आणि व्यवस्थापन जगाच्या पाठीवर कोणी केले असेल तर ते १०० टक्के महाराजांनीच. कारण ते रयतेचे राजे होते. समतेच्या तत्वाचे पोशिंदे होते.

King of common man so the king of equity.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!