जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : ६. Decision making skills: निर्णय घेण्याचं कौशल्य

जागतिक किर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये : ६. Decision making skills: निर्णय घेण्याचं कौशल्य

 

६. Decision making skills: निर्णय घेण्याचं कौशल्य

प्रत्येक व्यवस्थापकाला आयुष्यात एक काम करावंच लागतं आणि ते म्हणजे निर्णय घेणे. आता निर्णय घेणं म्हणजे कामाचा निकाल लावणे नव्हे निर्णय घेणे म्हणजे प्रश्न नीट समजून घेऊन त्यांची पर्यायी चार-पाच उत्तरे शोधणे या पर्यायी उत्तराचं विश्लेषण करुन त्यातून अचूक असा पर्याय निवडून काढणे आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्याची प्रक्रीया सुरु करणे म्हणजे निर्णय घेणे. इथे निर्णय म्हणजे योग्य निर्णय नव्हे तर सर्वात उत्कृष्ट पर्याय निवडून बिनचूक निर्णय घेणे अपेक्षित असते. एखादा प्रश्न समोर आला आणि त्यावर उत्तरच न देणं ही काही प्रश्न सोडविण्याची पद्धत नसते.

निर्णयच न घेणे हा निर्णय असू शकत नाही. निर्णय न घेणं म्हणजे प्रश्न सोडविणे होत नसतं तर त्यामुळे प्रश्न वाढत जाऊन मग एक दिवस काळच आपला निर्णय देतो. आपणाला निर्णय न घेता आपल्यावर एक पाळी येते आणि ती म्हणजे कंपनी, संस्था बंद करणे आणि आपला तंबू गुंडाळणे. बोऱ्या, बिस्तरा उचलणे आणि घर गाठणे. ज्याला ध्येय गाठायचे त्याने निर्णय हा घेतलाच पाहिजे इथे निर्णय चूक की बरोबर निघेल हा वाद करण्यात वेळ घालवायचा नसतो. तर ताबडतोब एक चांगला निर्णय घेऊन तशी अंमलबजावणी सुरु करायची असते. निर्णय न घेणारा ध्येयापर्यंत कधीच पोहचत नाही आणि ध्येयावर नजर न ठेवता घेतलेला निर्णय घेऊनही काही उपयोग नाही. म्हणून योग्य ध्येय ठेवून योग्य निर्णय घेतला तरच योग्य यश हाती सापडेल नाही तर तेलही गेलं तूप ही गेलं अशी अवस्था होऊ शकते. सावध असा. आपलं ध्येय ठरवताना जागरुक असा निर्णय घेताना आणि दक्ष रहा वाटचाल करताना म्हणजेच काय तर प्रत्येक वळणार निर्णय घेत रहा. जे आपल्या जीवनाला राष्ट्राला योग्य वळणावर घेऊन जातील.

जे निर्णयच घेत नसतात ते चुकाच करत नसतात आणि जे चूक होण्याच्या भितीने निर्णय घेणंच टाळतात त्यांना अनुभवच मिळत नाही आणि अनुभवाच्या अभावाने आयुष्यातील सगळेच निर्णय चुकतात. म्हणून किमान अनुभव मिळण्यासाठी तरी चुकीचा का होईना पण निर्णय घ्या. कारण या अनुभवातून तुम्ही शहाणे होऊन पुढे परत तीच चूक होणार नाही याची दक्षता घ्याल आणि हाच निर्णय जीवनाला योग्य दिशा आणि अपेक्षित असं यश देईल.

इतरांच्या चुकांमधून शिका स्वतःच्या चुकांमधून शिका आणि चुकांची पुनरावृत्ती करु नका

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!