महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती

अग्नीचा उपयोग महाराजांनी संदेश वहनासाठी आग्रा शहरातून बाहेर पडण्यासाठी अचूकपणे केला होता. महाराज कैदेतून निसटले की सर्वात पहिली मजल मारणार होते ते कुंभार वाड्यात आणि तेथून घोडे घेऊन पुढचा प्रवास करणार होते. शिवाजी महाराजांना बाहेर पडल्यावर व्यवस्थित दिशा दर्शन व्हावे म्हणून त्या कुंभाराला संभाजी राजांनी जवळच्याच विस्तीर्ण सपाट मैदानावर एका उंचवट्याच्या ठिकाणी नवीन भट्टी लावण्यास सांगितले. त्यासाठी लागणारी सर्व आर्थिक बाजू शंभू राजांनी सांभाळली. रात्रंदिवस ती भट्टी कायम पेटती राहील याची दक्षता घेण्याची सूचना केली. महाराज दिवसा-रात्री-अपरात्री केव्हाही बाहेर पडले तरी योग्य दिशेनेच प्रवास व्हावा यासाठी ही सगळी धडपड चालू होती. महाराजांच्या ठिकाणापासून जवळपास तीन कोसांच्या अंतरावर ही पेटती भट्टी तयार ठेवली गेली होती. सलग तीन महिने ही भट्टी चालूच होती.

आजूबाजूला झाडी नाही डोंगर दरी नाही अशा सपाट प्रदेशात आणि निर्मनुष्य ठिकाणी ही भट्टी लावली गेली होती. महाराज दिवसा बाहेर पडले तर धुराच्या लोटावरून दिशा निश्चित होणार होती आणि रात्री बाहेर पडले तर पेटत्या ज्वाळा मार्गदर्शन करणार होत्या. संभाजी राजे आणि महाराज दोघेही वेगवेगळ्या मार्गाने तेथपर्यंत पोचणार होते म्हणून आणखी सावधानता बाळगली जात होती. एकदा जर दिशा चुकली तर साऱ्या मेहनतीवर पाणी फिरणार होते. महाराज किंवा शंभू राजे कोणीही तावडीत सापडले असते तरी मोहीम असफल होणार होती. आणि म्हणून दोघांनाही एकाच वेळी आग्ग्रातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी ही योजना राबवली जात होती. एवढी महत्वाची जबाबदारी पार पाडणारी भट्टी कायम पेटती ठेवण्यासाठी त्या कुंभाराने आणि त्याच्या दोन मुलांनी काय काय कष्ट उपसले असतील ते त्यांचे त्यांनाच माहिती. परंतु महाराजांच्या या निकडीच्या प्रसंगालाच शिरसावंद्य मानून त्यांनी आपली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडली. सलग तीन महिने डोळ्यात तेल घालून त्यांनी ती भट्टी पेटती ठेवली.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!