८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.

८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.

राजे जगातील कोणतेही ध्येय अशक्य नसते. तेव्हा प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे ध्येय हे योग्य वयातच ठरविले पाहिजे. म्हणूनच तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणूनच वयाच्या बाराव्या वर्षीच आम्ही तुम्हाला स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र राजमुद्रा आणि स्वतंत्र कारभार दिला आहे. जेव्हा आपण कोणतेही ध्येय ठरवितो तेव्हा एक गोष्ट पक्की असली पाहिजे आणि ती म्हणजे आपले ध्येय हे स्पष्ट असले पाहिजे. anything specific is terrific.

लक्ष जेवढं स्पष्ट असेल तेवढेच ते प्राप्त करणं सोपं जातं. ध्येयाबाबतचा अघळपघळपणा ध्येयप्राप्तीच्या आड येऊ शकतो. म्हणूनच ध्येय निश्चित आणि स्पष्ट असेच असावे. तर आज मी तुम्हाला ध्येयप्राप्तीसाठी लागणारे सात मंत्र सांगणार आहे ते तुम्ही नीट लक्षात घेऊन लक्षप्राप्तीकडे वाटचाल करावी.

ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक सात मंत्र :-

१. मन, वेळ आणि संवाद कौशल्य यांची परिसिमा गाठा

maximise time, mind and communication skill. यात तीन गोष्टीचा अंतर्भाव आहे आणि त्या म्हणजे मन, वेळ आणि संवाद कौशल्य. आपल्या मनाची सुप्तशक्ती आणि मनाची एकाग्रता कायम कशी वाढत राहील यावर लक्ष केंद्रित करा. चंचल मनाने ध्येयप्राप्ती होत नाही. ध्येयप्राप्तीसाठी मन शांत आणि स्थिर असावे लागते. तेव्हा मनाला स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत न्यायचा प्रयत्न करा. आनंद आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी यश आणि अपयश हे दोन्ही समान चित्ताने स्वीकार करा. आनंदात बेहोश व्हायचं नाही आणि दुःखात
बुडून जायचे नाही. यश मिळाले तर हरळून जायचे नाही आणि एखादेवेळी अपयश आले तरी खचून जायचे नाही. मनाची अशी तयारी करणं म्हणजेच स्थितप्रज्ञ होणं. असं झालं की माणूस संभ्रमित होत नाही. आणि जो संभ्रमित होत नाही तोच ध्येयापर्यंत जाऊ शकतो तेव्हा मनावर नियंत्रण मिळवा आणि मनाच्या असीम अमर्याद शक्तीचा आपल्या ध्येयप्राप्तीसाठी उपयोग करून घ्या. मन ताब्यात घ्या ध्येय आपोआप ताब्यात येते.

दुसरे काम म्हणजे वेळ. ज्याच्या आयुष्यात मोठं ध्येय असतं त्याच्या आयुष्यात भरपूर कामे असतात आणि त्यामुळे त्याच्याकडे वेळेची कमतरता राहते. अशा वेळी वेळेचे व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या कामाचे विभाजन केले पाहिजे. सगळीच कामे आपण स्वतः करीत बसायचे नाही. काही कामे मंत्री, सेनापती, कर्मचारी आणि सैनिक यांच्यावर सोपवत गेलं पाहिजे. राजाचे काम फक्त नियोजनाचं असलं पाहिजे. तर आता कामाचे प्रकार सांगते ते नीट समजून घ्या.

१) करावयाची कामे – do जी कामे आज आणि आता ताबडतोब केली पाहिजेत अशी कामे

२) नंतर करावयाची कामे delay – जी कामे उद्यावर ढकलण्यासारखी असतील अशी कामे

३) नकारायची कामे – deny – जी कामे करणे योग्य नाही त्यांना नकार द्या आणि विषय संपवा.

४) टाकीव कामे – dump – जी कामे निरूपयोगी आहेत ती कामे टाकून द्या.

तिसरे म्हणजे आपले संवाद कौशल्य वाढवा ते अगदी उत्कृष्टतेपर्यंत न्या. संवादानेच जग आणि जंग दोन्ही जिंकता येते हे लक्षात ठेवा. संवाद कौशल्य कसे असावे हे श्रीकृष्णाच्या चरित्रातून शिका. कोणत्या प्रसंगी, कधी काय बोलायचे, काय टाळायचे, कमी बोलायचे का जास्त बोलायचे हे काळवेळ पाहून यथार्थपणे ठरविणे म्हणजेच संवाद कौशल्य होय. रयतेशी

बोलताना मधूर, सैनिकांशी बोलताना मर्यादित आणि शत्रूशी संवाद साधताना सावध असणं म्हणजेच संवाद कौशल्य असणं होय. ते
तुम्ही एवढे उत्कृष्टपणे शिकून घ्या की लोकांना तुमच्या यशाबद्दल नेहमी कुतुहल वाटलं पाहिजे.

उत्कृष्ट संवाद कौशल्याची मला इथे दोन उदाहरणे द्यावीशी वाटतात आणि ती म्हणजे जिजाऊसाहेबांनी अफजलखानाशी प्रतापगडाच्या पायथ्याला वाईच्या तळावर साधलेला संवाद आणि शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या पायथ्याला मिर्जाराजे जयसिंहाशी साधलेला संवाद. दोन्ही प्रसंगांचा संवाद खूप बोलका आणि प्रसंगांना कलाटणी देणारा असा होता. परंतु तो प्रसंग आता इथे विस्तारपूर्वक सांगणे होणार नाही. त्यावर चार-पाच पाने सहज खचर्ची पडतील आणि मग संवाद कौशल्य हा मुद्दा आटोपशीर न राहता लांबेल म्हणून टाळतो.

जेव्हा तुम्ही मन, वेळ आणि संवादकौशल्य वाढवता तुमचे नाव आपोआप लोकांमध्ये प्रसिद्ध होत जाते. कारण जो या तिन्ही गोष्टीवर विजय मिळवतो तो दिवसेंदिवस मोठ-मोठे विजय मिळवत आपला इतिहास तयार करत जातो. कर्तृत्वाची एक एक शिखरे पार करत जातो आणि असा यशस्वी माणूस जगात आपली एक ओळख निर्माण करतो. तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवा की आपण आपली स्वतःची ओळख तयार केली पाहिजे आणि त्यासाठी नवनवीन विक्रम प्रस्थापित करणारे विजय मिळवत गेलं पाहिजे.

व्यवहारिक जगात तर branding is the way to maximise the profit हेच तत्त्व वापरल जाते तेव्हा प्रत्येक यशातून आपलं ब्रेडिंग आपली ओळख आणखी मजबूत करत करत आपल्या कर्तृत्वाची छाप ही काळाच्या कपाळावर आणि छातीवर कोरून जावे.

आणि यासाठी सदैव आपल्या मेंदूला योग्य तो खुराक देत चला.

Always give Right inputs to your brain. मेंदूला योग्य काम लावा, मेंदूला योग्य सवय लावा, मेंदूला योग्य ठिकाणी ताण घ्यायला आणि योग्य ठिकाणी शांत रहायला शिकवा. आपला मेंदू जागेवर असेल तर मग मन कोठे पळून जाईल आणि वेळ तो कसा वाया जाईल. तेव्हा यशप्राप्तीसाठी आपल्या मेंदूला सतत नवनवीन गोष्टींचा आणि योग्य गोष्टींचा खुराक देत चला.

****************************************************************************************************************************************************************************

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!