८. ध्येयप्राप्तीची तयारी करा.
३) तुम्हाला तुमच्यावर प्रचंड विश्वास असला पाहिजे.
राजे जगातील कोणतेही ध्येय अशक्य नसते ते अवघड जरूर असू शकते. पण ते प्राप्त करण्यासाठी तुमचा तुमच्यावर ताकदीवर प्रचंड असा आत्मविश्वास असला पाहिजे. माणसाला जेव्हा स्वतःवर, स्वतःच्या ताकदीवर, क्षमतेवर आत्मविश्वास असतो तेव्हा तो फक्त उडी मारत नाही तर तो झेप घेतो. ती झेप गरूड झेपच असते. गरूडाची पिल्ले उडण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते घरट्यात असतानाच आपल्या पखांची ताकद सतत अजमावत असतात आणि जेव्हा ते पिल्लू झेप घेते तेव्हा ते पहिली आणि शेवटची ठरेल अशी प्रचंड धोका असलेली झेप घेत. कारण त्याचा आपल्या पंखावर आत्मविश्वास असतो की हे पंख मी जर पूर्ण ताकदीने हलवले तर मी घरट्यातून जमिनीवर तर पडणार नाहीच परंतु आकाशाला कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही.
हाच आत्मविश्वास जेव्हा वाढत जातो तेव्हा तेच गरूडाचे पिल्लू लांब लांबच्या भराऱ्या घेत आणि नंतर नंतर ते ढगांच्या वरून उडायला शिकते. आणि तेच पिल्लू जेव्हा शिकार करण्यासाठी प्रचंड वेगाने खाली जमिनीवर लक्ष्य पकडायला येते तेव्हा रॉकेटच्या वेगाने येऊन कधीही जमिनीवर आदळत नाही. वेगाने आकाशात उडणे आणि लक्ष्य पकडून पुन्हा त्याच वेगाने उडणे हे सर्व होते ते फक्त त्या गरूडाच्या आत्मविश्वासामुळे. त्याचा विश्वास स्वतःच्या क्षमतेवर आणि तसेच पंखावर असतो. तसं तुम्ही तुमचा हौसला बुलंद ठेवा कारण उड्डाण करायचे तर पंख नंतर लागतील अगोदर आत्मविश्वास लागेल. तेव्हा massive leaps of faith स्वतःवर, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या कौशल्यावर प्रचंड आत्मविश्वास ठेवा. कोणत्याही स्थितीत आणि कितीही बिकट परिस्थितीत तुम्ही आपला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका किंवा गमावू नका.
आत्मविश्वास संपला तर सगळं जग संपतं. तेव्हा जग संपलं तरी चालेल पण आपला आत्मविश्वास संपू देऊ नका. खंबीर रहा आणि पुढे चालत रहा यश मिळाल्याशिवाय रहात नाही. राजमाता जिजाऊसाहेबांच्या या शिकविणीचा महाराजांना पन्हाळ्याचा चार महिना बंदीत आणि आग्याच्या चार महिन्याच्या अटकेत खूप उपयोग झाला. आणि खंबीर राहून महाराजांनी आपला आत्मविश्वास कायम ठेवला आणि दोन्ही ठिकाणी हूल देऊन पुन्हा गरूड भरारी घेतली. आपणही आपल्या आयुष्यात कधी खचायचे नाही. तुम्ही हिंमत ठेवा. खंबीर रहा नियतीला त्याची दखल घ्यावीच लागते. प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सुटका ही होतेच फक्त आपण खंबीर राहीलं पाहिजे. आणि आपण खंबीर तेव्हाच राहू शकतो जेव्हा आपला आपल्यावर, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल.
पराभवाचा विचार केला तर पराभवच होईल आणि विजयाचा विचार केला तर विजयच मिळेल. मग पराभवाचा विचार करायचाच कशाला? पराभवाचा विचार तेच करतील ज्यांना स्वतःवर विश्वास नसेल स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नसेल.
*************************************************************************************************************************************************************************
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
