१५. आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.

१५. आयुष्य बदलविण्यासाठीची तयारी करा.

१) लक्ष बदलू नका.

यशस्वी होणारी माणसे मोठी होणारी माणसे त्यांच्या आयुष्याचे एक ध्येय ठरवतात. आणि मग कोणत्याही परिस्थितीत ते ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, प्रसंग अगदीच बिकट आला तर प्रसंगी ते मार्ग बदलतात परंतु आपले ध्येय कधीही सोडत नाहीत. सामान्य माणूस आणि असामान्य माणूस यांच्यात हाच एक मोठा मुलभूत असा फरक आहे. सामान्य माणसं संकटे आली, अडचणी आल्या, थोडीशी वाट अवघड वाटली की लगेच आपले ठरलेले ध्येय सोडतात आणि दुसरे हलक्या प्रतीचे ध्येय ठरवतात. असं प्रसंग पाहून ते सतत ध्येय बदलत राहतात आणि मग अपयशी होता. एकदा रोप लावले की त्याला सतत खत आणि पाणी घालत राहावे लागते तेव्हा कुठे पाच-सात वर्षांनी त्याला फळे लागतात. ही सामान्य माणसं अधीर असतात. त्यांना धीर धरता येत नाही. मग ते लावलेले रोपटे रोज उपटून बघतात की
आता किती वाढलंय आणि मग काय होते तर ते झाड न वाढता मरून जाते आणि हा परत दुसरे रोप लावायला घेतो.

शहाणा माणूस अशी चूक कधीच करत नाही. तो आपले लक्ष्य निर्धारित करतो आणि मग ते कायम पकडून ठेवतो. कितीही संघर्ष करायला लागला तरी तो आपले ध्येय बरोबरच आहे या खात्रीने काम करतो आणि एक दिवस ते ध्येय प्राप्त करतोच. राजमाता जिजाऊ यांच्या ह्या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कितीतरी मोठी संकटे आली, अनेकदा जीवघेणे प्रसंग आले, अनेकदा कोंडी झाली तरीपण आपले स्वराज्य निर्मितीचे ध्येय काही सोडले नाही. प्रसंगी माघार घेतली. प्रसंगी तह केला, प्रसंगी थोडी रणनिती बदलली. परंतु ध्येय मात्र कधी बदलले नाही. सामान्य माणसं प्रसंग अवघड आला की ध्येय बदलतात पण दिशा मात्र तीच ठेवतात. काम करण्याची पद्धत तीच ठेवतात. परंतु यशस्वी माणसं मात्र प्रसंगी दिशा रणनिती, डावपेच, मार्ग बदलतात. पण ध्येय मात्र धरून ठेवतात. ध्येय कोणत्याही परिस्थितीत सोडत नाहीत. आणि पराभूत झालेल्या लोकांना कधी जगावर प्रभाव टाकता आला नाही. तेव्हा प्रभावी व्यक्ती होण्याचा एकच मार्ग आहे तो तुम्ही कायम लक्षात ठेवा. ध्येय पकडून ठेवा. Hold on to your goal.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!