१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.
६. जिंकण्याची प्रवृत्ती कायम ठेवा Keep winning attitude
शिवबाराजे अपयशातून यशाकडे जाणारा आता एक शेवटचा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तो मंत्र म्हणजे तुम्ही तुमची जिंकण्याची प्रवृत्ती Winning attitude कायम ठेवा. जिंकण्याची प्रवृत्ती कायम ठेवणे याचे दोन अर्थ होतात.
१) कोणावरही अवलंबून न राहता काम सुरू करा आणि संपवा.
२) जगात तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही हेच लक्षात ठेवा.
तर आता यातील पहिला मंत्र जो आहे तो हा आहे की तुम्ही यशासाठी किंवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणाच्या मदतीची वाट पाहण्यात वेळ वाया घालवू नका. जे काही करायचे ते स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या हिमतीवर. जगाला मदत मागायला आवडते मदत करायला नाही. तेव्हा आपण जे स्वराज्याचे काम हाती घेतले आहे ते कोणावरही अवलंबून ठेवता कामा नये. जे सोबत येतील त्यांच्यासोबत, जे न येतील त्यांच्याशिवाय आणि जे विरोधात येतील त्यांना पुरुन उरून पण हे स्वराज्याचे ध्येय पूर्ण करायचेच.
तुमची जिंकण्याची प्रवृत्ती तेव्हाच कायम राहील जेव्हा तुम्ही कोणावरही अवलंबून राहणे सोडून द्याल. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडालाच म्हणून समजा. तेव्हा आपण कोणावरही अवलंबून रहायचे नाही आणि कोणीतरी मदतीला येईल या भाबड्या अपेक्षेवर अवलंबून राहून आपले काम कधी लांबणीवर टाकायचे नाही. जे काही करायचे ते स्वतःच्या क्षमतेवर करायचे आणि सतत आपली क्षमता वाढवत रहायचे. आपण लोकांवर अवलंबून रहाण्यापेक्षा लोक आपल्या मदतीची अपेक्षा करू शकतील एवढी क्षमता आपण कमावत गेले पाहिजे. कोणी आले नाही म्हणून किंवा कोणी दांडी मारली म्हणून आपले कामकाज ठप्प होणार नाही याची काळजी घ्यायची. कायम प्लॅन-ए आणि सोबतच प्लॅन बी तयारच ठेवा. जे काही अवलंबून रहायचे ते आपल्या नियोजनावर आणि आपल्या क्षमतेवर इतरांवर नाही. आणि लोकांवर अवलंबून रहायचे नाही म्हणजेच पर्यायी माणसे तयार करूनच ठेवायची. “तु नही तो और सही” कोणी नाही म्हणताच दुसरा माणूस तयार ठेवा. त्यामुळे तुम्हाला कोणीच नाही म्हणण्याची हिंमत ठेवणार नाही. आपल्यावाचून स्वराज्याचे कोणतेही काम अडकून पडणार नाही याची सर्वांना जाणीव करून द्या. हे काम सुरू होणार पुढे जाणार आणि आपले ध्येय साकार करूनच थांबणार हे जगाला आणि लोकांना माहित करून द्या. म्हणजे कोणी संधीचा गैरफायदा घेऊन आपली अडवणूक करू शकणार नाही. कोणी आपणाला कोंडीत पकडू नये असे वाटत असेल तर याला एकच पर्याय आणि तो म्हणजे स्वयंपूर्ण होणे. self sufficient होणे. आणि जेव्हा आपण स्वयंपूर्ण होतो तेव्हाच आपली जिंकण्याची प्रवृत्ती कायम राहते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
