जडणघडणीचा काळ :जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण

जडणघडणीचा काळ :

जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण

दारात जिपडे आणायचेच !

शालेय वयात माझ्या पंखात बळ देण्याचे काम अनेकांनी केले. त्यात माझे आजोबा, आजी, आईवडील, मोठे मामा, शिक्षकही होते. माझ्या आजोबांनी मला नेहमी मोठे स्वप्न पाहायला शिकविले. त्यासाठी अफाट जिद्द बाळगायला, कष्ट करायला शिकविले. त्याचवेळी जीवन जगताना प्रामाणिकपणा, स्वतःच्या व इतरांच्याही वेळेचे महत्व जपण्यास शिकविले. मुळातच शेतकरी असल्याने पिकाला वी लावण्यापासून ते तरारून फुलण्यापर्यंतच्या प्रवासात किती जपावे लागले, हे आजोबांना माहिती होते. तसेच चांगल्या विचारांचे बीजारोपण त्यांनी माझ्या मनात केले. मला वेळोवेळी संस्कारांचे, चांगल्या विचारांचे खतपाणी दिले. आजोबांच्या सहवासात मी ज्या गोष्टी शिकलो, त्याचा मला आयुष्यभर खूप उपयोग झाला. कठीण प्रसंगात तगून राहण्यास बळ मिळाले, संकटकाळात धैयनि उभे राहण्याची हिंमत मिळाली. आजोबा मला नेहमी सांगत, “तुला मोठा साहेब व्हायचं आहे.” खरे तर साहेब म्हणजे नक्की काय असते, हे त्यांनाही त्या काळी माहिती नव्हते व मलाही त्या वयात ते कळायचा विषयच नव्हता. फक्त एक माहीत होते की, साहेब म्हणजे खूप मोठा माणूस. त्याचा वेगळाच रुबाब असतो. त्या काळात आमच्या लेखी जरा बरा शर्टपेंट घालणारा, नोकरी करणारा व शहरी बोलणारा माणूस म्हणजे साहेब, तर आजोबा म्हणायचे, “तू नोकरदार बन. शेतकरी होऊ नको. शेतकऱ्याचं सगळं आयुष्य मातीत जोडे तुटलेले रावण्यात जातं व शेवटी त्याचीही मातीच होते. शेतात काम करताना धोतर फाटलेलं असतं, जोडे असतात. काट्याकुट्यात रक्तबंबाळ होईपर्यंत कष्ट करावे लागतात. एवढं करूनही कोणी शेतकऱ्याला मानसन्मान देत नाही, इज्जत मिळत नाही, पैसा तर नाहीच नाही. त्यामुळे तू आपला नोकरी कर व मोष्ठा साहेब हो. पाच भावांत तूच एकटा जास्त हुशार आहेस, माझा एक तरी नातू साहेब झालेला मला पाहायचा आहे. तसंच माझी एक इच्छा आहे की, आपल्या ओट्याला जीप लागली की, मी धन्य होईन.” जणू काही आजोबा माझ्याकडे त्यांच्या कर्मकहाणीतून वेगळे काही तरी करण्याची अपेक्षाच व्यक्त करीत होते. त्यांच्या त्या बोलण्याचा, इच्छेचा मनावर खोलवर परिणाम नक्कीच झाला. दारापुढे जीप येण्याची त्यांची इच्छा ऐकून मलाही प्रेरणा मिळायची, आपल्याला शिकावेच लागेल. आपल्यावर आभाळाएवढी माया करणाऱ्या आजोबांचे स्वप्न पूर्ण केलेच पाहिजे, असा निश्चय मी करायचो. त्या काळात आमच्याकडे साधी सायकलही नव्हती व आजोबा मला स्वप्न दाखवत होते साहेब व्हायचे, दारात जिपडे उभे करायचे. आता जिपडेच का? तर त्याचीही एक गोष्ट आहे.

आमच्या गावात त्याकाळात त्रिंबक लक्ष्मणराव मुटकुळे हे बडे प्रस्थ होते. इंजिनिअर असलेले मुटकुळे हे इरिगेशनमध्ये नोकरीला होते. त्यांच्याकडे सरकारी जीप असायची. त्यांचा आमचा शेजारच होता. ते जीप घेऊन येत, तेव्हा त्या जीपची समोरची बाजू आमच्या वाड्याच्या ओट्याला लागत असे. आजोबा ती जीप पाहिली की, अस्वस्थ होत. त्यांच्या मनाची घालमेल होत असे. असलीच जीप म्हणजेच सुवत्ता आपल्या दारातही यायला पाहिजे, असे त्यांना वाटायचे आणि ही अपेक्षा मीच पूर्ण करू शकतो, हा त्यांचा विश्वास होता. त्या अपेक्षेच्या ओड्याने दवून जाण्यापेक्षा मला त्यात अभिमानच वाटायचा. सर्वात महत्त्वाची शिकवण आजोबांनी दिली ती म्हणजे कोणत्याही चांगल्या कामाची लाज न बाळगण्याची. कोणतेच काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते. जे काम करायचे, त्यात पारंगत व्हायचे, हातखंडा मिळवायचा. “एवढं केलं, तरी तू जीवनात नक्की यशस्वी होशील, आमच्या सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करशील.” असे शिक्षण ते मला नेहमी द्यायचे. ते कामाच्या बाबतीत स्वतःचे उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, “मी नाही का लोहाराचं, सुताराचं, वडाऱ्याचं, चांभाराचं, शेतकऱ्याचं -अशी सगळ्यांचीच कामं करतो. कोणतंही काम हलके नसतं, आपण त्यात कौशल्य मिळवायचं.” या काळातील आजोबांच्या कर्तबगारीची एक आठवण आवर्जून सांगण्यासारखी आहे. आमचा कुटुंबकबिला मोठा होता. एकदा आजोबा व वडिलांच्या मनात आले, आपण शिलाई मशीन घ्यावी. वडिलांनी ‘अनमोल’ कंपनीची एक नवीन शिलाई मशीन घरी आणली. मी पाचवी-सहावीत शिकत असेन. आम्हा सगळ्या भावंडांना त्या मशीनची नवलाई होती, आपल्याला त्यावर बसून झरझर कपडे शिवायची संधी मिळेल का, अशी उत्सुकता होती. आमच्यात स्पर्धा लागली की, सर्वात आधी कोणाला ती मशीन चालवायला मिळेल. त्यावर आजोबांनी आमच्यात स्पर्धा घेण्याचे ठरविले. त्यांनी सांगितले, “चड्डीसाठी लागणारी नाडी जो सर्वात बारीक शिवून दाखवेल, त्याला मी टेलरकाम शिकविणार. बाकीच्यांना शेतात काम करावं लागेल.” झाले, आम्ही सगळे बारीक नाजूक नाडी शिवायला बसलो. मी सगळ्यांत बारीक नाडी शिवून दाखविली व मला मशीन चालविण्याचा व टेलर होण्याचा मान मिळाला. अशा पोटा गोष्टीतून आजोबा आम्हा भावंडांना नवीन काही तरी शिकण्यासाठी, पारंगत होण्यासाठी प्रोत्साहन देत.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!