जडणघडणीचा काळ :
जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण
विहिरीला पाणी लागले व तेलरांधा केला
आजोबा व वडिलांची अशी अनेक कामे सांगता येतील. आजोबांनी प्लॅन तयार करायचा, माझ्या वडिलांशी च0र्चा करून त्याची अंमलबजावणी करायची व आम्ही भावडांनी त्या कामात आमच्या परीने सहभाग घ्यायचा आमचा जमीजुमला मोठा असल्याने पाणीही भरपूर लागायचे. आमच्या शिवारात जमिनीत खोलवर जास्त पाणी नव्हते. त्यामुळे आम्ही पंधरा एकरांच्या एका तुकड्यात पाच विहिरी खोदल्या. मी सातवीत असताना शेवटची पाचवी विहीर फोडण्याचे काम चालू होते. तीन परस /विहीर खोदली होती. काळा पाषाण खडक लागला, पाण्याचा थेंबही दिसत नव्हता. वडील आणि आम्ही सगळे भाऊ सुरुंग पाडण्यासाठी घण, गुठ्या (छोटी पहार) घेऊन खडकात होल घेत होतो. तीन ठिकाणी वेगवेगळे होल घेत होतो. हे काम चालू असताना अचानक पाषाणाचा एक खपरा उडाला व माझ्या कपाळात घुसला. विहिरीतून पाण्याची चिळकांडी येण्याऐवजी माझ्या कपाळातून रक्ताची चिळकांडी बाहेर आली. पुन्हा सगळ्यांचा गोंधळ उडाला. मला बाहेर काढून जखमेवर हळद लावण्यात आली. सुदैवाने रक्तस्राव लवकर थांबला. या अपघातामुळे सगळेच थोडे हिरमुसले होते. वडिलांनी सांगितले, “आज काम बंद करा, उद्या पुन्हा सुरू करू.” पण मी त्याही अवस्थेत म्हणालो, “काम थांबवायला नको, बोर्डच राहिलं आहे, आपण ते पूर्ण करू. होल पाडायचे झालं आहे, आपण त्यात सुरुंग भरून बार उडवून देऊ. आज आपल्या विहिरीला पाणी लागणारच, असा मला विश्वास आहे.” मी इतक्या आग्रहाने व ठामपणे सांगितल्यावरही वडील नकोच म्हणत होते, पण मी जिद्द सोडली नाही. मी म्हणालो, “आज बार उडविल्याशिवाय जायचं नाही. आजच पाणी लागणार व आजच आपण तेलरांधा करू.” तेलरांधा म्हणजे लागलेले पाणी कोऱ्या कपड्याने झाकायचे, त्याची पूजा करायची व तेलच्या गुळवणीचे जेवण करायचं. मी हट्टी स्वभावाचा होतो. एकदा ठरवले की माघार नाही, असा माझा खाक्या होता. माझा हट्ट पाहून माझ्या एका भावानेही मला साथ दिली. माझ्या अंगातील अर्धी फाटलेली बनियन फाडून डोक्याला जखमेवर बांधली व कामाला लागलो. मग आम्ही होल पूर्ण करून सुरुंग लावला आणि काय आश्चर्य, पाणीही लागले. पाणी फार थोडे होते, परंतु ते पाहून सगळ्यांनाच मोठा आनंद झाला. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूच आले. नंतर मग आम्ही सगळ्यांनी तेलरांधा केला व मी माझ्या आवडीच्या तेलच्या गुळवणीचा आस्वाद घेतला.
कोणत्याही कामासाठी मनुष्यबळ घरचे असेल, तर किती फायदा होतो, हे आम्ही सुरुवातीपासून पाहत आलेलो आहोत. आमच्याकडे गडीमाणसे कामाला होती. परंतु केवळ मालकपणा गाजविणे व गड्यांच्या भरवशावर काम सोडून आपण कमरेवर हात ठेवून पाहत बसायचे, हे आमच्या आजोबांनी, वडिलांनी कधी केले नाही. त्यांनी स्वतः सह आम्हा मुलांनाही अशा कामांची सवय लावली. कारण आम्ही ज्या आपुलकीने व जीव लावून काम करू, तितका परका माणूस करेलच असे नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही गोष्ट आयती मिळून उपयोग नाही; त्यासाठी स्वतः खस्ता खाल्ल्या, कष्ट घेतले, तर त्या गोष्टीचा आनंदही तितकाच मिळतो, असे संस्कार माझ्यावर झाले.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
