हायस्कूल, शारदेची प्रार्थना आणि सायकल
कडा गावात मारवाडी, ब्राह्मण समाज बऱ्यापैकी होता. आमच्या वर्गातील सधन मुले गावातच शाळा असताना सायकलवर दिमाखात यायची. आम्हाला खूप अप्रूप वाटायचे, असूयाही वाटायची…
आमच्या गावात इयत्ता सातवीपर्यंत शाळा होती. मी चौथीनंतर सातवीचीही बोर्डपरीक्षा चांगल्या मार्वांनी पास झालो. आता पुढे शिकायचे, तर गावात शाळेची सोय नव्हती. वडिलांनी तर आधीच सांगितलं होते, “तुम्हाला जास्तीतजास्त शिक्षण घ्यावंच लागेल.” त्या काळी आठवीनंतरची सर्वात जवळची शाळा कडा येथे होती. श्री अमोलक जैन विद्यालय असे त्या शाळेचे नाव. ही शाळा आजही आहे व तिचा पसाराही भरपूर वाढला आहे. कडा आमच्या गावापासून जवळपास सात आठ किलोमीटर लांब. दररोज पायपीट करीतच शाळेत जावे लागायचे. शाळेसाठी सकाळी घरातून आठ वाजता निघायला लागायचे. सकाळी दहा वाजता शाळा भरायची. संध्याकाळी चार साडेचारला शाळा सुटल्यावर परत पायपीट करीत सहाच्या सुमारास घरी यायचे. शेतात काम करायचे व रात्री चिमणीच्या उजेडात अभ्यासाला बसायचे.
आमच्या गावातील छोट्या शाळेतून मी आता कड्यामध्ये मोठ्या शाळेत आलो होतो. या शाळेत आठवीच्या आठ तुकड्या होत्या. त्यावेळी आठवीत गेल्यावर उच्च गणित हा एक विषय होता. त्याला पर्याय म्हणून नागरिकशास्त्र विषय होता. गणिताची सगळ्यांनाच नावड असल्याने उच्च गणिताकडे सगळेच पाठ फिरवायचे. मी मुळातच हुशार होतो. चौथी तसेच सातवीच्या बोर्डातही चांगल्या मार्फानी पास झालेलो होतो. त्यामुळे मला उच्च गणिताच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या एक नंबरच्या अ तुकडीत प्रवेश मिळाला. त्या तुकडीत सगळीच सधन कुटुंबातील मुले होती. कडा गावात मारवाडी, ब्राह्मण समाज बऱ्यापैकी होता. हा समाज चांगला श्रीमंतही होता. त्यामुळे साहजिकच या उच्चभ्रू वर्गातील मुले ‘अ’ तुकडीत असत. जवळपास ८० टक्के मुले या वर्गाची व बाकी २० टक्के आमच्या बहुजन वर्गातले. आमच्या वर्गातील कड्याची सघन मुले त्या काळात गावातच शाळा असताना दिमाखात सायकलवर यायची. आम्हाला खूप अप्रूप वाटायचे, असूयाही वाटायची. पण आमचा नाइलाज होता. त्या मुलांमध्ये व आमच्या खेड्यातील मुलांमधील फरक कपड्यांवरून राहणीमानावरून लगेच लक्षात यायचा. आमचे कपडे म्हणजे जाड्याभरड्या कापडाची हाफ पैंट व शर्ट. तर त्या मुलांचे कपडे टेरिकॉटचे, व्यवस्थित इस्त्री केलेले अगदी कडक. त्यांच्यासमोर आमचा गावंढळ युनिफॉर्म फिका पडायचा. आम्हाला जरा लाजच वाटायची. आपण खेड्यातले आहोत, असा न्यूनगंड असायचा. त्या मुलांशी मिळून मिसळून राहताना संकोच वाटायचा. आमच्या घरी इस्त्री नव्हती. त्यामुळे आईने कपडे धुऊन ठेवल्यानंतर मी तांब्यात चुलीतील कोळसे टाकून त्याने कपड्यांना इस्त्री करीत असे. जरा टापटीप रहायचा प्रयत्न करीत असे. असे असले, तरी माझी आमच्या वर्गातील अनेकांशी मैत्री जमली. त्या काळात कडा येथे माणकलाल भंडारी नावाचे मोठे व्यापारी होते. त्यांचा मुलगा अजित माझ्या वर्गात होता. त्याची व माझी चांगली गट्टी होती. याशिवाय पोखरणा, भंडारी,
मेहेर, जोशी, कुलकर्णी, कन्नौरकर, गोल्हार असे अनेक वर्गबंधू होते. मी हायस्कूलला असताना माझे थोरले बंधु भगवानराव हे दोन इयत्ता माझ्यापुढे होते. हायस्कूलला आम्हाला अनेक चांगले शिक्षक लागले, मला आधीच शिक्षणाची आवड असल्याने मला त्यांचे शिकविणे आवडायचेही. छाजेड सर आमच्या शाळेचे हेडमास्तर होते. दूसरे गोरे सर म्हणून होते, ते इंग्रजी शिकवायचे. माझे इंग्रजी सुरुवातीपासून कच्चे होते. त्यामुळे अनेकदा चुकल्यावर गोरे सरांच्या हातच्या छाती खाल्ल्या आहेत. एक उंचेपुरे असे बड़े सर महणून होते. ते इतिहास शिकवायचे, त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते इतिहास शिकवताना अभिनय करून शिकवायचे. अफजलखानाचा वध असे प्रसंग ते अशा आविर्भावात हातवारे करून शिकवायचे की, जणू काही आमच्या डोळ्यासमोरच तो प्रसंग घडत आहे. त्यांची शिकविण्याची ही पद्धत आम्हाला खूप आवडायची व त्यांचे शिकविणे लक्षात राहायचे. मराठी शिकवायला जोशी सर होते. जोशी सरांची एक आठवण आवर्जून सांगण्यासारखी आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
