हायस्कूल, शारदेची प्रार्थना आणि सायकल
सरस्वतीची प्रार्थना
मला सुरुवातीपासून शिक्षणात रस होता. घरी आजीने, आईने नेहमी धार्मिक संस्कार केलेले होते. कोणतेही कार्य हाती घेतले, तर त्या त्या कार्यानुसार देवाची प्रार्थना करायची मला सवय होती. मी जे शिक्षण घेत होतो, त्या शिक्षणाची, ज्ञानाची देवता म्हणजे सरस्वती. माझा मित्र रामेश्वर व मी नेहमी गप्पा मारायचो, त्यावेळी आम्ही विचार केला, आपल्याला जर ज्ञान मिळवायचं असेल, तर आपण सरस्वतीची प्रार्थना केली पाहिजे, त्याशिवाय आपल्यावर ती प्रसन्न कशी होणार? आम्ही ठरविले, सरस्वतीची प्रार्थना म्हणायची. पण ती प्रार्थना कोणती आहे, हेच आम्हाला माहिती नव्हते. बरे, ती मिळवायची कोणाकडून हाही प्रश्न आमच्यासमोर होता, शाळेत कोणाला विचारयचं धाडस होत नव्हते. उगीच सगळे आपल्याला हसतील, असा न्यूनगंडही होता, पण आमच्या मनातून काही केल्या ही गोष्ट जायला तयार नव्हती. त्यावेळी आम्हाला मराठी शिकविणारे जोशी सर कड्यातच राहत होते. आम्ही एके दिवशी धाडस करून थेट जोशी सरांचे घर गाठले. त्यांना आम्ही ‘सरस्वतीची (शारदेची) प्रार्थना लिहून द्या’ अशी विनंती केली. त्यांनी आमची इच्छा व तगमग पाहून शारदेची प्रार्थना लिहून दिली. प्रार्थनेचा तो लिखित कागद पाहिल्यावर आम्हाला साक्षात सरस्वतीनेच दर्शन दिले, असा आनंद झाला होता. मी ती प्रार्थना दोन-चार दिवसांतच पाठ केली. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी मी नियमितपणे ती प्रार्थना म्हणत असे,
नमस्ते शारदे देवि वीणापुस्तकधारिणि ।
विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ।।
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।।
या ब्रह्माच्युतशङ्ककरप्रमृतिभिर्देवैः सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।
या चला शारदेला वंदुया तिजला
अशी ही शारदेची प्रार्थना आजही मला मुखोद्गत आहे. कधीही मी ती म्हणतो व मला ते शाळेचे मंतरलेले दिवस आठवतात.
कुरकुरी सायकल
हायस्कूलमधल्या आमच्या पहिल्या सायकलीची कहाणीही जरा हटके आहे. मी नववीत असताना माझझे मोठे बंधू भगवानराव – ज्यांना आम्ही ‘बापू’ म्हणतो, ते अकरावीत म्हणजे मॅट्रिकला होते. तेव्हा वडिलांनी आम्हाला ये-जा करायला एक सायकल घेऊन दिली. सायकलवर शाळेत जायला मिळणार असल्याने मला खूप आनंद झाला. रोज दगडमाती तुडवत पायपीट करायचा कंटाळा यायचा. त्यामुळे सायकल मिळाल्यावर आम्हाला जाम भारी वाटायला लागले. आम्ही दोघे भाऊ मजेत सायकलवर बसून जायचो. मोठा भाऊ सिटावर व मी मागे कॅरियरवर बसायचो, सायकल चालविताना एकट्यालाच पायडल मारायचा ताण पडू नये, यासाठी मी मागे कॅरिबरवर बसून पायडलवर पाय ठेवायचो. दोघे एकाचवेळी पायडल मारायचो व भन्नाट सुटायचो. वापरून वापरून पायडल सारखे निसटून खाली पडायचे. रोजच त्याची दुरुस्ती करीत बसावे लागायचे. आजोबांनी हे पाहिले व त्यांच्यातील कुशल कारागीर जागा झाला. त्यांनी शक्कल लढवली व पायडलाच्या जागी एक लोखंडी रॉड लावून त्यावर रबराच्या पायडलसारख्याच लाकडाच्या दोन पट्टया बसवल्या. त्याला दोन्ही बाजूंनी होल मारून दुसरी बाजू वेल्डिंग करून फिट केली. पायडलची फ्री हालचाल व्हावी, म्हणून त्यामध्ये बैलगाडीचे वंगण घातले व आमची सायकल चालू झाली. परंतु या लाकडाच्या पायडलचा सारखा आवाज यायचा. पायडल मारायला सुरुवात केली की, तो आवाज सुरू व्हायचा. अशावेळी माझे वर्गमित्र मला चिडवायचे, “तुझी सायकल सारखी ‘येऊ का? येऊ का?’ अशी विचारते.” मित्रांच्या अशा चिडवण्याचे सुरुवातीला वाईट वाटायचे, पण नंतर नंतर मीही त्याचा आनंद घेऊ लागलो. आयुष्यात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून मानापमानही सहन करावे लागतात, प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नाही असा धडा मी या काळात गिरवला. सायकल अशी कुरकुरत आवाज करीत चालत असली, तरी त्यामुळे पायपीट संपली, याचा आनंद होता. दुसरी गोष्ट म्हणजे येणे-जाणे लवकर होऊ लागल्याते मला अभ्यासासाठी वेळही जादा मिळू लागला.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
