मी मॅट्रिक झालो

मी मॅट्रिक झालो

मंट्रिकचा निकाल घेऊन आल्यावर दादा म्हणाले, “अरे, तू फस्स क्लास पास झालास.” दादांनी मी पास झाल्याच्या खुशीत पेढे आणले होते. आईचा आनंद गगनात मावत नव्हता.

आमच्या काळात कॉलेजला आण्याआधी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असायचे. आताची दहावी म्हणजे त्या काळची जुनी अकरावी. त्यालाच मॅट्रिक म्हणायचे. मॅट्रिक झाला म्हणजे पांग फेडले, असे म्हणायची तेव्हा पद्धत होती. ग्रामीण भागात आधीच शिक्षणाचे दुर्भिक्ष्य. त्यात सातवी पास म्हणजे मोठी मजल मारली, असे म्हणायचे. अशावेळी मॅट्रिक फेलचा शिक्काही बराच मोठा मानला जायचा. मॅट्रिकबाबत आमच्या भागात कमालीची दहशत होती. मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थी अपवादानेही दिसायचा नाही. “शिक्षण किती झालं?” असे विचारलं, तर सरळ सांगितले जायचे, “मी नॉनमॅट्रिक आहे।” म्हणजे मॅट्रिक फेल, मॅट्रिकचा राज्याचा निकाल १५ ते १८ टक्के लागायचा, आमच्या आष्टी तालुक्याचा निकाल तर ५ ते ७ टक्केच असायचा. मॅट्रिक म्हणजे खूप अवघड अशाच मानसिकतेत मी मॅट्रिकला पोहोचलो. मला एक माहीत होते, माझी तयारी चांगली आहे, त्यामुळे आपण मॅट्रिक पास व्हायचेच. त्यावेळी माझे थोरले बंधू भगवानरावही माझ्याबरोबर मॅट्रिकचा त्यांचा राहिलेला एक विषय देणार होते. त्यामुळे परीक्षेला तीन-चार महिने बाकी असताना अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून आम्ही कड्यामध्येच पाच रुपये दरमहा भाड्याने एक खोली केली. खोलीत एक स्टोव्ह, तवा, पीठ, मीठ असे सामान आणून ठेवले होते. तीन चार दिवसांतून एकदा गावाकडून भाकरी यायच्या. भाऊ आणि मी त्या खोलीत राहून अभ्यास करायचो. दररोज सरस्वतीची प्रार्थना करून अभ्यासाला बसायचो. मॅट्रिकचा हिमालय पर्वत आपल्याला पार करायचाच, असा निर्धारच मी केला होता.

अभ्यासात माझे सर्वात आवडते विषय म्हणजे विज्ञान व गणित. आठवीपासूनच मी गणित घेतलेले होते. मी अभ्यास करताना काही आयडिया केल्या होत्या. अभ्यास करताना मी वेगळ्या प्रकारे नोट्स काढून ठेवत असे. जीवशास्त्राचा अभ्यास करताना मोठ्या कागदावर आकृत्या काढत असे. पचनसंस्था नेमकी कशी असते, हे लक्षात रहावे; म्हणून मोठ्या कागदावर चित्र काढत असे. आकृती, भूमिती, गणिताची समीकरणे याचाही असाच सराव करून त्ती खोलीतल्या भिंतीवर लावत असे. यातून तो अभ्यास कायम माझ्या नजरेसमोर राही व आपोआप पाठांतरही होत असे. असा सर्व अभ्यास करून मी मॅट्रिकचे मैदान मारण्यासाठी सज्ज झालो. आमचे परीक्षाकेंद्र कडा येथेच होते. परीक्षेच्या दिवशी मी लवकरच केंद्रावर जायचो. या दरम्यान एक गोष्ट घडायची. एव्हाना मी सगळ्या विषयांच्या महत्त्वाच्या नोट्स आमच्या खोलीतील भितीवर चिकटविलेल्या आहेत, हे सगळ्यांना माहिती झाले होते. मी परीक्षेसाठी लवकर गेलो की, मागून माझी मित्रमंडळी खोलीतील त्या नोट्स काढून कॉपीसाठी त्या घेऊन परीक्षेला यायचे. माझ्या त्या नोट्सचा वापर ते कॉपी करण्यासाठी करायचे. मी मात्र कधीही परीक्षेत कॉपी केली नाही. मला स्वतःबद्दल आत्मविश्वास होता. परीक्षेत कॉपी केली नसली, तरी मला पुढे आयुष्यात कॉफीची मात्र आवड लागली. कॉफी पिण्याची माझी सवय आजही कायम आहे.

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

 

error: Content is protected !!