मी मॅट्रिक झालो
इंदिरा गांधी आणि हेलिकॉप्टर दर्शन
या दुष्काळातच आमच्या भागात घडलेली एक घटना अजूनही आठवते. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या मराठवाडा भागात पाहणीदौऱ्यावर आल्या होत्या. आष्टी तालुक्यात आमच्या गावापासून जवळच असलेल्या शिंदेवाडी (शिदेवाडी) येथे त्यांची मोठी सभा आयोजित करण्यात आलेली होती. आता सभा म्हटल्यावर तिथे गर्दी करावीच लागणार होती. त्यामुळे आम्ही रोजगार हमीवर काम करीत असल्याने आम्हाला त्या सभेसाठी उपस्थित राहायला सांगण्यात आले. आम्हीही आनंदाने जायला तयार झालो. याशिवयाही आणखी एक आकर्षण होते, ते म्हणजे सभेला गेल्यावर तिथेही सुकडीची व्यवस्था करण्यात आलेली होती, असे आम्हाला कळले होते, दुसरे आकर्षण होते ते हेलिकॉप्टर पाहण्याचे. तोपर्यंत विमान काय आणि हेलिकॉप्टर काय फक्त चिशतच पाहिले होते. आता इंदिराजी हेलिकॉप्टरने येणार, म्हटल्यावर ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी होती. त्यामुळे आम्ही लवकरच सभास्थळी पोहचलो. मोठा आवाज करीत हेलिकॉप्टर आले, खाली उतरण्यापूर्वी त्याने सभास्थळावरून दोन घिरट्या घातल्या. आम्ही देहभान विसरून हेलिकॉप्टर पाहत होतो. त्याचा पंखा, मोठा आवाज! खूप मजा आली. सभा आटोपून परत जातानाही हेलिकॉप्टरने पुन्हा दोन घिरट्या मारल्या व नंतर ते आकाशात उंच उडाले. ते हेलिकॉप्टर दर्शन मला खूप आनंद देऊन गेले.
या सभेनंतर एक गोष्ट घडली. आजही अनेक जुनी माणसे ती आठवण सांगतात. ते म्हणजे आमच्याकडची दुष्काळ पाहणी उरकून पंतप्रधान इंदिरा गांधी दिल्लीला परतल्या आणि तिथे जाताच त्या आजारी पडल्या. गावागावात याची चर्चा सुरू झाली. यातून कोणी तरी म्हणायचे, “इंदिरा गांधींचं हेलिकॉप्टर परत जाताना पावडर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडाच्या वरून गेलं. त्यामुळे देवीचा कोप झाला अन् इंदिरा गांधी आजारी पडल्या.” ही चर्चा त्या काळात खूप गाजली होती. खरे काय, खोटे काय हे कळण्याचे तेव्हा आमचे वयही नव्हते. परंतु या गावगप्पा कुठून तरी स्वतः इंदिरा गांधींच्या कानी पोहचल्या असे म्हणतात. त्यानंतर काही काव्ळाने मोहटादेवी गडाचा जीर्णोद्धार करून बुंदीचा भंडारा घातला, असे सांगण्यात येते. दुष्काळाच्या अशा काही आठवणी कायमच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
