बँकेचे पत्र : नोकरी की जप्ती ?
बँकेत नंबर एकचा सी. आर.
नोकरीतही मी चांगला रुळलो होतो. प्रपंच मार्गी लागत होता. बँकेत मी अतिशय प्रामाणिकपणे काम करत होतो. नवनवीन गोष्टी शिकत होतो. मला पहिले मॅनेजर लाभले रामप्रकाश मेहता. शिस्तीसाठी त्यांची ख्याती होती. सगळा स्टाफ त्यांना चळाचळा कापायचा. कामचुकारपणा ते अजिबात खपवून घेत नसत. मला स्वतःलाच कामाची आवड होती. त्यामुळे मला त्यांचा जाच वाटण्याऐवजी स्वतःत सुधारणा करण्याची संधीच वाटली. त्यांच्या प्रभावामुळे माझ्या कामातही शिस्त आली. वेळेचे महत्त्व कळाले. जबाबदारीची जाणीव झाली. बँकेत आणखी एका ब्रँच मॅनेजरकडून मला खूप शिकायला मिळालं, ते श्री. प्रमोद तळवळकर, तळवळकर साहेबांची एक आठवण सांगण्यासारखी आहे. माझे काम, एकूण वागण्या-बोलण्याची पद्धत या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन त्यांनी माझ्या नोकरीच्या सी.आर. मध्ये मला तीन गटांत ‘एक्सलंट’ असा शेरा नोंदविला. सी. आर. मध्ये ‘Work, Conduct, Attitude’ या तीन गोष्टींचा विचार केला जातो. अर्थात हे मला नंतर माझी बदली झाल्यावर कळले, तेही दुसऱ्या ब्रचच्या मॅनेजरकडून. कारण सी. आर. मधील शेरा संबंधिताला सांगितला जात नाही, तळवळकर हे शाखाधिकारी त्यांच्या संवर्गातील सर्वात वरिष्ठ स्तरावरचे होते. त्यामुळे सीआरमध्ये बदल करायचा असेल, तर त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच तसे अधिकार होते. मला भविष्यात जे शाखाधिकारी लाभले, त्यांची रैंक तळवळकर साहेबांपेक्षा कमी होती. त्यामुळे इतरांना कोणालाच एक्सलंटचा शेरा काही केल्या कमी करता आला नाही. तसेही माझे काम मी त्याच निष्ठेने व प्रामाणिकपणे करीत होतो. त्यामुळे तो प्रश्न नव्हताच. तळवळकरसाहेब खूप हुशार होते. बँकिंगमधील अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांनी मला बँकिंगमधील अंतर्गत परीक्षांची माहिती दिली. त्या परीक्षा पास होऊन प्रमोशन मिळण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार मी सीएआयआयबीची परीक्षा दिली. ही परीक्षा कर्मचाऱ्यांसाठीच असायची. त्यात उत्तीर्ण झाल्यावर मला ऑफिसरपदी प्रमोशनही मिळाले. अशा रीतीने मी कॅशियर ते अधिकारी असा प्रवास केला. यात तळवळकरसाहेबांसारखे मार्गदर्शक मला मिळाले.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
