१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा
५) विचारपूर्वक काम करणे :-
शिवबाराजे यशस्वी लोकांना असणारी आणखी एक महत्त्वपूर्ण सवय म्हणजे असे लोक विचारपूर्वक काम करतात. यशस्वी होणारे लोक अगोदर विचार करतात आणि मगच ते काम हाती घेतात. यशस्वी होणारे लोक विचार न करता जोशात येऊन किंवा पोकळ उत्साह म्हणून कोणतेही काम हाती घेत नाहीत. समोर आलेल्या अवघड, अशक्य कामाचा ते सर्व बाजूंनी अगोदर विचार करतात.
अर्थात विचार करणे म्हणजे काय तर समोर आलेल्या अवघड कामाचे नियोजन planning यशस्वी होणारी माणसे करतात. काम तर अवघड आहे, अशक्य आहे म्हणून ते सोडून तर देत नाहीतच पण ते अवघड आहे म्हणून अपूर्णही ठेवत नाहीत. कारण ते काम सुरू करण्याआधीच ते त्या कामाचा सर्व बाजूंनी अभ्यास करून ते काम टप्प्याटप्प्याने कसे पूर्ण करता येईल याचा विचार करून तसे ते बारीक सूक्ष्म नियोजन करतात आणि मग ते काम व्यवस्थित टप्प्याटप्प्याने पार पाडतात.
लक्षात ठेवा अवघड कामाचाच विचार करावा लागतो आणि अवघड कामेच विचारपूर्वक करावी लागतात. दैनंदिन कामासाठी फार जास्त विचार करावा लागत नाही. कारण ती आपण रोज करत असतो आणि आता त्याची आपणाला सवय लागलेली असते. अशक्य काम आयुष्यात एकदाच समोर येते किंवा प्रत्येकवेळी आपले स्वरूप बदलून येते तेव्हा ते एकदा येवो किंवा प्रत्येकवेळी वेगवेगळेपणाने समोर येवो आपणाला ते काम पूर्णच करायचे तर आहे तर मग ते सुरू करण्यापूर्वी विचार केलेला बरा.
तेव्हा काम हाती घेऊन विचार करत बसू नका. विचार करून काम हाती घ्या आणि एकदा का ते हाती घेतलं की मग ते पूर्णच करा. विचारपूर्वक काम करण्याची सवय आपल्या मुलांना लावणे म्हणजेच त्यांच्या यशस्वी जीवनाचा पाया भरणे, पाया मजबूत करणे होय. तेव्हा कोणत्याही पालकांने आपल्या मुलांना ही सवय लावण्यासाठी कोणतेही कारण देऊन उशीर करता कामा नये. ही चांगली सवय आपल्या मुलांना आजच लावा आणि त्यांनीही शिवाजी महाराजांसारखे यशस्वी व्हावे यासाठी काम करा.
शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्या या शिकवणीप्रमाणे विचारपूर्वक कामे हाती घेतली आणि ती पार पाडली. या अवघड परंतु यशस्वी कामांमध्ये, जावळी छापा, सुरत छापा ते आग्रा सुटका ते पन्हाळ्यातून सुटका ते शाहिस्तेखान छापा ते अफजलखान वध असे कितीतरी प्रसंग आहेत जे प्रसंग अत्यंत अवघड आणि जीवाला धोकादायक होते. अशा प्रसंगातून शिवाजी महाराज विचारपूर्वक काम करण्याच्या सवयीमुळे सहिसलामत बाहेर पडू शकले.
तेव्हा आपणही आपल्या आयुष्यात कोणतेही काम विचारपूर्वकच करायचे. ज्या कामाचा विचार करता येत नाही किंवा जे काम करण्याचा विचार करायलाच वेळ मिळत नाही ते काम हाती घेऊनही तोंडघशी कशाला पडायचे ? तेव्हा आधी विचार करा आणि मगच काम हाती घ्या. म्हणजे एकतर अपयश पदरी येणार नाही आणि दुसरे म्हणजे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv
