१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा
६) रोज वेळापत्रकावर काम करणे :-
शिवबाराजे यशस्वी माणसांची आणखी एक चांगली सवय म्हणजे हे लोक वेळापत्रकानुसारच काम करतात. एखाद दिवशी नव्हे तर दररोज. दररोज वेळापत्रकानुसार काम करण्याची सवयच माणासाला यशस्वी करत असते. तेव्हा तुम्ही सुद्धा दररोज वेळापत्रकानुसार काम करायची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे. तर आता वेळापत्रकानुसार काम का करायचे आणि कसे करायचे ते सांगते नीट समजून घ्या. वेळापत्रकानुसार काम का करायचे तर एक राजा म्हणून तुमच्याकडे भरपूर कामे असणार आहेत. यात काही तुमची खासगी कामे तर काही रयतेची कामे तर काही स्वराज्याची कामे असे तीन गट पडतात. तेव्हा यातील सर्व कामे तर करायचीच पण यातील एकही काम मागे सुटणार नाही, खोळंबणार नाही, पेंडिंग राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठीच या कामाची यादी करावी लागेल. या कामाची वर्गवारी करावी लागेल आणि त्यांना महत्त्वाचे, तातडीचे असे अग्रक्रम देऊन एकामागोमाग एक अशी सर्व कामे त्यादिवशीची त्याचदिवशी संपवली गेली पाहिजेत. जर तुम्ही आजचे काम उद्यावर ढकलाल तर मग कामाचा डोंगर उभा राहिल यशाचा नाही.
म्हणूनच यशस्वी होणारे लोक वेळापत्रक बनवतात. कामाचे वर्गीकरण करून त्याची प्राथमिकता, महत्त्व ठरवितात आणि एका पाठोपाठ एक असे करत करत सर्वच्या सर्व कामे त्याचदिवशी संपवतात. यशस्वी होणारे लोक कधीही कोणतेही काम उद्यावर ढकलत नाहीत. जी कामे उद्यावर ढकलली जातात ती कदाचितच पूर्ण होतात. म्हणून शहाण्या माणसाने महत्त्वाचे काम कधीही उद्यावर ढकलायचे नाही. आणि यासाठीच आपल्या कामाच्या वेळा ठरवायच्या आणि कामाच्या वेळात कामाचीच कामे करायची. जो जेवढी जास्त कामे पूर्ण करतो तो तेवढाच जास्त यशस्वी होतो. हा एक साधा नियम आहे. म्हणून आपण महत्त्वाची आणि तातडीची अशीच जास्तीत जास्त कामे करायची आणि बाकीची दुय्यम कामे अधिकारी आणि सहकारी, कर्मचारी यांना वाटून देऊन जास्तीत जास्त यश मिळवायचे. रोज वेळापत्रकावर काम केले तर राजे व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि वेळापत्रकानुसार काम करण्याची सवय जर मोडली तर मग जास्त दिवस राजे राहता येणार नाही. तेव्हा राजे ही चांगली सवय लवकरात लवकर स्वतःला लावा आणि आयुष्यभर ही चांगली सवय कधीही सोडू नका. जे लोक वेळापत्रकावर काम करत नाहीत त्यांच्यावर चांगली वेळ येत नाही. आणि जे लोक वेळापत्रकानुसार काम करतात त्यांच्यावर वाईट वेळ कधी येत नाही. तेव्हा माणसाच्या आयुष्यात त्याच्यावर चांगली वेळ येणार की वाईट हे तो त्याच्या काम करण्याच्या सवयीवर अवलंबून असते. तेव्हा आपणावर चांगली वेळ यावी. आपणाला चांगले दिवस यावेत असे ज्याला ज्याला वाटते त्याने त्याने वेळापत्रकानुसार काम करणे ही चांगली सवय स्वतःला लवकरात लवकर लावून घेतली पाहिजे. यामुळे माणसाला वेळेवर उठणे, वेळेवर जेवणे, वेळेवर आराम करणे, वेळेवर झोपणे आणि वेळेवर काम करणे या सर्व गोष्टींचे वेळापत्रक ठरवून तसे काम करता येते. त्यामुळे चांगला आहार, चांगली झोप आणि चांगले काम हे सर्व शक्य होऊन चांगले आरोग्य देखील प्राप्त होते आणि त्यामुळे यश मिळून त्यातून समृद्धी मिळते. एवढे सगळे फायदे माणसाला केवळ वेळापत्रकावर काम करणे या सवयीमुळे मिळतात. तेव्हा ज्याला कोणाला आरोग्य, धन, संपत्ती, समृद्धी, यश हे सर्व मिळवायचे असेल त्या प्रत्येकाने वेळापत्रकानुसार काम करणे ही चांगली सवय स्वतःला लावली पाहिजे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
