२०. १००० पटीने विकास करा

२०. १००० पटीने विकास करा

५) तुमचे वाहन तुमची चालती फिरती शाळा बनवा.

शिवबाराजे तुम्हाला एक हजार पटीत जर प्रगती करायची असेल तर प्रत्येक क्षणाचा उपयोग नवनवीन माहिती ज्ञान अनुभव घेण्यासाठी करा. एका ठिकाणी बसले तरी हे ज्ञान जमा करत चला. आणि जर बाहेर प्रवास करायची वेळ आली तरी आपले ज्ञानार्जन चालूच ठेवा. जर आपणाला बराच काळ फिरायला लागणार असेल किंवा प्रवास जास्त होणार असेल तर मग आपले वाहन हीच आपली चालती फिरती शाळा बनवा. तुम्ही पालखीतून प्रवास करा की घोड्यावरून. सतत तुमचे डोळे भिरभिरते ठेवा. आजुबाजूला जे घडताना दिसतंय त्याच्याकडे कुतुहलाने बघा. जिज्ञासू वृत्तीने त्या हालचाली बदल टिपा आणि आपणास जे हवे ते स्पष्टीकरण लगेचच सोबतच्या लोकांकडून करून घ्या. प्रश्न असेल शंका असेल तर त्याचेही निरसन जागेवरच करून घ्या. याचप्रकारे आपण प्रवास करताना आपले कान देखील उघडे ठेवा. आजुबाजूला काय बोलले जाते यातून आपणाला शिकण्यासारखे काय मिळेल याची सतत तपासणी करत जिथे जिथे जे जे शिकायला मिळेल ते ते प्रवासात शिकून घ्या, आपला अनुभव समृद्ध करा.

जेवढं जास्त जी व्यक्ती फिरणारी, भ्रमंती करणारी तेवढीच ती यशस्वी देखील होणारी. म्हणूनच आम्ही तुम्हाला लहानपणी शिवनेरी ते सिंदखेडराजा, सिंदखेडराजा ते परत पुणे पुढे पुणे ते बेंगलोर आणि परत बेंगलोर ते पुणे असा बालपणातच बारा वर्षातच जवळपास २४०० किलोमीटरचा प्रवास घडवून तुमचा अनुभव विश्वाचा पाया पक्का केला आहे.

आता स्वराज्याचे कामकाज करताना ते पहाताना साहजिकच युद्ध, मोहिम, छापा ते रयतेचा कल्याणकारी कामांकरीता बराच प्रवास करावा लागेल तेव्हा मुलुख हिंडताना चौकस रहायचे, चौकशी करायचे आणि आपल्या प्रवासात काम करत करत बऱ्याच गोष्टी शिकायच्या. तुम्ही चार लोकांना भेटले काय आणि चार लोक तुम्हाला भेटले काय अर्थ एकच की तुमचे अनुभव विश्व आणखी समृद्ध होईल. कारण या भेटीगाठीत चांगले विचार आणि अनुभव यांची देवाणघेवाण होईल. तुमचे राज्याविषयक, शेतीविषयक, जगाविषयी आणि व्यवहाराविषयी ज्ञानात यामुळे भरच पडत राहील.

एक हजार पटीत प्रगती करण्यासाठी जेवढा प्रवास कराल तेवढाच तो प्रवास, अनुभव, ज्ञान, माहिती देणाराही घडेल याची काळजी घ्या. ज्ञानी, अनुभवी, हुशार, अभ्यासू अशी प्रवासात जेवढी म्हणून चांगली चांगली माणसे भेटतील या सर्वांशी संवाद साधा. त्याचेकडील ज्ञान, माहिती, अनुभव
आपल्या पाठिशी घ्या. अशा ज्ञानी अनुभवी हुशार माणसांच्या ज्ञानाची कदर करा, त्यांचा आदर करा आणि जमेल तेवढी त्यांना मदत करा. त्यांचा सत्कार करा. आपण आपली नम्रता सोडायची नाही. योग्य ठिकाणी हात जोडले की पाया पडायची वेळ येत नाही हे लक्षात ठेवा. तेव्हा आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजा आणि सतत नवनवीन ज्ञान ग्रहण करत चला. पटकन ज्ञानी होण्याचा उन्नत मार्ग म्हणजे ज्ञानी माणसांची संगत करणे होय. तेव्हा प्रवासात अशी माणसे सोबत घ्या आणि प्रवासात जी जी ज्ञानी माणसे भेटतील त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकून घ्या.

आज २१ व्या शतकात तर आपणासाठी हे काम खूपच सोपे झाले आहे. शिवाजी महाराजांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करायला जिजाऊ होत्या. आपणाला मार्गदर्शन हवे तेव्हा आणि हवे त्या विषयाचे करायला गुगल नावाचे बाबा आहेत. त्यांचे सोबती फेसबुक, युट्युब आणि जीमेल व्हॉट्सअॅप हे सर्व आहेत. या सर्वांचा उपयोग आपण प्रवास करताना गाडीत बसल्या बसल्या करून आपले ज्ञान वाढवू शकतो. गाडीत आपण हवे ते पुस्तक वाचू शकतो. हव्या त्या विषयाची सी.डी. ऐकू शकतो. व्हीडीओ पाहू शकतो. तेव्हा जर तुम्हाला एक हजार पटीत प्रगती करायची असेल तर तुम्हाला तुमचे प्रवासाचे वाहन गाडी, विमान, जहाज जे असेल तेच एक फिरती शाळा बनवायला पाहिजे.

थोडक्यात काय तर आपल्या आयुष्याचा एकही क्षण वाया घालवायचा नाही. घरी असले तरी कार्यालयात असले तरी आणि प्रवासात असले तरी आपण आपले ज्ञानार्जन आपल्या विषयाचे ज्ञान, आपल्या कामासंदर्भातील माहिती ही सतत अद्ययावत करत गेले पाहिजे. तेव्हा पुस्तके वाचा, सी.डी. ऐका, व्हिडीओ पहा. या संदर्भातील सेमीनार अटेंड करा. वर्कशॉपला जा आणि आपले ज्ञान अद्ययावत करून इतरांपेक्षा हजार पावले पुढे चला. जो जेवढा जास्त शिकेल तो तेवढाच जास्त लवकर जिंकेल आणि जर त्याने ते ज्ञान घेणे तसेच चालू ठेवले तर मग तो तसाच अजिंक्य देखील राहील. तेव्हा शिका, रोज शिका आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आवडीने आनंदाने शिका.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

 

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!