माझी भाग्यलक्ष्मी : सौ. सुनंदा

माझी भाग्यलक्ष्मी : सौ. सुनंदा

‘शोले’ सारखी भट्टी जमली पाहिजे

मी औरंगाबादमध्ये कॉलेजला शिकत होतो व माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी थिएटरमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहिला. १९७२ ला रॉक्सी सिनेमागृहात मी पहिल्यांदा गेलो. धर्मेद्रचा सिनेमा होता, ‘दोस्त’ यानंतर अनेकदा मी सिनेमा पाहायला जायचो. तेव्हा गुलजार, मोहन, रॉक्सी, सादिया तसेच अंबा-अप्सरा ही विएटर्स प्रसिद्ध होती. सिनेमाची आवड मला औरंगाबाद शहरातच लागली. १९७५ ला आलेला ‘शोले’ मी औरंगाबादमध्ये पाहिला. त्या वेळी भविष्यात इतिहास घडविणारा ‘शोले’ व मनोजकुमार यांचा ‘संन्यासी’ हे दोन चित्रपट एकाच शुक्रवारी प्रदर्शित झाले होते. शोले तर एकाच वेळी तीन थिएटरला लावण्यात आला होता. पण सुरुवातीचे एक-दोन आठवडे शोलेपेक्षा संन्यासीची चर्चा होती. मात्र काही दिवसांनी शोलेचा बोलबाला झाला. औरंगाबादमधील शगहांज भागातील ‘स्टेट’ सिनेमागृहात शोले तब्बल १४४ आठवडे चालू होता. मी स्वतःही शोले एकदा दोनदा नाही तर अकरा वेळा पाहिला. इतका मला तो चित्रपट भावला होता. आजही कधी कधी टीव्हीवर शोले लागला, तर मी आवर्जून पाहतो. शोलेचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. मी माझ्या भाषणात नेहमी सांगतो, “तुमच्या जीवनाचा शोले बनवा.” आता ‘शोले बनवा’ असे सांगण्यामागेही माझे एक लॉजिक आहे. जी. पी. सिप्पी यांनी शोले बनविला, त्यासाठी त्यांना खर्च आला सुमारे पंचवीस लाख रुपये. पुढे सिप्पींनीच ‘शान’ हा अमिताभ-शशी कपूर एकत्र असलेला चित्रपटही बनविला. त्यासाठी खर्च आला सहा कोटी. आता खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता ठरला, तर तो म्हणजे शोले. शानही चालला, हिट झाला, पण शोले तो शोलेच राहिला. त्याची सर आणि कमाई काही शानला मिळाली नाही. याचा अर्थ काय, तर शोलेसारखा एखादाच चित्रपट इतका सुपर डुपर हिट होऊ शकतो. याला कारण त्या चित्रपटात जमलेली भट्टी. अभिनय, कथा, दिग्दर्शन, गीत, संगीत, संवाद अशी सगळीच भट्टी शोलेत जमली होती. लहानात लहान व्यक्तिरेखेचे संवाद पाठ असलेली पिढी आजही आहे. आजच्या नव्या पिढीनेही किमान एकदा तरी शोले पाहिलेलाच असतो. जीवनात यश मिळवायचे, तर शोलेसारखी भट्टी जमली पाहिजे, असे मला नेहमी वाटते. “हिट होता येतं, पण सुपर डुपर हिट व्हायचे असेल, तर जीवनाचा शोले बनवा!” असे मी नेहमी सांगत असतो.

औरंगाबादमध्ये मला चंद्रकांत शहा नावाचे एक चांगले मित्रही भेटले. ते माझ्याबरोबरच बँकेत होते. व्यापारी कुटुंबातील असून ते नोकरी करीत होते. त्यांचे गुलमंडीतच वीस खोल्या असलेले मोठे घर होते. त्या काळात औरंगाबादमध्ये मला वैचारिक खाद्यही भरपूर मिळाले. श्री. गोविंदभाई श्रॉफ, कमलकिशोर कदम, सेठ नंदलाल धूत, भुजंगराव कुलकर्णी यांचे विचार ऐकायला मिळाले. मराठवाडा, अजंठा ही दैनिके तेव्हा प्रसिद्ध होती. ‘मराठवाडा’चे संपादक असलेले अनंत भालेराव हे मराठवाड्यातील एक बडे प्रस्थ होते. भालेराव यांच्याप्रती विशेष आपुलकी वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचा मुलगा अशोक हा आमच्याच बँकेत नोकरीस होता.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!