चौफेर घोडदौड

चौफेर घोडदौड

‘एक ही सादे सब सादे’ हे हिंदीतील वाक्य मी कधी, कुठे ऐकले, ते आता माझ्या लक्षात नाही. पण मला ते खूप आवडले. या वाक्याचा अर्थबोध ज्याला होईल, तो अटकेपार झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही.

माला दमदार भाषण करता येऊ लागले आणि माझा बिझनेस जोरात वाढू लागला. मी चौथ्या पदावर पोहचलो होतो. व्यवसायाचे कार्यक्षेत्र वाढत होते. वरिष्ठांकडून सांगितले जायचे, “तुमच्या टीमचं कार्यक्षेत्र औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर वाढवा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण एकदा गुणाकार सुरू झाल्यावर लाभच लाभ।” असे कोणी बोलले म्हणजे मला स्फुरण चढायचे. आधीच मी यशस्वितेसाठी पछाडलेला होतो. त्यात असा आव्हानवजा सल्ला मिळाला की, माझी गाडी सुसाट सुटायची. दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यामागे आणखी एक कारण होतं. एका एका जिल्ह्यात बीज लावले, म्हणजे एक एजंट तयार केला तर त्याचे काम सुरू होईल. बीजाचे वटवृक्षात रूपांतर होईल. दुसरे म्हणजे एक प्रकारची निकोप स्पर्धा तयार होईल, कोण जास्त काम करतं याची. सगळेच काही एकमेकांच्या जिल्ह्यात जाणार नाहीत. पण आम्हाला भाषणे करायची असल्याने आम्ही इकडच्या जिल्ह्यातील यशस्वितेच्या बाता तिकडे सांगू आणि तिकडच्या बाता इकडे सांगू. जरा चढवून सांगितल्यावर त्यांच्यातही ईर्षा जागृत व्हायची आणि आमचेही काम व्हायचे. अर्थात त्या काळी टेलिफोनचे प्रस्थ नव्हते. त्यामुळे आम्ही भाषणात मारलेल्या बढायांचे क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायची शक्यताही कमीच होती. तंत्रज्ञान नसल्याचेही कधी कधी असे फायदे होतात.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!