चौफेर घोडदौड

चौफेर घोडदौड

रक्तदान की रक्तविक्री?

मी बँकेतील नोकरी करून माझा साईड विझनेस करीत होतो. प्रचंड धावपळ असायची. सुटीचा दिवस तर माझ्यासाठी पर्वणीच असायचा. एकदा आमच्या बँकेत कोणत्या तरी कारणाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मी त्या वेळी पहिल्यांदा रक्तदान केले. मनात एक प्रकारची उदात्त भावना होती. आपण एक मोठे दान केल्याची. पण माझ्यासाठी रक्तदानाचे आणखी एक निमित्त होते. त्या काळी आमच्या बंकितल्या एखाद्याने रक्तदान केले, तर त्याला एक दिवसाची किरकोळ रजा मिळायची. मला तर बिझनेसासाठी दिवसाचे चोवीस तास पुरत नव्हते. अशावेळी रक्तदान केल्यावर मिळणारी एक दिवसाची पगारी रजा माझ्यासाठी मोठे बक्षीस होते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी रक्तदान करायचो व सुटी लाटायचो. या सुटीचा उपयोग मी माझ्या बिझनेससाठी करायचो. माझ्या रक्तदानाची ख्याती चांगलीच पसरली होती. त्या काळात रक्तदान आजच्या इतके सर्वमान्य झालेले नव्हते. त्यातही ग्रामीण भागात तर अजिबातच जागृती नव्हती. एके दिवशी माझी आई औरंगाबादला आली. तिच्या येण्याचे कारण म्हणजे तिला कोणी तरी सांगितले होते की, ‘तुमचा मुलगा पैसे मिळविण्यासाठी स्वतःचं रक्त विकत आहे.’ झालं आई माझ्याकडे आली व मला पाहताच धाय मोकलून रडू लागली. तिने तिच्या गळ्यातील सोन्याच्या पुतळ्या काढून माझ्या हातात दिल्या. मला म्हणाली, “पुतळ्या विकून तुला पैसे घे, पण रक्त विकू नकोस. रक्त काढून काढून तू वंगाळ होशील, तसलं काही करू नकोस!” आईची हो माझ्यावरची वेडी माया पाहून मी थक्क झालो. आता तिची समजूत कशी काढायची, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. रक्त दिल्याने ते कमी होत नाही, उलट ९० दिवसांत नवीन फ्रेश रक्त तयार होते हे तिला कसे समजावून सांगायचे? ती आपली एकच सांगत होती, “रक्त विकू नकोस, शरीराचे हाल करून घेऊ नकोस.” मी कशीबशी तिची समजूत काढली. ‘रक्त विकत नाही, तर दान करतो’ हे सांगितले. असा हा रक्तदानाचा किस्सा. वैद्यकीय दृष्ट्या रक्तदानाचे महत्त्व विचाऱ्या आईला माहीत नव्हते. कोणी तरी तिला भरवले व ती पोटतिडिकीने माझ्याकडे धावत आली. आईचे प्रेम किती हळवे असते, याची प्रचिती मला पुन्हा एकदा या प्रसंगातून आली. रक्तदानाचे वैद्यकीय महत्त्वही तितकेच कळाले. माझ्या दृष्टीने सगळ्या दानांमध्ये रक्तदान व ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ आहेत. ही दोन्ही दाने दिल्याने ते कमी होत नाही, तर ते वाढतच जाते. म्हणून तुमच्याजवळ असलेले रक्त व ज्ञान सढळ हाताने दान करायला प्रत्येकाने शिकले पाहिजे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!