‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…
कंपनी चालविताना मला चौफेर वाचनाचा चांगला फायदा झाला. एखादी गोष्ट आवडली, तर डायरीत नोंद करून ठेवायची सवय असल्याने मी वेळोवेळी मिळालेल्या या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करू शकलो. बाईट अनुभवानंतर एकटधाने सुरू केलेली ‘लाईफ लाईन लाईफ केअर कंपनी’ मी नवी टीम तयार करून प्रचंड वेगाने पुढे आणली. महाराष्ट्रासह गुजरात, आंधप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश अशा पाच राज्यांत कंपनीचे कार्य पोहचले. लाईफ लाईनचे उद्दिष्ट ठेवले होते विमा विकणे आणि रोजगारनिर्मिती. विमा विकणे हा सर्वात कठीण व्यवसाय भी मुद्दामहून निवडला होता; कारण यातून आकस्मिकरीत्या अडचणीत आलेल्या कुटुंबांना आधार मिळणार होता, जगण्याचे नवे बळ मिळणार होते. बेकारीनिर्मूलन आणि केंद्र सरकारच्या विमायोजनेचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविणे असे मिशन व व्हिजन घेऊन काम करताना अनेक अनुभव आले. यासाठी मला प्रचंड भटकंती करावी लागली. व्यवसायाला सुरुवात केल्यापासून १९९७ ते २०१४ या काळात मी कारने जवळपास दहा लाख किलोमीटरचा प्रवास केला. पाच राज्यांत आमची सतरा कार्यालये होती. या व्यवसायानिमित्त मी महाराष्ट्रातील जवळपास अडीचशे तालुके पालथे घातले. आजही मला अनेक गावांचे, शहरांचे रस्ते तोंडपाठ आहेत. माझी स्वतःची कंपनी सुरू केल्यावर मी नगरच्या मुख्य शाखेसाठी स्वतःची जागा खरेदी केली, कारण लोकांचा कंपनीवर विश्वास बसणे महत्त्वाचे होते. यासाठी मी काही प्लॉट विकले, पत्नीचे दागिने गहाण ठेवले. कंपनी चालविताना मला माझ्या चौफेर वाचनाचा चांगला फायदा झाला. एखादी चांगली गोष्ट आवडली तर त्याची डायरीत नोंद करून ठेवायची सवय मला सुरुवातीपासूनच असल्याने मी वेळोवेळी मिळालेल्या या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करू शकलो.
जैसी अमृताचि चवी निवडिजे। तरी अमृताचिसारिखी म्हणिजे। तैसे ज्ञान हे उपमिजे। ज्ञानेसिचि ।।
हे ज्ञानेश्वरीतील ज्ञानमाहात्म्य मला नित्य स्मरत असे. त्यामुळेच माझी ज्ञानाची लालसा वृद्धिंगत होत गेली. मी ते मिळवीत गेलो आणि योग्य ठिकाणी त्याचा वापर करण्यासही शिकलो. कारच्या प्रवासात मी वाचन करत होतो, त्यामुळे माझ्या डोळ्यावर जास्त ताण यायचा व मला चष्मा लागला. मी सतत पंधरा वर्षे प्रत्येक रविवारी रात्री नऊ वाजता नगरपासून तीनशे ते पाचशे कि.मी. दूर अंतरावरून नगरकडे परतीचा प्रवास करायचो. मला घरी यायला कधी कधी पहाटे पाच किंवा सकाळचे सातही वाजायचे. माझ्याबरोबर ड्रायव्हर एकटाच असल्याने त्याच्यावर ताण नको म्हणून मीसुद्धा काही वेळ ड्रायव्हिंग करायचो. खरे तर माझी चांगल्या हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय असायची; पण दुसरा दिवस वाया जाऊ नये, म्हणून रात्रीच परतीचा प्रवास करायचो व सकाळी वेळेत ऑफीसमध्ये हजर व्हायचो.
आमच्या धंद्यात विम्यासाठी ग्राहक मिळविण्यावरोबरच एजेंटची मोठी फळी निर्माण करणे महत्वाचे होते. बासाठी सुरुवातीला मी गावागावात जाऊन मीटिंग घ्यायचो एखादा प्रमुमा हेरून त्याच्यामार्फत गावच्या वेशीजवळील मारुतीच्या पारावरच मीटिंग व्हायची तिथे माझे भाषण व्हायचे. मी कधीही माझ्या भाषणात विमाविकीचा विषय काढायचो नाही. मी त्यांच्यापैकीच एक असल्याप्रमाणे गप्पा मारायचो. व्यक्तिमत्वविकास, जीवनात यश कसे मिळवायचे अशा गोष्टी मी बोलायचो, माझा उद्देश काही तरी विकणे नसून मी तुमच्या मुलांना चांगली नोकरी, व्यवसाय देण्यासाठी आल्याचे सांगायचो. कारण मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती असते कोणी तरी मागणारा आला, तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. पण कोणी आपल्या पोराबाळांना नोकरीला लावतो म्हटले की, त्यांचा दृष्टिकोनही सकारात्मक होतो. हा अनुभव असल्याने मीसुद्धा माझ्या भाषणात बेट विम्याची स्कीम वगैरे सांगण्याच्या भानगडीत पडत नसे ती गोष्ट टाळून मी गावातील नोकरीइच्छुक तरुणांचे फॉर्म भरून घेत असे त्यांना नंतर मीटिंगला बोलावत असे. तिथे त्यांना विम्याची स्कीम समजावून सांगत असे. यशस्वी विमा एजंटांचा त्यांच्यासमोर सत्कार करत असे. या गोष्टींनी नवनवीन मुले या व्यवसायाकडे आकर्षित व्हायची. लाईफ लाईनच्या नगर, औरंगाबाद, नागपूर, अकोला, नांदेड, जळगाव, सोलापूर, पुणे, लातूर, नंदूरबार, नाशिक अशा अनेक शाखांचा कारभार मी पाहायचो. राज्याबाहेर पहिली शाखा आम्ही आंध्रप्रदेशातील आम्ही आंध्रप्रदेशातील निजामाबाद येथे सुरू केली. पुढे गुजरातमध्ये सुरतेवरही लाईफ लाईनने स्वारी केली, म्हणजे तिथे आपली शाखा स्थापन केली. पुढे कर्नाटकातही बिदरला शाखा उघडली.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
