यशस्वितेचे वाटेकरी, स्वप्नपूर्तीचे समाधान!

यशस्वितेचे वाटेकरी, स्वप्नपूर्तीचे समाधान!

लाईफ लाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

लाईफ लाईन कंपनीनंतर मी आणखी दोन सेवा उद्योग सुरू केले. माझे मोठे चिरंजीव संदीप धुमाळ हे डॉक्टर झाले होते. त्यामुळे आम्ही अनंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अहमदनगरला तारकपूर परिसरात ‘लाईफ लाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल’ची स्थापना केली. २०१२-१३ मध्ये सर्व सुविधांनी सुसज्ज अशा या हॉस्पिटलच्या उ‌द्घाटनप्रसंगी तत्कालीन व विद्यमान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, आसाराम महाराज केळसांगवीकर, आ. सुरेशअण्णा धस, माजी नगराध्यक्ष स्व. शंकरराव घुले आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविकात मी हॉस्पिटल उभारणीचा उद्देश विशद केला. मी सांगितले, “हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण चेहऱ्यावर वेदना घेऊन येतो, त्याच्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर चिंता असते. अशा परिस्थितीत आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक घरी परतताना चिंतामुक्त, हसतमुख चेहऱ्याने परतावेत, अशीच वैद्यकीय सेवा या ठिकाणी मिळेल.” या कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी आपल्या मनोगतात ‘लाईफ लाईन’ला शुभेच्छा देताना मला राजकारणात येण्याची ऑफर दिली. “धुमाळसाहेबांचे वक्तृत्त्व अतिशय प्रभावी असून लाखोंची सभा जिंकण्याची हातोटी त्यांच्यात आहे. त्यांची जागा खरं तर आमच्या क्षेत्रात आहे. त्यांना चांगलं भविष्य असेल.” असे पाचपुते म्हणाले.

त्यावर आमचे आष्टीचे आ. सुरेशअण्णा धस यांनीही कोटी केली. ते म्हणाले, “धुमाळसाहेबांना राजकारणात यायचे असेल, तर जरूर यावे. पण त्यांना आमदार वगैरे व्हायचे असेल, तर ते काम नगरमध्ये करावे. आमच्या आष्टीत ते आले, तर आमची अडचण होईल.” दिग्गज नेत्यांच्या या भाषणांमुळे मला आनंद झाला असला, तरी आभार मानताना मी राजकारणात येण्याची ही ऑफर नम्रपणे नाकारली. मी स्वतः तसेच माझ्या कुटुंबातील कोणीही राजकारणात येणार नाही, तो आमचा प्रांतही नाही आणि पिंडही नाही, हे मी विनम्रपणे सांगितले. तर अशा पद्धतीने आमच्या लाईफलाईन हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजपर्यंत हजारो रुग्ण येवून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. चिरंजीव डॉ. संदीप धुमाळ व आमच्या स्नुषा डॉ. सुजाता धुमाळ हॉस्पिटलमध्ये समर्पित भावनेने रुग्णसेवा देत आहेत.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!