सासरे नव्हे, वडीलच!
धुमाळ परिवारात कुटुंबप्रमुख म्हणून मला पप्पांबाबत जितका आदर आहे, त्यापेक्षाही एक व्यक्ती म्हणून मला ते जास्त आदरणीय वाटतात. कुटुंबातील प्रत्येकाकडे त्यांचे बारीक लक्ष असते.
लग्न करताना कोणत्याही मुलीला चांगला पती मिळावा, असे वाटतेच; पण त्याचचरोबर आपल्या सासरच्या मंडळीचा स्वभाव कसा आहे, तिथे आपल्याला चांगल्या रीतीने सामावून घेतले जाईल ना, असे अनेक प्रश्न मनात असतात. या सर्व बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण मला चांगल्या पतीबरोबरच अतिशय समजूतदार आणि अगदी वडिलांप्रमाणेच माया लावणारे सासरे (एन. बी. धुमाळ) लाभले. माझा विवाह डॉ. संदीप धुमाळ यांच्याशी झाला व मी या परिवाराची सून नव्हे तर मुलगी म्हणून घरात आले. आमचे माहेरचे कुटुंब मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील चांभुडीं येथील. माझे वडील सुदामराव वाळके हे पोलीसखात्यात अधिकारी असल्याने आमचे बालपण, शिक्षण वगैरे सर्व काही नाशिकलाच झाले. माझे बी. ए. एम. एस. चे शिक्षण भुसावळ येथे झाले. घरात लग्नाची बोलणी सुरू झाल्यावर एके दिवशी पप्पा (माझे सासरे) व काही मंडळी मला पाहायला आले. त्यावेळी सहज गप्पा मारताना पप्पांचे विचार ऐकले व मी खूपच प्रभावित झाले. मला लहानपणापासून माझ्या वडिलांशी खूप मोकळा संवाद साधायची सवय होती. तसाच मोकळा संवाद आपण पप्पांशीही साधू शकतो, याची मला जाणीव झाली. त्यांचे विचार खूप उच्च आहेत. जीवनाकडे पाहण्याचा, जीवनातील सुखदुःख पचविण्याचा उदार दृष्टिकोन आणि पुढे मार्गक्रमण करीत राहण्याची सकारात्मकता त्यांच्यात आहे. जिद्दीने काम करणारा कोणी असेल, तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांचं कायम सांगणे असते. त्यांचे हे प्रांजळ बोलणे मला खूप भावले व मी लग्नाला होकार दिला. मी धुमाळ परिवाराची सदस्य बनले.
या परिवारात आल्यावर पप्पांना आणखी जवळून ओळखता आले. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्याबद्दल जितका आदर आहे, त्यापेक्षाही एक व्यक्ती म्हणून मला ते जास्त आदरणीय वाटतात. कुटुंबातील प्रत्येकाकडे त्यांचे बारीक लक्ष असते. कोणी चुकले, तर समजावून सांगतात. रागावण्यापेक्षाही आपुलकीने समजावून सांगण्यावर त्यांचा अधिक भर असतो. निर्णय घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य देतात, फक्त एकदा निर्णय घेतल्यावर तो सार्थ ठरवून दाखवा, असे ते सांगतात. त्यांच्याकडे असलेली अनुभवाची शिदोरी आम्हाला कायम योग्य निर्णय घेण्यास बळ देते. घरातील कामे करून महिलांनी घराबाहेरही पडले पाहिजे, व्यवसाय, नोकरी केली पाहिजे, असे ते नेहमी सांगतात, त्यासाठी प्रोत्साहनही देतात. वयाने ते ज्येष्ठ असले, तरी मी कधी काही प्रश्न विचारला, काही गोष्टी सांगितल्या, तर ते अतिशय शांतपणे ऐकून घेतात. पटले, तर लगेच ‘हो’ म्हणतात. त्यांचे एक वैशिष्ट्य मला आवर्जून सांगायला पाहिजे, ते शक्यतो समोरच्याचे मन कधीच दुखावत नाहीत. एखादी गोष्ट त्यांना पटली नाही, तरी ते खूप अट्टहास करीत नाहीत. व्यक्ती तितक्या प्रकृती, या उक्तीप्रमाणे घरातील प्रत्येकालाच विचारांचे स्वातंत्र्य असते. ते आपले विचार कधीच लादत नाहीत किंवा जास्त वादही घालत नाहीत. सल्ला देतात, पुढे तो मानायचा की नाही, हे ते समोरच्यावर सोपवितात. पण ते एखाद्या गोष्टीबाबत आपले मत अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात. विविध कंगोरे उदाहरणांसह मांडतात. कदाचित याच त्यांच्या गुणांमुळे त्यांचे बहुतेक
निर्णय अचूक उरतात. एखाद्याने ऐकलेच नाही, तरी ते खूप मनाला लावून घेत नाहीत, सहजपणे आहे. ती गोष्ट स्वीकारतात व दुसऱ्या विषयाकडे वळतात. त्यांनी जे व्यावसायिक यश मिळविले, अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले, त्यामागे त्यांचा हा मनमिळाऊ स्वभाव आहे, असे मला नेहमी वाटते.
अनेकदा मला काही गोष्टींसाठी कोणाशी तर बोलावेसे वाटते. अशावेळी मला पटकन पप्पान आठवतात. एखादी मुलगी ज्या सहजतेने आपल्या वडिलांशी बोलेल, तितक्याच सहजतेने मी पप्पांशी बोलते. घरात त्यांचा मोठा आधार वाटतो. कोणत्याही विवाहितेसाठी सासन्यांपेक्षा दुसरा भरभक्कम आधार असूच शकत नाही. ते नेहमी एक गोष्ट सांगतात, “मिळतं घेणं ज्याचा स्वभाव नाही, चारचौघात त्याचा निभाव नाही.” त्यांचे वागणे-बोलणं हे समोरच्यावर अवलंबून असते. समोरचा जसा असेल, तसेच ते वागतात.
त्यांची दिनचर्या आजही तितकीच व्यग्र असते. सकाळी लवकर उठणे, फिरायला जाणे, घरी आल्यावर बोडावेळ बागकाम करणे, स्वतःची गाडी नियमितपणे धुणे असे वेळापत्रक त्यांनी कायम पाळले आहे. घरी आल्यावरही सगळ्यांशी संवाद साधून काय हवे नको ते पाहणार. अर्जुन व आराध्या या नातवांशी खेळताना ते अक्षरशः लहान मूल होतात, नातवे म्हणजे दुधावरची साय असते, असे ते नेहमी सांगतात. देवावरती त्यांची खूप श्रद्धा आहे. दररोज पूजा केल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यांच्यामुळे आमच्यावर तसेच नातवांवरही आपोआप चांगले संस्कार होत असतात.
पप्पा घरात आल्यावर एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. विविध विषयांवर ते खूप बोलत असतात. काही प्रसंग, घटना सांगून त्यावर मार्मिक भाष्य करतात. त्यातून काय शिकायला पाहिजे, काय शिकायला मिळाले, हे समजावून सांगतात. त्यांनी आपल्या विमाव्यवसायावेळी हजारोंच्या जनसमुदायावर भाषणे केलेली आहेत. त्यांच्या भाषणांतून अनेकांना मोठी प्रेरणा मिळत असते. नकारात्मकता ते आपल्या बाजूबाजूला अजिबात फिरकू देत नाहीत. समोरच्याला नेहमीच सकारात्मक प्रेरणा ते देतात. त्यांच्या चेहऱ्यावरही नेहमीच एक प्रकारचे सात्विक समाधानाचे भाव असतात. मनातील दुःख, वेदना ते कधी ओठावर येऊ देत नाहीत, असेही मला वाटते. “आयुष्यात कधीही कोणासमोर स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्याला तुम्ही आवडता, त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची गरज नसते व ज्यांना तुम्ही आवडतच नाही, ते तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत.”
कार्यमग्न राहणे म्हणजे काय, हे त्यांच्याकडून शिकावे. वेळेच्या व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे. घरी निवांत असल्यावर ते कायम आपले आजीआजोबा, आईवडील, सासरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. शंभूमहादेवावर नितांत श्रद्धा असल्याने ‘त्याच्या कृपेनेच मला यश मिळालं, असे आवर्जून सांगतात. घरातील प्रत्येकाला ते सांभाळून घेतात. आईवडिलांची ते कायम आठवण काढतात. स्वभावाने खूपच हळवे असल्याने अनेकदा आईवडिलांची आठवण निघाली की गहिवरतात. अशावेळी माझ्याही डोळ्यात नकळत पाणी येते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम सार्थकतेचे भाव असतात. आयुष्यात चांगली माणसे आपण कमावली व त्यांच्यामुळे आपण आज समाधानी आहोत, असे ते सांगत असतात.
माझे व त्यांचे ट्युनिंग सुरुवातीपासून जुळलेले आहे. मला कधीही आपण या परिवारात नवीन आहोत, असे वाटलेच नाही. ‘संसार म्हणजे फक्त नवरा बायको व मुले असे नसते. तर त्यात सासू-सासरे, दीर, भावजय, नणंद असा मोठा परिवार असतो. प्रत्येक नाते जिवापाड जपले पाहिजे. इतरांसाठी जितके चांगले करता येईल, तितके केले पाहिजे.’ ही मोठी शिकवण मला त्यांच्याकडून नेहमीच मिळत असते. कदाचित त्यामुळेच पप्पांना मी कायम वडिलांच्या स्थानी पाहते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
