आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग
छत्रपती शिवाजीमहाराज
माझे सर्वार्थाने आवडते म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज. अवघ्या जगाचे आराध्य दैवत. त्यांच्याच पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो, यासारखे दुसरे अहोभाग्य नाही. छत्रपती शिवाजीमहाराज यांनी अतिशय कमी वयात एक स्वप्न पाहिले स्वराज्याचे. आताची पिढी ज्या वयात खोट्या ग्लॅमरकडे आकर्षित होते, त्या वयात महाराजांनी स्वप्न पाहिले.. काय होते ते स्वप्न… स्वराज्य होय स्वराज्य पण ते कोणासाठी होते? स्वतःसाठी होते? अजिबात नाही. ते तर स्वतः राजकुलातील होते. सर्व सुखे त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. पण त्यांनी स्वप्न पाहिले ते रयतेसाठी. रयतेला त्यांच्या हक्काचे स्वराज्य मिळण्यासाठी. सर्वसामान्यांच्या जीवनात सुख आणण्यासाठी. आज असा इतरांचा विचार कोणी करू शकेल? तेही इतक्या कमी वयात ? प्रामाणिकपणे सांगायचे, तर मीसुद्धा करणार नाही. मी आधी माझा, माझ्या कुटुंबाच्या उत्कर्षांचा विचार करेन. त्यात चुकीचे काहीच नाही. पण स्वतः मोठे होताना इतरांनाही मोठे करायचा विचार करावा, हे अनेक थोर व्यक्तीच्या कार्यातून दिसून येईल.
छत्रपतींनी रयतेसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय नाही केले? प्रचंड मेहनत घेतली. एका व्यापक ध्येयाने ते प्रेरित झाले होते. यासाठी त्यांनी सर्वात प्रथम काय केले, तर चांगले सहकारी हेरून त्यांना आपल्या वाटचालीत सहभागी करून घेतले. त्यांनी प्रत्येकाला एक विचार दिला स्वराज्याचा. अनेक युद्धे करून, प्रसंगी शत्रूशी थेट दोन हात करून त्यांनी स्वराज्य उभारले. ते छत्रपती झाले. पण हा मानमरातब मिळाल्यावर ते स्वस्थ बसले का ? तर नाही. त्यांनी आदर्श राजव्यवस्था निर्माण केली. आजच्या भाषेत उत्तम मॅनेजमेंट केली योग्य जागी योग्य व्यक्ती नेमून कारभार चालविला. त्यामुळे आज आपण लोकशाही राज्यात असलो, तरी उत्तम राजकारभारासाठी ‘शिवशाही’ हवी असे म्हणतो. दुर्दैवाने आपल्याकडे शालेय इतिहासात छत्रपतींच्या लढाया, गनिमी कावा यावर जास्त भर दिला आहे. शिवरायांचा आदर्श राज्यकारभार, माणसे जमविण्याची हातोटी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची अर्थनीती यावर जास्त भर दिलेला नाही.
लढाई, युद्ध आता इतिहासजमा झाले आहे. आताचा काळ अर्थयुद्धाचा आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी तलवारीची नाही, तर तराजूची अर्थनीती उपयोगाची आहे. शिवरायांनी आपला कारभार करताना आदर्श अर्थनीती अवलंबिली होती. सर्वसामान्य रयतेचे उत्पन्न वाढवितानाच राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसविण्याचे काम त्यांनी केले. यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले होते. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले होते. आताच्या काळात शिवरायांच्या त्या अर्थचातुर्याची शिकवण तरुण पिढीला मिळणे अत्यावश्यक आहे. मी स्वतः आर्थिक क्षेत्रात काम करीत असल्याने मी शिवरायांच्या या अर्थनीतीचा सखोल अभ्यास केला आहे. दूरदृष्टीचा आणि खऱ्या अर्थाने रयतेचा राजा कसा असावा, हे मला त्यांच्या चरित्रातून कळले. आजकाल मॅनेजमेंट, अर्थकारण यांचे शिक्षण घेण्यासाठी आपण मुलांना परदेशांत पाठवितो. पण शेकडो वर्षांपूर्वी आपल्याच मातीतील या महान राजाने मॅनेजमेंटचे जी काही उदाहरणे घालून दिली आहेत, त्याला जगभरात तोड नाही. अनेक देशांत शिवरायांच्या या मॅनेजमेंट कौशल्यावर संशोधन होत असते. त्या देशांनी या मॅनेजमेंटचा अभ्यास करून त्यानुसार काम करीत प्रगती साधली आहे. पण आपल्याकडे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. आपण परदेशी मॅनेजमेंटलाच महत्त्व देतो. त्याऐवजी आपल्याच मातीतील आदर्शापासून प्रेरणा घेतली, तर आपलीहो तितकीच मोठी प्रगती निश्चित होऊ शकते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
