जिद्
यशासाठी संगत महत्त्वाची
आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला, तर तो पिण्यायोग्य असतो. पण तोच थेंब जर गटारीत पडला, तर हातपाय धुवायलाही कोणी वापरत नाही. तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडला, तर क्षणात त्याची वाफ होते. कडूलिंबाच्या पानावर पडला, तर तो कडू होतो. द्राक्षाच्या वेलीवर पडला, तर गोड होतो. सापाच्या तोंडात पडला, तर त्याचे विष होते. समुद्रात पडला, तर खारट होतो आणि शिपल्यात पडल्यास त्याचा मोती होतो. पाणी तेच असते; पण ते कोणाच्या संगतीत आहे, यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते.
मुलगा किंवा मुलगी कशी निघेल, हे सर्वस्वी त्याच्या आईवडिलांवर अवलंबून नसते; तर त्यांच्या संगतीवरही अवलंबून असते. दारुड्या, जुगारी, नालायक बापालाही वाटत नाही की, त्याचा मुलगा त्याच्यासारखाच व्हावा. वारांगनेलाही वाटत नसते की, तिची मुलगी तिच्यासारखी व्हावी. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी कोणाच्या संगतीत राहते, हे आईवडिलांनी डोळ्यात तेल घालून पाहिले पाहिजे. कारण जवळचे मित्र जसे असतील, तसाच तो घडत असतो. संत कान्होपात्रा या खऱ्या तर गणिकांच्या वातावरणात राहिल्या; परंतु त्या संतसहवास नि मुखी हरिनाम यात रमल्या व संतपदाला पोहचल्या. चांगल्या संगतीची अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. अत्तराच्या व्यापाऱ्याकडे आपण गेलो व नुसते काही वेळ त्याच्या दुकानात बसलो, तरी आपल्याला फुकटचा सुवास मिळतो. चांगले गुरू, मार्गदर्शकसुद्धा अत्तराच्या व्यापाऱ्यासारखे असतात. गुरूंनी आपल्याला काही दिले नाही, ते काही बोलले नाहीत, उपदेश दिला नाही; तरी गुरूच्या प्रभावळीतून ज्या पवित्र लहरी, स्पंदने बाहेर पडतात, त्याने आजूबाजूचे वातावरण पवित्र झालेले असते. त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवर, मानसिकतेवर होतो. म्हणून यशस्वी व्हायचे असेल, तर चांगली संगत निवडा.
असे म्हणतात ढवळ्याशेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला, कडू का झाला तर संगती गुण. प्राण्यांच्या, वृक्षांच्या बाबतीत हे घडत असेल; तर मानवाच्या बाबतीत ते निश्चित किती तरी पटीत घडते, हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे. २१ दिवस आणि रात्री तुम्ही ज्यांच्या संगतीत, सहवासात राहाल, २२ व्या दिवशी तुम्ही त्यांच्यासारखेच बनाल, त्यांच्यासारख्याच सवयी तुम्हाला लागतील.
एका साधूला जंगलात दरोडेखोरांनी पकडले. त्याला आपल्याबरोबर ठेवले, दरोडेखोर व्यसनी होते. जुगार खेळत होते, मांस, मटण, मच्छी खायचे. स्त्रियांवर अत्याचार करायचे. साधूला हे प्रकार अजिबात पसंत पडणारे नव्हते. दरोडेखोर दारू प्यायचे. त्यामुळे साधूने त्यांच्याकडील अन्नपाणी सेवन करण्यास नकार दिला. तो उपाशी राहू लागला. पण शेवटी साधूही माणूसच… किती दिवस अन्नपाण्याशिवाय राहणार? भुकेने व्याकूळ झालेला साधू शेवटी दरोडेखोरांप्रमाणेच अभक्ष्य भक्षण करू लागला, दारू प्यायला लागला. २२ व्या दिवसापासून दरोडेखोर ज्या ज्या गोष्टी करीत, त्या सर्व तो साधू करू लागला.
दुसऱ्या एका घटनेत एका दरोडेखोराला साधुसंतांच्या सहवासात ठेवण्यात आले. पक्की दरोडेखोर असलेली ती व्यक्ती २२ व्या दिवशी ‘विठ्ठल विठ्ठल’ असे नामस्मरण करू लागली. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी त्रऋषी झाला तो अशा संगतीमुळेच !
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
